Saturday, 21 July 2018

लेह-लड्डाख ट्रिप...७

पेंगॉंग लेक ते त्सो मोरीरी.

पहाडी हिमालयातल्यासारखंच इथेही फार लवकर उजाडलं. पेंगॉंग समुद्रसपाटीपासून साधारण १४,००० फुट उंचीवर आहे. अक्षरशः पहाटे पाचलाच डोळे उघडले. इथे देखील फार थंडी होती. लाईटही अर्थातच नव्हते. रात्री जरा छपरांवर टपटप आवाज येत होता. बहूदा बर्फ पडला असावा. इथले तंबू लाकडी होते आणि बरेच लेकच्या जवळही होते.
इथे पर्यटकही ब-याच संख्येने होते. विशेषतः बाईकर्स मुलं आणि मुली देखील असाव्यात.
इथे सगळेच लोकं सततच इतक्या विपरीत परिस्थितीत- परिसरात रहातात की अमुक एका गोष्टीसाठी कुणी एक पर्यटक अडून, हटून बसलाय असं होत नाही. मग ते पहाडातल्या अरुंद रस्त्यांनी गाड्या हाकणं असो वा अगदी गरजेपुरतेच्या सोईंचे टेंटस असो वा जे उपलब्ध आहे त्यातून बनवलेलं जेवण असो. पर्यटक फक्त आणि फक्त निसर्ग आणि परिसर एंजॉय करतात. बाकी काही नाही. बाचाबाची, हमरीतुमरीच तर नाव नको.

आमच्या टेंटसमधूनच पेंगॉंग लेक दिसतोय. तरी पण दार उघडून बाहेर पडले. पुढेमागे बर्फाच्छादीत पहाड, मधे शांत आणि आता गडद जांभळा दिसणारा पेंगॉंग. आभाळ भरुन आलेलं. त्यातून डोकावणारी थोडीफार सुवर्ण किरणं बघूनच कळत होतं की दूर तिकडे सुर्योदय झालेला आहे..बस पहाडोंके पिछे से निकलनेकी देरी है. परिसरात अतीव निरवता. इथल्या पराकोटीच्या थंड हवामानामुळे, आणि पेंगॉंगच्या तुरट पाण्यामुळे कुठलेही प्राणी-पक्षी जवळपास देखील असायची शक्यता वाटत नाहीये. आत्ता या क्षणी हालचाल करणाऱ्या गाड्या आणि पर्यटक देखील चिडीचुप आहेत. हाकेच्या अंतरावरचा पेंगॉंग मात्र आपल्याच धुंदीत खळाळत असावा.
स्केचबूक काढलं आणि स्केचेस करत बसले. एवढ्यात बाकीचेही काहीजणं उठले आणि पिण्याच्या गरमपाण्यासाठी त्यांनी किचनच दार ठोठावलं. एकाचे दोन, दोनाचे चार झाले की परत गप्पा, हास्य विनोद सुरु झाले, वाफळत्या चहाचे कप हाती आले आणि पहाटेच्या गारठ्यातली पेंगॉंग काठची एक अबोलपणे हितगूज करणारी निरव जांभळी पहाट हातून निसटली.

आज आम्ही मोरीरी लेकसाठी निघणार आहोत. परत शक्य तेवढं शुचिर्भूत होऊन, ब्रेकफास्ट करुन निघालो.
आज सुर्यदर्शन कठीण दिसतय. त्यामुळे कालची निळाई आज लखलखीत शुभ्र आरस्पानी दिसत आहे. या स्वच्छ, नितळ पाण्याचे सगळे रंग विभ्रम त्या सुर्यकिरणांवर अवलंबून आहेत. विशिष्ट कोनातून ही सुर्यकिरणं पाण्यावर पडली की पेंगॉंग झळाळून निळा होतो. आत्ताचं हे रुप जरा खट्टू करणारंच होतं. पण सावलीतल्या गडद तपकीरी पहाडांच्या सुवर्णांकीत बर्फाळ टोप्या फार सुरेख दिसत होत्या. तसचं जलभरल्या करड्या ढगांमधली नभीची निळाई देखील आकाशीच्या पेंगॉंग सारखीच दिसत होती. खाली पहाडांच्या कुशीतला पेंगॉंगचा पाणेरी तुकडा तर आभाळात ढगांतन दिसणारं निळं आकाश. Just like mirror image of each other. निसर्गात झळाळून दिसायचा, खुलून उठायचा प्रत्येकाला चान्स मिळतो नाही ? फक्त आपण तिथे त्याक्षणी हजर हवे नजारा टिपायला.

