लेह ते नुब्राव्हैली.
लेह - लड्डाख ट्रिप...५
लेह ते नुब्राव्हैली.
कुठेही बाहेर फिरायला निघताना कुठे, काय, कसं बघायचं, फिरायचं असा बराच होमवर्क करुन मी शक्यतो बाहेर पडते. पण या वेळेस लड्डाखचा अभ्यास करायला ना वेळ मिळाला ना मानसिकताही तयार झाली.
आणि एकदा का ट्रिप सूरु झाली की हिंडणं, फिरणं यातच खूप वेळ जातो. काही वाचायला, शोधायला इच्छाच होत नाही. आणि वेळ, एनर्जी पण रहात नाही. त्यात msl (mean sea level) पासूनचे जवळपास दहा हजार फुटांवरचे दुर्गम लेह, प्रवासाचा शीण, उंचीचा थकवा आणि मोस्ट इंपॉर्टंट नेट कनेक्टिव्हिटी नसणं या सगळ्याच्या कलेक्टीव्ह इफेक्ट मुळे नुब्राव्हैली, पैंगॉंग आणि त्सो मोरीरी लेकविषयी फारशी माहिती हाताशी नव्हती. थोडक्यात आज निघताना या तिन्ही ठिकाणांची पाटी कोरी होती.
सकाळची आंघोळ, नाश्ता उरकून नुब्रासाठी आम्ही लेह सोडलं. आता आम्ही इथे लेहमधे तिन दिवसांनीच येणार होतो. पुढचे तिन दिवसांचे वास्तव्य नुब्रा, पेंगॉंग आणि त्सो मोरीरी लेक इथे कॅम्पिंग टेंटसमधे बेसिक सुविधांचच असणार होतं. त्यामुळे वाफाळत्या गरम पाण्याने येथेच्छ आंघोळ करुन, हाय एल्टिट्युड सिंड्रोमला एक टांग मारुन आम्ही भलत्याच उत्साहात निघालो.
मनालीपासूनच सोबत असलेले व लेहचेच रहिवासी असलेले ड्रायव्हर्स रिक्की(आमच्या गाडीचा ड्रायव्हर) टुंडूप आणि चंबा हे लड्डाखी तरुण आता चांगलेच परिचयाचे झाले होते. लड्डाखच्या अवघड टेरेनमधे गाडी चालवायचं त्यांच कौशल्य वादातीत होतं. त्यामुळे गप्पा टप्पा मारत निर्धास्त मनाने आम्ही खारदुंगला पासकडे निघालो.
हिमालयातल्या काराकोरम रेंजेसमधला हा खारदुंगला पास (msl पासून उंची 17, 900+ फूट) म्हणजे पर्यटकांसाठीचा जगातला दुसरा सर्वात ऊंचावरचा मोटारेबल पास(खिंड) आहे. हा पास लेहपासून जवळच आहे तरीही पहाडातल्या वळणदार रस्त्यांमुळे वेळ लागतोच. सकाळी निघतानाच हॉटेलमधल्या रिसेप्शनीस्टने सांगितले होते लवकर निघा..वर बर्फ पडतोय म्हणून. ठिकठिकाणी रस्त्याची दुरुस्ती सतत चालूच असते. अति थंडी, वा-याचा सामना करत, गरम कपड्यांचा जामनीमा करुन हे तिबेटीयन, बिहारी कष्टकरी हसतमुखाने रस्ते निट करायचं, बर्फ-डेब्रीस हलवायचं काम सातत्याने करताना बघून खरच कौतुक वाटतं.
करडे-तपकिरी ठिसूळ पहाड..ऊंचच ऊंच होत जाणारे. बहुतेकांना ताज्या बर्फाच्या शुभ्रधवल टोप्या,
झाडो-याचा अर्थातच पत्ता नाही. तरीपण इथेच आम्हाला आपल्या मुंगूसासारखे हिमालयीन मरमुटस कौतुकाने आमच्याकडे पाहताना दिसले. ऐसपैस पसरलेले पहाड आणि त्यावरचे रेषा कोरल्यासारखे वळणदार रस्ते. या रस्त्यांचा खचायचा रेट आणि मेंटेनन्स पाहिला की पुन्हापुन्हा आपल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं अपार कौतुक वाटत रहातं.
