Tuesday, 17 July 2018

लेह-लड्डाख ट्रिप...६

नुब्रा ते पेंगॉंग.
थ्री इडियटस् फेम पेंगॉंग लेकसाठी निघण्यासाठी तयार झालो. थंडी, दुर्गम ठिकाण आणि जेमतेम तीन महिन्याच्या पर्यटन मोसमासाठी उभारलेल्या कैंपिंग टेन्टसमधे अगदी बेसिकच सोई असतात. त्यामुळे नाममात्र शुर्चिभूत होऊन झिमझिम पावसात मस्त ब्रेकफास्ट केला. वेळात वेळ काढून मी स्केचेस केले. एकमेकांना चला..चला करत त्वरेने निघालो.
आभाळ अगदी भरुन आलेलं. ज्या रस्त्याने आलो तोच रस्ता काही अंतरापर्यंत होता. परत एकदा डिस्किट गाव लागलं. इथेच सुप्रसिद्ध डिस्किट मोनेस्ट्री आहे. तसंच मैत्रेयचा ३२ मिटर उंचीचा देखणा पुतळा पण आहे.
Some how या पुतळ्यांना धड पुतळा म्हणता येत नाही का शिल्पही म्हणता येत नाही. तांब्या-पितळीचे पत्रे ठोकून, चटपटीत रंगवून देखणे केलेले असे तिबेटीयन वैशिष्ट्यांचे हे पुतळे असतात. हे पुतळे आपल्याला न धार्मिकतेने भावतात न कलेच्या दृष्टिकोनातन रुचतात. पण या अथपासून इतिपर्यंत केवळ जिऑग्रिफकली चित्ताकर्षक असलेल्या हिमालयीन टेरेनमधे मोनेस्ट्रीज शिवाय एवढीच थोडीफार मानवनिर्मित कुतूहलं आहेत. उंचावरचं ठिकाण, अक्षरशः नभ उतरु आलेलं. रिमझिम पावसात भिजतच चारसहा फोटो काढले. मागच्याच टेकाडावरच्या ऐसपैस आणि लड्डाखमधल्या सर्वात देखण्या आणि मोठ्या मोनेस्ट्रीला भेट देऊ शकत नाही म्हणून चुटपुटत दुरुनच दर्शन घेतलं, गाड्यांमधे डिझेल भरलं आणि पैंगॉंगकडे मार्गस्थ झालो.
पुढचा रस्ता परत चढ-उताराचा, वळणावळणांचाच आहे. पन्नास एक किलोमीटर येतानांचाच रस्ता होता पण नंतर मात्र डोंगरांची रेंज बदलत आगम नावाच्या खेड्यात थांबलो. इथे जरा प्रसन्न झाडी, फुलं पहायला मिळाली. या भागात फिरताना महिलांची वॉशरुम्सची फार पंचाईत होते. वेळ निभावली जाते पण खरोखर फार गरज आहे इथे निटस वॉशरुम्स बांधायची असं सारखं वाटत रहातं.
आगम या गावातच आम्ही नदी पण ओलांडली आणि दुस-या रेंजमधे पाऊल ठेवलं. आगम सोडत नाही की एक पार कमरेतनं वाकलेली तिबेटीयन वृध्दा भेटली-दिसली. नखशिखांत तिबेटीयन नोमेडिक पेहरावतल्या या वृध्देने फोटोसाठी कुठलीही उत्सुकता दाखवली नाही.
इथल्या भागातल्या पहाडांच वेगळचं रुप आता दिसू लागलं. वाळूदार पहाड जाऊन तिरप्या रचनेचे लोखंडी, जस्ताचे तुकडे,चिप्स वाटतील असे पहाड लागले. रस्ताही बराच खडतर होता. सोबतीला शायोकनदी होतीच. अनेक ठिकाणी तर रस्ता नावाची चिजच नव्हती. खडकाळ जमीन, वाहतं पाणी, थोडाफार चिखल..आमच्या रिक्की ड्रायव्हरची कमाल वाटली. इथले सगळेच ड्रायव्हर्स शांत आणि संयमीत डोक्याचे असतात म्हणून बरयं. तशाच त्या टोयोटाच्या इनोव्हा गाड्या. खरोखर हिमालयीन रोडवर राज्य कुणाचं असेल तर या इनोव्हाजचचं. अख्ख्या दहा दिवसात आमचीच काय दुस-या कुणाचीही बंद पडलेली गाडी आम्ही बघीतली नाही.