त्सो(लेक..तलाव) मोरीरीकडे निघाल्यानंतरचा बराचसा रस्ता(?) अगदी पेंगॉंगच्या बाजूबाजूनेच आहे. त्यामुळे ढगांआडून आलेल्या चोरट्या सुर्यकिरणांमुळे पेंगॉंग पुन्हा निळाईने झळाळून उठला. दोन तीन ठिकाणी थांबत परत फोटो सेशन केलं आणि मार्गस्थ झालो. रस्ता म्हणजे नावापूरताच रस्ता होता. पण डाव्याहाताची ऐसपैस कैलिडोस्कोपिक निळाई हा प्रवास सुसह्य आणि अविस्मरणीय करत होती.

अतिशय नोमेडिक प्रदेश आहे हा. मैलोंगणती खोपटं पण दिसत नाही. पहाडांच्या पायथ्याशी थोडीफार बुटकी, पसरट झुडपं दिसतात. बाकी चराचर अक्षरशः निश्चलच. इथेच किनाऱ्यावर एक चार -सहा खोपटी लागली. गोठ्यात(?)बरेच पाळलेले याकस् होते. दोन तिन महिलाही होत्या. आसपास छान कुरण होतं. फोटो.. फोटो करत थांबलोच. याकच्या शेपटीचं मी आमच्या तिन्ही ड्रायव्हर्सना सांगून ठेवलं होतंच. इथे शेपटी मिळायची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. बोलक्या आणि अति उत्साही टुंडुप ड्रायव्हरनेच शेपटीविषयी त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे खरंच याकची एक शेपटी होती. लगेच त्या म्हातारीने घरातून आणून शेपटी दाखवली. अतिशय रॉ अवस्थेतील ती याकची कापलेली शेपटी बघवेना. नको म्हटलं. तरी त्या शेपटीची किंमत चार हजार रुपये असं त्या म्हातारीकडून ऐकल्यावर धक्काच बसला. नखशिखांत रंगरुपाचे नोमेडिक लोकं मात्र या शेपटीच्या निमित्ताने बघायला मिळाले.

पेंगॉंगच्याच काठाने बराचकाळ प्रवास केल्यावर पेंगॉंग पुर्वेकडे वळला आम्ही त्यातल्या त्यात हमरस्त्याला लागलो. इथे मिल्ट्रीचा औरस चौरस बेस आहे. मोठ्ठी वसाहत आहे म्हटलं तरी चालेल. पुर्वेकडच्या पहाडांची नजरेला दिसणारी एक रांग सोडली की चीनची बॉर्डर आहे. खालच्या विस्तीर्ण व्हैलीत कुमांऊ रेजिमेंटसच वॉर मेमोरियल आहे. खरतरं थांबताना फारच ओकंबोकं आणि टिकली एवढंच वाटलं हे मेमोरियल. पण तिथल्या विस्तीर्ण तपकिरी निरव एकांतात दिमाखाने फडकणारा आपला तिरंगा पाहिला की उर भरुन आला. तिथले आर्मीमेन त्या मेमोरियलची कथा जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा तिथल्या धोकादायक स्थान महात्म्यामुळे आपल्यावर फार परिणाम होतो. अगदी काही अंतरावरच चिनी आर्मीच्या पोस्टस आहेत. किती धोकादायक ठिकाणी हे जवान दक्षतेने लक्ष ठेवून असतात, किती अडचणींच्या ठिकाणी राहून आपल्या सीमेचं रक्षण करतात हे बघायला, उमजायला इथेच यायला पाहिजे. आमच्यातला बोलबच्चन टुंडुप एक्स आर्मीमेन होता. त्यामुळे त्याच्या बोलण्याला अशा ठिकाणी जास्तच रोचकता आली.

एक-दोन चहा, जेवण कम मैगी, घरगुती फराळाचे थांबे घेत निघालो. सगळा वाळवंटी पहाडी प्रदेश. इथेच आपली सिंधूनदी भेटली. सिंधूचं पात्र लहान-मोठं होणारं असलं तरी ही नदी दमदारच आहे. सतत खळाळत असते.
तिचं हिरवं-निळं खळखळ पाणी, काठावरची हिरवी-पिवळी कुरणं, त्यावर सुखनैव चरणा-या गाई, बक-या, याक, जंगली गाढवं, घोडे अशी जनावरं आणि नदीच्या दोन्ही थडीच्या तपकिरी खडकमय, वाळूमय विस्तीर्ण पहाडरांगा. या पहाडांमागचे अजून अति उंचीचे बर्फांकीत महाकाय पहाड, निळंभोर आकाश आणि त्यावर आल्हाद तरंगणारे शुभ्र ढग आणि तपकिरी पहाडांवरच्या या ढगांच्या हलत्या गडद सावल्या...
One of the most soulful and heartening landscape of our India.