खारदुंगला पास खरोखरच खिंडीसारखा अरुंद आणि अगदी वळणावर आहे. पर्यटकांची आणि आर्मी वाहनांची भरपूर गर्दी. तशीच थंडी आणि वारंही फार. हिमांकीत पहाड आता हाकेच्या अंतरावर आल्यासारखे. चहुबाजूंनी आपण या पहाडांनी घेरलेले. निसर्गातील एका युनिक जागेवर आपण याची देही याची डोळा उभे आहोत आणि ही थरारक जागा आपल्या भारताची आहे या कल्पनेनीच अक्षरशः डोळे भरुन येतात आणि आपल्या पठारावरच्या सुखवस्तू आयुष्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघायचा साक्षात्कार आपल्याला होतो. असल्या दुर्गम ठिकाणीही नागरिकांना सुविधा देण्यात तत्परता दाखवणा-या आपल्या आर्मीचा आणि बीआरओबद्दलचा आदर द्विगुणीत झाल्याशिवाय रहात नाही.
खाली उतरलो तर अगदी अल्पप्रमाणात भुरभुर बर्फाचा नावापूरता अभिषेक आमच्यावर झाला. हरखून बरेच फोटो काढले. परत हाय एल्टिट्युडचा त्रास जाणवला पण आता अशावेळी स्लो मोशन हालचाली करायचं टेक्निन समजलही होतं आणि जमलही होतं.
इथे जरा जास्तच गर्दी होती. तीही नको इतक्या उत्साही पर्यटकांची. एकमेकांचे पोजेस देत-घेत फोटो काढणे, सेल्फीज काढणे, फोटोसाठी जरा धुसफुसही करणे, एकमेकांवर रुसणे, वादावादी करणे, आनंदाने ओरडणे..अक्षरशः ऐकून थक्क झाले.
सर्वार्थानी आपलं मानवाचं थिटेपण, क्षणभंगुरपण, दाखवून देणारं निसर्गाच एक महाकाय असं अपार भव्य रुप पाहताना देखील माणसं आपल्या आयुष्यातील शुल्लक गोष्टी विसरत नाहीत हे बघून मन विषण्ण झाले. दुर्लक्ष केलं आणि आर्मी चालवत असलेल्या एका आटोपशीर रेस्टॉरंट मधे वाफाळती कॉफी घेतली. अख्ख्या रेस्टॉरंट मधे आर्मीच्या, युध्दाच्या यशोगाथा, खडतर पण जिद्दी जीवनाविषयीचे क्वोटस, मोटोज असलेले पोस्टर्स लावलेले. दुर्गम आर्मी स्टेशन्सचे मॅप्स लावलेले..तरुण जवानांची तडफदार ये-जा..
एकूणच वातावरण भारुन टाकणारं, आर्मीचा आदर नितांत दुणावणारं.
पुढे निघालो. परत तरत-हेच्या पहाडांची संगत, गप्पांची रंगत. आता अबोल रिक्की पण जरा बोलायला लागला होता.
नुब्राव्हैली कडे निघालो होतो त्यामुळे जरा उताराचाच रस्ता होता. तपकिरी वैराण पहाडांवरच्या बर्फ वितळून तयार झालेल्या पिवळट,जांभळ्या,निळ्या, पांढरट रेषा, ऐसपैस घसरुन आलेली कैक टनांची विविध रंगी, आकारी वाळू..त्यावरचे लांबपर्यंत दिसणारे वळणदार रस्ते, व्हैलीतून अधूनमधून वाहताना दिसणारी हिरवी-निळी शायोक(Shyok) नदी..पात्रातच चिमुटभर फुललेली हिरवाई, एखाद्या वळणावरचं एखादंच खोपटं, महाकाय पहाडांच्या समोर कस्पटासमान दिसणारे अर्थ मुव्हिंग मशिन्स, आर्मीच्या दणकट ट्रक्सचे कॉन्व्हॉय आणि पर्यटकांच्या इनोव्हाज. एखाद्या विस्तिर्ण भिंतीवर मुंग्या दिसाव्यात तशा या सगळ्या गाड्या दिसतात. या निश्चल, अचल (?) अशा नैसर्गिक भव्य रुपावर एवढीच एक क्षुल्लक हालचाल जाणवते. बाकी सगळं चराचर तुमच्या येण्या-जाण्याची दखलसुध्दा घेत असेल का नाही अशी शंका येते.