हं..तर काय सांगत होते ? बहुरुपी पहाडांबद्दल ना ? खडकांचे अनेक रंग-रुप, मधूनच वाळूच्या ग्लेशियर्ससारख्या विशाल पसरणी, घळीतनं पाण्याच्या ओहोळासारखी दिसणारी माफक हिरवळ..नाही म्हणायला गावठी गुलांबांनी डवरलेली झुडपं
नदीकिना-यांनी बरीच दिसतात. मातकट रंगांच्या निश्चल पहाडांच्या पार्श्वभूमीवर ही डवरलेली लाल-गुलाबी फुलं फार लक्षवेधक ठरतात. इथेच १०-१५ किलोमीटरचा एक असा पट्टा लागला जिथे फक्त काळ्यावर पांढरे पट्टे असलेलेच खडक, शिळा होत्या. आणि शिळा सुध्दा साधारण चौकोनी आकारातल्या. कपड्याच्या बांधलेल्या गासड्यांचीच आठवण यावी असे हे विशाल दगड बघून फार नवलं वाटलं. इथे हिमालयात कितीही आणि कसेही आणि कितीही चांगले फोटो काढा, जे नजरेला दिपवतं ते नाहीच कैमे-यात पकडता येत. इथला निसर्ग फक्त याची देही याची डोळा अनुभवण्यासाठीच आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. खरं सांगू ?
नंतर नंतर तर फोटो काढायचाही कंटाळा येतो. असं वाटतं हे जेवढं दिसतंय तेवढं फक्त नजरेनी टिपावं आणि जमलं तर मनात उतरवावं.
परत एकदा पहाडांच रुप बदललं. मोठाल्या पिवळट-करड्या दगडी शिळा आणि पायथ्याशी मखमली वाळू. अगदी हातात घ्यावीशी वाटणारी. नुब्राची वाळू निसटलीच होती त्यामुळे मागचा-पुढचा विचार न करता गाडी थांबवलीच. पटकन उतरुन मुठभर रवाळ, गारीगार वाळू अलवारपणे हातात घेतली. या हिमालयाचं जीवनचक्र समजून घेणं खरंच फार अवघड आहे. पहाडांचे अनेकानेक आकार, रंग तर खडकांचे, शिळांचे विविध रंग, आकार तर गोट्यांची,वाळूचीही तिच त-हा. एकाचा पायपोस एकात नाही तरी गुण्यागोविंदाने एकमेकांशी सलगी करत हजारोवर्ष झाले नांदताहेत. माझ्या मागे आमच्या गाडीतल्या बाकीच्याही उतरल्या. सगळ्यांनीच वाळूत क्षणभंगुर का होत नाही पण पाऊल खूणा उमटवल्या. फोटो काढले. अस्मादिकांना त्या वाळूत 'M' कोरुन अजरामर व्हायचा निष्फळ प्रयत्न करण्याचा मोह आवरता आला नाही.
मी, शिलाताई आणि जयूताई अशा तिघींचा एक सुरेख फोटो या वाळूवर प्रगतीकडून काढून घेतला.
शिलाताई म्हणजे आम्ही नांदेडहून बदलून औरंगाबादला आल्यानंतरची कोटलाकॉलनीतली शेजारची ताई. आणि जयूताई तिची मावस बहिण. कुठला ऋणानुबंध असेल माहित नाही पण जवळपास चाळीस वर्षांनी आम्ही एकत्र लेहची ट्रिप करु असं कुणी तेव्हा सांगितलं असतं तरी वेड्यात काढलं असतं त्याला. प्रवासात या दोघींबरोबर तो काळ, तेव्हाचे दिवस याच्या गप्पा मारताना या ऋणानुबंधाच्या गाठी अजूनच दृढ झाल्याचा अनुभव आला.
