Sunday, 8 July 2018

कोरा कॅनव्हास.

हिमालयातनं परतले तसा ध्यानी, मनी, स्वप्नी हिमालय आणि हिमालयच होता.
काल मात्र असुरक्षित वाटणारीच स्वप्न सतत पडली.

औरंगाबादेत एक नवीन अद्ययावत आर्ट गैलरी सुरु होत आहे. शहरातले नामांकित मनोविकार तज्ञ डॉ. विनायक पाटील यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ 'मालती आर्ट गैलरी' सुरु केली आहे. म्हणजे गैलरीच ऑफिशियल उदघाटन अजून व्हायचय. पण त्यानिमित्ताने शहरातील चित्रकारांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने एक तीन दिवसीय आर्ट वर्कशॉप ऑर्गनाइझ केलेलं आहे. या प्रोजेक्ट मधे माझा सुरवातीपासूनच माफक सहभाग आहे.
वर्कशॉपमधेही सहभाग आहेच.
पण काहीही म्हणा इतरांना मी कितीही धडाडीची कलावंत वाटले तरी को-या कॅनव्हासला सामोरं जाताना मी डगमगतेच. सगळा आत्मविश्वास गलितगात्र होतो त्या ईझल समोर उभं राहिलं की. ध्यानी, मनी, स्वप्नी मग चित्र काढायचचं दडपणच येऊ लागतं.
बैचेनी वाढते. आ बैल मुझे मारची परिस्थिती आपण पुन्हापुन्हा स्वतःवर ओढवून घेतोय असं वाटत रहातं. थोडक्यात चित्र काढण्याच्या स्वतःच्या ताकदीबद्दल पांढरं निशाणही फडकवलं जात नाही,
ना ही आत्मविश्वास वाढतो. एक त्रिशंकू सारखी अवस्था मात्र अनुभवायला मिळते.
खरंच मी आत्मविश्वासाने चित्र काढू शकेल का ? माझ्या मनातले विचार ताकदीने रंग-रेषांच्या मदतीने मला हवे तसे मांडू शकेल का ?
काही कळत नाही, माहीत नाही. काय होईल माहीत नाही.
पण अशा अनेक न संपणा-या प्रश्नांची प्रश्नावली सोडवण्या एवढा आत्मविश्वास नक्कीच अजून तरी आहे.

No comments:

Post a Comment