लड्डाखमधला वैराण भाग आम्ही पादाक्रांत करतोय.
एका देखण्या ठिकाणावरच्या वसाहतीत
ब्रेकफास्ट-जेवणासाठी थांबलो. दहा-बारा घरांची वस्ती, छोटीशी टुमदार घरं..घरामागे वावर. वावरातही पताका लावलेल्या. एकदोघांनी टेंपररी रेस्टॉरंट्स(?) टाकलेली. चक्क आलु-गोबी पराठे, लोणचं, चहा मिळाला. पुढे काय मिळेल याची ग्यारंटी नसल्यामुळे दाबून खाद्यानंद घेत जरा रेंगाळलोच.
इथल्या दुर्गम भागातल्या वावरात तिबेटीयन पंचरंगी झेंड्याबरोबर काळ्या केसांच्या शेपटीसारखा झाडू हमखास लटकवलेला असतो. लेहलाच चौकशी केली होती तर ती याकची शेपटी असते असं कळलं. वावराला नजर लागू नये म्हणून नोमेडिक तिबेटीयन्स असं करतात. इथे घरं आणि वावरं जवळजवळच होती त्यामुळे पराठे होईपर्यंत मी एका घरात मान न मान मै तेरा मेहमान म्हणून प्रवेश घेतलाच. चढ-उताराचं अंगण, छोटंस बैठ घर. पायपुसण्यापासून सगळं वुलनच. दारं खिडक्या बंद, बहुदा इथे होम स्टेची सोय आहे. खोलीच्या मध्यभागी चुल आणि चारी भिंतींना लागून बैठे पलंग, खोल्यांचे पडदेही जाडीजाड कार्पेटचे केलेले. जुले..जुले म्हणत स्वागत करणारी हसतमुख यजमानीण. माफक हिंदी येत होतं. शेजारच्या अख्ख्या खोलीत साग्रसंगीत पूजा घर. मॉन्क बसलाच होता तिथे पोथी वाचत. त्यानेही आमचं स्वागत केलं. व्हिडीओपूरते जरा मंत्र म्हणून दाखवले. एकूणच धर्मभोळं वातावरण. याकची शेपटी बघण्यापूरतीपण इथे नव्हती. परत जुले..जुले करत निरोप घेत पराठ्यांच्या ओढीने रेस्टॉरंटकडे परतलो.
पुढचा प्रवास असाच उताराचा. नदीकाठी थोडीफार झाडी-झाडोरा. त्यालाच अमूक अमूक फॉरेस्ट अशी पाटी लावलेली दिसली की हसूच यायचं. हे फॉरेस्ट ? इतकी झाडं तर आमच्या मराठवाड्यात रस्त्यांच्या कडेला असतात. काय कठीण परिस्थिती आहे इथली. तरीपण जिथे जिथे शक्य आहे तिथे जीवनावश्यक मशागतीचं हिरवेपण दिसतय. पण एकजणही शेतात काम करताना कधी दिसला नाही हे विशेष.
पुढचा थांबा व्हाईट वॉटर राफ्टिंगचा होता. खोकसार इथे शायोक नदीतल्या राफ्टिंग या थरारक अनुभवासाठी सगळे थांबलो. बरेच जणं उत्साहाने गेले. माझा नवरा सुनितही आवडीने गेला. पण मला स्केचेस करायचा मुड होता म्हणून गेले नाही राफ्टिंगला. चार पाच जणं थांबलो तिथेच व्हैलीत. सुरेख हिरवं कुरण, जवळच छानसं रेस्टॉरंट. चरणा-या गाई, बागडणारी गुटगुटीत कुत्र्याची पिल्लं, जांभळी, किरमिजी तुरे असणाऱ्या झाडांची गर्दी, पुर्व-पश्चिमेला तपकिरी-मातकट पहाड आणि डोईवर निळंभोर आकाश आणि शुभ्र ढग. दीडदोन तास कसे गेले कळलच नाही. रसरसून राफ्टिंग करुन गारठलेली मंडळी परतली. गरमागरम चहाचा डोस घेतला आणि निघालो.