खळाळती शायोक नदी आमच्याबरोबरच फिरते आहे. तिच्यासोबत प्रसन्न हिरवळ आणि गुलाब पण आहेतच जोडीला. अरुंद पात्र, एकात एक असे ऊंच तडांग डोंगर. मधूनच दिसणारा नभाचा निळा तुकडा. तोचतोचपणाचा कंटाळा येत नाही की परत रुंद व्हैली लागली. अतिशय बारिक वाळूचे रण लागले. वारही सुरु झालं. वाळूचे लोटच्या लोट उडू लागले. समोरचा रस्ता देखील दिसेना. अख्खा रस्ता या उडत्या वाळूत नाहीसा झालेला. रस्त्यांवरचे कामगार अक्षरशः फावड्यानी वाळू बाजूला करुन रस्ता दाखवत होते. आत्तापर्यंत इथले लैन्डस्लाईडस् आणि बर्फवृष्टीचे धोके माहित होते. वाळूचं संकट पहिल्यांदाच पाहिलं. फार संघर्ष करावा लागतो इथे जगताना हे पदोपदी जाणवतंय. तरीही लेह-लड्डाख सोडून दक्षिणेत जावं असं म्हणणारं इथलं कुणीही आत्तापर्यंत भेटलं नाहीये हे विशेष.
मधेच अबोल रिक्किने डावा हाताचा डावीकडे मुक इशारा केला. नजरा तिकडे वळल्या आणि वॉव असा सामुहिक चित्कार बाहेर पडला. महाकाय तपकिरी पहाडांच्या रांगामधनं एक बिलोली निळा तुकडा दिसला. हाच तो पेंगॉंग लेक. आपल्या निळाई, हिरवाईसाठी, बदलत्या रंगांसाठी सुप्रसिद्ध असलेला पेंगॉंग लेक. नभापेक्षाही गहरी निळाई..एखाद्या अंगठीतल्या बहुमोल खड्यासारखा तो निळा तुकडा काळजाला अपरंपार हलवून गेला. थांबलो नाहीच. प्रत्यक्ष लेकवर पोहंचायची घाई केली. पेंगॉंगची विलोभनीय निळाई उतरत्या उन्हात अजूनच लोभस होतं. सकाळपासून इथला सुर्यास्त गाठण्यासाठी आटापिटा करत होतो. वाळूच्या वादळाला भिक न घालता दामटुन गाड्या पळवल्या आणि पेंगॉंगला पायतळी उतरलो. आपल्याला हा तलाव उंचावरुन दिसतो त्यामुळे त्याचे दोन्ही किनारे दिसतात. तपकिरी पहाडांची महिरप असलेला हा पेंगॉंग लेक अक्षरशः डोळ्याच पारणं फेडतो. ढगांआडून लपंडाव करत येणा-या सुर्यकिरणांनी याची निळाई क्षणोक्षणी बदलते. कितीही पाहिलं तरी मन भरत नाही आणि कितीही फोटो काढले तरी जे दिसतं ते फोटोत येतच नाही.
एक अलौकिक निसर्गरुप जे भारताचं आहे, आपलं आहे, माझं आहे..विश्वास बसत नाही या रुपावर. मती कुंठीत होते. विचार निशब्द होतात. आता कुणाचीही सोबत नको...कुणाचेही अत्यानंदी शब्द नकोत...
शतकोनशतके निश्चल असलेल्या या गहि-या निळाईला आत्ममग्न होत नजरेनी पिऊन टाकण्यासारखं अद्वैती सुख कुठलच नसेल. पुन्हापुन्हा ही निळाई अलगद डोळ्यात उतरते आणि पुन्हापुन्हा डोळे भरुन येतात.
शब्दात पकडता येणार नाही असं हे अदभुत रुप आहे.
