Tuesday, 10 July 2018

लेह दर्शन...४

लेहमधली पहिली सकाळ. खरंतर निवांत उठलो तरी चाललं असतं कारण आज लेहमधेच फिरायच होतं. पण लेहच्या ऊंचीमुळे लवकरच फटफटलं आणि उठलेच. कालच्या ढासळलेल्या तब्येती आणि रात्रीच उशीराने पोहंचणं त्यामुळे हॉटेलकडे चौकसपणे पहायला वेळच मिळाला नव्हता. रुम बाहेर येत कॉरीडॉरमधले सगळे लाईट्स एकेक बंद करत खाली उतरले. सगळीकडे सामसूम. किचनच्या मागे पाणी वाहिल्याचा आवाज येत होता. कानोसा घेत गेले तर तिथलीच एक कन्या वाहत्या पाण्यात पोतं धुवत होती. तिच्याशी बोलतच स्वैपाकघरात प्रवेश केला आणि आधी चहा करायला सांगितला आणि तिथेच तिच्याशी बोलत बसले चहा होईपर्यंत. किचनच्या मागची अडचणीची बाजू. खरकटं पडलेलं. तेवढ्यात एक मागपाई पक्षी दर्शन देऊन गेला. मोबाईलमधे पकडेपर्यंत उडाला देखील. चुटपुट लागली. पण पुढे या हिमालयीन पक्ष्याने वारंवार दर्शन दिले. एवढ्यात औरंगाबादचीच माझ्यासारखी कामसू स्मिता जरीपटके पण स्वैपाकघरापर्यंत चहासाठी पोहोंचली.
मराठवाडी कुठेही जाऊ देत. आपल्या कामसूपणाची झलक दाखवतातच.😉

एकेक जण येत गेला आणि मग हळूहळू आमची पारोशी मैफिलच जमली जणू. हसून खेळून गरमपाणी-चहाचे राऊंडस झाले. तोपर्यंत श्रीनगर अस्वस्थ झाल्याच्या बातम्या आल्याच. आमच्या ट्रिपचा शेवटचा हॉल्ट श्रीनगर होता. वेळ होता तरीही काय कसंचा खल झालाच.
काल ज्यांना जास्त त्रास झाला त्यांच पुढील प्रवासाच मनोधैर्य खचलं होतं. मग डायमॉक्स या हाय एल्टिट्युडच्या त्रासातून वाचवणा-या गोळ्या घ्यायच्या का नाहीत याचाही उहापोह झाला. ज्यानी त्यानी आपापले निर्णय घेतले आणि वाफाळणा-या पाण्याने येथेच्छ शुचिर्भूत होऊन, नाश्ता करुन आम्ही अमंळशा उशीरानेच थ्री इडियटस् फेम रांचो स्कुल पहायला निघालो.

डोंगरांनी घेरलेल्या एका टुमदार व्हैलीत लेह वसलेलं आहे. व्हैली असल्यामुळे प्रसन्न हिरवा झाडोरा इथे भरपूर आहे. गगनाकडे झेपावणारी पॉपलर झाडं फार भावतात. भराभर सरळसोट वाढणारी ही झाडं इथल्या बांधकामाचा बैकबोन आहे असं म्हटलं तरी चालेल.

ड्रंक व्हाईट लोटस नावाची ही जगप्रसिद्ध शाळा. इथल्याच काही मॉन्कसनीलेहमधल्या मुलांसाठी सुरु केली. ऐसपैस परिसरातील या शाळेच आर्किटेक्चर युनिक आहे. भुकंपातही टिकण्यासारखी ती बांधली आहे. 2010च्या भयंकर महापूरात उध्वस्त होऊनही ही शाळा परत ऊभी राहिली. अमीरखानच्या थ्री इडियटस् या चित्रपटाच शुटिंग इथे झालं आहे. याचं पर्यटकांना कोण कौतुक. आणि शाळेलाही त्याच किती कौतुक असावं ? ही शाळा आता रांचोज स्कुल म्हणूनच ओळखली जाते. पर्यटकांना शाळा बाहेर बाहेरुनच बघायची परवानगी आहे. तरी पण चित्रपटातल्या सुसु पॉईंट बघायची सर्वांना अनिवार इच्छा असते हे बघून आश्चर्य वाटलं. इंन्फर्मेशन हॉलमधे रांचो शाळेसंबंधीतले सोवेनियर्स विक्रीला आहेत. तिथेच आपल्याला शाळेत काय बघा या पेक्षा काय बघू शकणार नाहीचच ब्रिफिंग देतात आणि शाळेच्या परिसरात फिरायला सांगतात. एकूणच सदहेतूने सुरु केलेले शाळेचे मार्केटिंग गिमिक्स बघून आम्ही दोघांनी कॅफेटेरीया जवळ केला. आमची वाफाळती झकास कॉफी पिऊन होत नाही तो शाळा बघून(?) इतर मंडळी परतली पण. इथल्याच परिसरात लड्डाखी ड्रेस घालून फोटो काढून घ्यायचा स्टॉलही लागलेला आहे हे विशेष.