आता तर अजूनच वाळवंटी, वैराण असे विस्तीर्ण मैदान लागले. इथे एटीव्ही गाड्या वाळवंटात चालवून बघायची सोय आहे. परत थांबलो. ज्यांना इंटरेस्ट होता त्यांनी त्या गाड्या चालवल्या. मी फोटो काढण्यात आणि स्केचेस करण्यात गर्क झाले. पण इथला विस्तीर्ण रखरखीत परिसर खरोखरच भावणारा होता. आकाशात ढगांची गर्दी होत होती. झटपट मार्गस्थ झालो. व्हैलीच्या काठा काठानेच हा प्रवास आहे.
सो कॉल्ड फॉरेस्टही लागलं. पाणसाठे पण दिसले. प्रतिबिंबीत बर्फांकीत पहाड या पाण्यात फार सुरेख दिसत होते. आता मऊसूत पांढरट वाळूचं रण लागलं. अगदी हाताला लागेलसं. वा-याच्या झंझावातांमूळे एकसारख्या लहरी ल्यालेली काही किलोमिटरपर्यंतची ही मखमली वाळू नजरेला फार सुखद वाटत होती. बालसुलभ उत्सुकतेने या वाळूत येथेच्छ नाचावसं वाटत होतं. डिस्किटला पोहंचलो. अख्ख्या जिप्सा-लेह-नुब्रा प्रवासात लेह सोडलं तर पहिल्यांदा याच गावात सरकारी ऑफिसेसच्या पाट्या, शाळा, पेट्रोलपंप अशा नागरिकरणाच्या खुणा दिसल्या.
संध्याकाळ होत होती. इथे बॅक्टेरीअन उंटांवरच्या सफारी होतात. तडक त्या स्थळी गेलो. नदी पात्रातल्या वाळवंटातच या बेताच्या सफारी होतात. अनपेक्षितपणे बरीच गर्दी. लेकूरवाळे उंटही भरपूर. मी आधीपासूनच उंटावर बसायचं ठरवलं होतं. पण ते दोन मदारीवाले केसाळ उंट, त्यांना सहजतेने हाताळणारे लेचीपेची माणसं, आणि बसलेला उंट उठून उभा रहाताना होणारी आपली तारांबळ. जरा डगमगलेच. पण मग केली हिंमत तरी पण उंटावर बसून अधांतरी होताना बरंच घाबरायला झालं. माझ्या या धांदलीमूळे विनोदाचे एक से एक तारे तोडायला ग्रुपला एक आयतं निमित्तच मिळालं. माझी येथेच्छ मस्करी करत 'वुमन ऑफ द डे' हा किताबही मला बहाल केला गेला.
असो. एकूणातच उंटासह सगळ्यांनाच मजा आली.
इथली झुडपं फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तशीच ती वाळूपण. पण या सफारीच्या नादात वाळूत पाय रुतवायचं राहूनच गेलं. अंधारुन आलेलं. ढगाळलेलं पण. पटापट आमच्या कैम्पिंग टेंटसकडे निघालो. दिवसभराचा प्रवास आणि या ऐडव्हेंचर एक्टिव्हिटीजमुळे सगळेच दमले होते. कापडी तंबूत सामान टाकलं. दाल-भात, चपाती-सब्जीच जेवण केलं आणि झक्कास शेकोटी पेटवून हिंदी-मराठी गाण्यांच्या सुश्राव्य अंताक्षरीने नुब्राव्हैली शतशः पावन केली.
गारठा वाढत गेला आणि जसे जसे शेकोटीत लाकडं सारत गेलो तशी तशी मैफिल रंगत गेली.
या सगळ्या भागात रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत इलेक्ट्रिसिटी नसतेच. त्यामुळे मोबाईल, कैमे-याच्या बैटरीज चार्जिंगला लावल्या तरी अख्खी अंधारी रात्र तंबूत काढावी लागणार होती. आम्ही हेडटॉर्च बरोबर नेला होता म्हणून वेळ निभावली गेली. नसता अवघड झालं असतं.
नुब्राव्हैली लखलखीत स्टार गेझिंगसाठीपण प्रसिद्ध आहे. पण आम्ही होतो तेव्हा ढगाळ हवामान होतं आणि ढग नसते तरी एवढी मजल मारल्यानंतर आम्हीपण किती उत्साह दाखवला असता या बद्दल शंकाच आहे.
आमची परिक्षा पहाणारा हाय एल्टिट्युड नसल्यामुळे अक्षरशः पडता क्षणी बिनघोर निद्रिस्त झालो.
No comments:
Post a Comment