सिंधूचा हा आवेगी, आत्मीय प्रवाह पाहिला की वाटतं त्रिखंडात दबदबा असलेल्या या देशाचं, सिंधूस्तानचं...हिन्दूस्तान, भारत, इंडिया अशी नामकरणं करणारे, करु देणारे आपण खरंच करंटे आहोत. तरीही पोटच्या लेकरांना माफ करण्या-या मातेसारखी सिंधू नदी लड्डाखच्या द-याखो-याला, रखरखीत रणाला सुजलाम्, सुफलाम करत वाहतेच आहे, एका संस्कृतीला तळहाताच्या फोडासारखी जपतेच आहे.

इथे आर्मीचे बरेच चेक पोस्टस आहेत. शायोक, झंस्कार सारखे सिंधूनदीवरही त्यांचे देखणे, दणदणीत पुल आहेत. फोटो काढायला तर इथे असंख्य कारणं मिळतात, त्यात या पुलांची पण भर पडते. तरी प्रवासाची परमिशन देताना आर्मीवाले फोटो न काढण्याची, सोशल मिडियावर न टाकण्याची पुन्हापुन्हा तंबी देतात. पहिल्यांदा जरा वाटतं त्यात काय एवढं म्हणून. पण जसजस आपण अजून अंतर्गत भागात जातो तसतस आर्मीच इथलं प्राबल्य जाणवायला लागतं. मोक्याच्या ठिकाणातल्या आर्मी पोस्टस, मोठाल्या घळींमधे लपलेल्या इमारती, झुडपात लपलेले रणगाडे, अहोरात्र सतर्क असे आर्मीमेन पाहिले की वाटतं त्या फोटोंची ऐशी का तैशी. फोटो काढायचा आपला विचार बालीश वाटायला लागतो. इथे पर्यटन मनोरंजापेक्षाही फार वरची पायरी गाठतं.
इथेच दोनतीन आर्मीवुमन्स पण दिसल्या.

पुढे मात्र युध्दकथांच्या चर्चा करत अर्दन वॉटर कलरमधे रंगवल्या सारखे लहरीदार, वाळूदार पिवळे, तपकिरी, गुलबट, जांभळे, निळे पहाड फक्त नजरेनीच टिपत राहिलो. रस्तेही बेतासबातच होते. एकमेकांच्या नजरेत राहिलं तरच इथे काही खरं आहे, नसता वाट, पहाड चुकलाच समजा. साधारण वर्षभराच्या कालावधीत  आमचा ड्रायव्हर रिक्की निदान तीसवेळा तरी या रस्त्यांवरन फिरतो त्यामुळे तो चुकायचा प्रश्नच नव्हता.
परत एका व्हैलीत एक पसरट निळावंत तलाव लागला. उतरत्या उन्हात तोही अत्यंत विहंगम दिसत होता. पण त्सो मोरीरी अजून पुढे होता. आणि वेळ कमी होता. सुर्यास्त गाठायचा होता त्यामुळे न थांबता निघालो.

पेंगॉंगच्या मानाने मोरीरी लेक जरा पसरट व्हैलीत आहे त्यामुळे अरुंद निळी रेषाच दिसते प्रथमदर्शनी. पण आश्चर्य म्हणजे या तलावाच पाणी देखील तुरटच आहे तरी इथे बदकं सहकुटुंब पाण्यात मनसोक्त पोहताना दिसली.

पोहोंचेस्तवर नभ दाटले. लेकवर सावली पडली. गारठा प्रचंड वाढला. समुद्र सपाटीपासून १५०००+ फुट उंचीवर हा लेक आहे. इथे कोणी फारसे पर्यटक येत नाहीत. अगदी नोमेडिक ठिकाण आहे हे. एका अरुंद घळीत थोडी नोमेडसची वसाहत. आमचे कापडी तंबू.
भराभर सामान ठेवलं आणि लेकजवळ गेलो.
हा परिसर फार विस्तीर्ण आहे. लेकजवळ जायचं म्हटलं तरी दहा मिनिटं चालावं लागत होतं. त्यात हवामान ढगाळलेलं. उंचीमुळे श्वास लागायला लागला. तरी थोडेफार फोटो काढून परतलो. जेवणं करेस्तवर अजूनच गारठलं. भरपूर जाडजूड गाद्या, रजया असून देखील अजून एकेक जोड मागवला. मोबाईल, बैटरी चार्ज करुन घेतल्या. लाईट अर्थातच गेले.
सुरक्षितता म्हणून ऑक्सिजन सिलेंडर्स तीन तंबूत ठेवून घेतले. सर्वानुमताने रात्र वै-याची आहे असा एक काळजीयुक्त फतवा निघाला. अडचण आली तर एकमेकांना उठवायचं, ऑक्सिजन घ्यायचा असं ठरवलं आणि झोंबणा-या गार वा-यामुळे गदागदा हलणा-या तंबूंकडे दुर्लक्ष करत, ब्लैंकेटस मधे स्वतःला लपेटून घेत त्सो मोरीरीची निळी उशी उशाला घेत निद्रेच्या अधीन झालो.

No comments:

Post a Comment