तिथून आम्ही थिकसे मोनेस्ट्री कडे वळलो. उंच टेकाडावरची ही पांढऱ्या लाल रंगातली आकर्षण रचना असलेली इमारत लेहमधे शिरल्यापासूनच खुणावत होती. इथे ब-यापैकी चढण आहे. एव्हाना हाय एल्टिट्युड विसरेल्या आम्हाला पायरी पायरीवर दम लागू लागला. हळूहळू पण का होईना आम्ही मोनेस्ट्री चढलोच. दगड मातीचं रुंद जुनं बांधकाम, एकात एक, चढ उताराची अनेक दालनं. भिंती पांढऱ्या तर लाकूड काम लाल-पिवळ्या रंगातलं. सगळीकडे शांतता. आम्हाला अशा ठिकाणी गाईड घेऊन फिरायची सवय आहे. पण इथे ती प्रथा दिसत नाहीये. जो तो पर्यटक आपापल्या मर्जीने फिरतोय. आम्ही खरं अजिंठा-वेरुळवाले तरी इथल्या बुध्दीस्ट प्रार्थना, पूजास्थळी नाळ जुळेना. इथे मुख्यत्वे मैत्रेय, पदमसंभव, अवलोकितेश्वर, तारा आणि दलाईलामांना भजलं जातं. पूजा स्थळी मैत्रेयचे चटपटीत रंगातले मजली पुतळे, झगमगीत कपड्यांचे पडदे, प्लास्टिकच्या फुलांचा येथेच्छ वापर, पाण्याच्या वाट्या, उदबत्त्या, रंगीत बल्ब असा थाट नाही म्हटलं तरी विरसच करतो. पण गहि-या रंगातली ऐसपैस भित्तीचित्र, तिबेटीयन आयकॉन्स कोरलेली, रंगवलेली टेबलं आणि गडद नारिंगी रंगातले हसरे, सौम्य मॉन्कस मनाला भावतात. तसच या उंचीवरन दिसणारं हिरवाईत पहुडलेलं लेहही फार भावतं. इथे ठिकठिकाणी लड्डाखी पताका लावलेल्या दिसतात. निळा, पांढरा, लाल, हिरवा आणि पिवळा अशा पंचरंगी पताका पंचमहाभूतांना आणि मध्य आणि इतर चार दिशांना सिंबॉलाईज करत हिंदू धर्माशी साधर्म्य दाखवतात. इथे गुळगुळीत शिळांवर 'ओम मनी पद्मे हं' हा मंत्र कैलिग्राफिकली कोरुन मंदिराना अर्पण करायची सुरेख प्रथा आहे. हिरण्यच नाव एका शिळेवर तिबेटीयन भाषेत कोरुन घ्यायचा, न्यायचा विचार काळ-वेळ-वजनाच्या गणितामुळे सोडून दिला. विहंगम लेहचे फोटो काढतच खाली उतरलो आणि श्ये पैलेसकडे निघालो.

श्ये पैलेस म्हणजे परत उंचावरचाच पण अतिशय दुरावस्थेतेतलं दगडी निवासस्थान आहे. म्हणजे पुर्वी होतं. खालूनच रंगरुप बघून वर जायची इच्छा होत नव्हती पण आल्यासरशी बघावं आणि चढणाचा परत एक एक्सरसाईझ करावा म्हणून चढलोच या श्ये पैलेसच्या पाय-या. परत एकदा गुंतागुंतीची रचना. विचारायला कुणी नाही सांगायला कुणी नाही. उंचावरन दिसणारं लेह आणि विस्तीर्ण लुसलुशीत हिरवं कुरण परत प्रेमात पाडतं. असल्या दुर्गम आणि चढ उताराच्या जागेतल्या बांधकामाच आश्चर्य वाटतं आणि इथे रहाणं म्हणजे काय खायची गोष्ट नसावी हे देखील पटतं. इथे एकूणच फिटनेसचा कस लागतो.

इथून पुढे आम्ही आधी जेवणं उरकली आणि तमाम महिला बाजारात गेलो. हल्ली शहरी बाजारांचा तोंडवळा उन्नीस बीस फरकाने सारखाच असतो. लड्डाखी हिरवे, निळे दगडी दागिने मोहात पाडतात. मी हिरण्यसाठी तिबेटीयन जीवनचक्र अतिशय बारकाईने पेंट केलेला थांगका विकत घेतला. देखण्या शोरूम मधले लड्डाखी लाकडी टेबलं, बेंचेस, बॉक्सेस कितीही भावले तरी सुज्ञपणा दाखवत खरेदीचा मोह टाळला आणि सायंप्रकाशातला शांतीस्तुपा बघायला निघालो. जपानच्या सहभागाने बांधलेला हा स्तुप नवीनच आहे. इथून उंचावरनं दिसणारं दिवेलागणीनंतरच लोभस लेह, तुडुंब गार वारं आणि इथली जांभळी निरवता भावते. बाकी इथल्या धार्मिक स्थळांशी थोडंफारसुध्दा कनेक्ट होणं मला जमलं नाही.

डिनर नंतर लगेचच तीन दिवसासाठीच्या सामानाची बांधाबांध केली. उद्या आम्ही दुर्गम व अजून ऊंचावरच्या नुब्राव्हैली, पैंगॉंग आणि सुमोरीरी लेकसाठी निघणार होतो.
संभाव्य हाय एल्टिट्युडचा धोका टाळण्यासाठी रोज निदान अर्धी तरी डायमॉक्स घ्यायच ठरवलं. तीन्ही गाड्यांबरोबर तीन ऑक्सिजन सिलेंडरही बरोबर बाळगायचं ठरवून उद्याच्या प्रवासाची उत्सुकता बाळगत निद्रेच्या अधीन झालो.

No comments:

Post a Comment