स्वच्छ खळाळतं तुरट पाणी. तलावाचा काठही आरस्पानी. परिसरातही शांतता. पाणी तुरट असल्यामुळे कुठलेही पाणजीव, पाणवनस्पती इथे जगू शकत नाहीत. हिवाळ्यात हा तलाव पुर्णतः गोठतो. चीन-भारत बॉर्डरवरचा हा १३४ किलोमीटर लांबीचा लेक ६०% चीनमधे आणि ४०% भारतात आहे. अमीरखानच्या कृपेने आता बरेच पर्यटक इथे येतात नसता पुर्वी फक्त मोजकेच साहसी पर्यटक येत असत म्हणे. आजही बेताचीच गर्दी आहे.
जरा ग्रुपला सोडूनच फिरले. मला अशा ठिकाणी एकांतच आणि एकटेपणच आवडतं. अशा अलौकिक दृश्यांची, प्रसंगाची आपल्या मनःपटलावर उमटणारी स्पंदन टिपायला शांतताच हवी असते. पाण्यात पाय बुडवले, वाळूमय चेहरा स्वच्छ केला, पाणी चाखलं आणि आम्ही दोघं शांतपणे एकान्ती किनारा फिरलो.
निळ्या-हिरव्या रंगाचे विभ्रम कैमे-यात पकडायचा फोल प्रयत्न केला.
अजून पुढच्या पॉईंटवर सगळेच गेलो. इथे म्हणे करीना पॉईंट आहे. थ्री इडियटस् या चित्रपटातलं शुटिंग इथे झालयं. करिनाने वापरलेली पिवळी स्कुटर आणि तिने घातलेल्या ड्रेससारखा ड्रेस पण इथे स्टॉल्सवर ठेवलेला असतो. तुम्ही तो ड्रेस घालून पिवळ्या स्कुटरवर बसून आयकॉनीक फोटो काढू शकता. आम्ही तर असल्या बाजूला फिरकायचा प्रश्नच नव्हता.
परत त्या चकाकणा-या निलमण्याचे फोटो काढले. या गहि-या निळाईमधे इतकं जबरदस्त चुंबकत्व आहे ना की आजूबाजूच्या हिमांकीत तपकिरी पहाडांचा अक्षरशः विसर पडतो. एखाद्या पंचपक्वान्नी ताटाभोवतीच्या महिरपीला जेवढं महत्व असतं तेवढच महत्व या निळाई भोवतीच्या पहाडांना आहे. तळहाताच्या फोडा सारखा हा निलमणी आपण भारतीयांनी जपला पाहिजे. हिमालय तर जपतोच आहे या निलमण्याला. तरीपण आपलही काही कर्तव्य आहेच ना ? आधीच साठच्या युध्दात आपण या लेकचा काही भाग चीनला गमावून बसलोय. आणि इथून अक्षरशः हाकेच्या अंतरावर चीनची बॉर्डर आहे.
परतून आधी आमचे लाकडी टेंटस् ताब्यात घेतले. चहा घेतला आणि सायंकाळच्या मंद उजेडात परत एकदा लेकपाशी जाऊन आले..एकटीच.
आज ही जागा कळली म्हणून आपण इथे आलो. अजूनही या भारतात, या भुतलावर कितीतरी अशा जागा असतील की त्या अजून कोणालाच माहित नाहियेत. अविश्वसनीय अशी अनेक ठिकाणं अजून शोधायचीच शिल्लक असतील ना ?
आपल्या उंचीमुळे आणि औरसचौरसपणामुळे विश्वविख्यात असलेला हिमालय..त्यातला हा मापाने लहानसा असलेला निळा तलाव. किती भारुन गेलो आपण त्याला बघून. निश्चलतेतील चलत रुपं आणि चलत रुपातला निश्चितपणा...कालातीत असा निसर्ग निसंगपणे सततच रंग-रुप पालटवत मानवावर मोहीनी टाकत आलाय तरी आपण येरे माझ्या मागल्या करत आपलीच महत्ता सिध्द करायचा आटोकाट प्रयत्न करतो.
खरंच हा निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, दाखवतोय, शिकवतोय, पण आपलीच झोळी फाटकी त्याला काय करणार ?

No comments:

Post a Comment