Thursday, 5 July 2018

लेह - लड्डाख ट्रिप...३ (जिस्पा ते लेह)

हाय एल्टिट्युडला फार लवकर उजाडतं. कालच्या प्रवासाने आम्ही दमलेलो होतो पण प्रत्यक्षात शारीरिक श्रम काहीच झाले नव्हते. त्यामुळे अगदी ताजेतवाने उठलो. चहा-गरम पाणी घेतलं, इतक्या गारठ्यात आणि आडबाजूच्या बेसिक स्टे सेटअपमधे आंघोळींचा तर प्रश्नच नव्हता. चहा घेऊन तरतरी आली आणि डोळे कुतूहलाने परिसर न्याहाळू लागले. पहाटेच्या प्रहरात हाकेच्या अंतरावरची नदी खुणावू लागली. चारचौघांची तयारी होईस्तवर नदी पात्राकडे तडक धूम ठोकली. स्वच्छ पाण्याची खळखळ वाहणारी भागा नदी. नदीत गुळगुळीत झालेले गरगरीत गोटे, काठांवरच्या महाकाय शिळा प्रवाहामुळे झिजलेल्या आणि शेजारी अवाढव्य पहाड बर्फाच टोपडं घातलेला. रेताड मातीत थोडीफार झाडी. आमचा कॅम्प सुध्दा नदी पात्रातच ठोकल्यासारखा अगदी नदी समतलच. हळूहळू सगळेच जणं नदीकाठावर आले आणि उत्साहाने प्रसन्न फोटो शूटमधे गर्क होऊन गेले.
ग्रुप लिडरने निघा..निघाच्या आरोळ्या ठोकल्या आणि निघालो.
व्हैलीतून घाट चढताना तेही सकाळच्या प्रहरी फार छान वाटतं. मन आणि शरीर टवटवीत असतं, डोळ्यातही कुतूहल चमकत असतं. इथून पुढचा प्रवास हा एकांताकडे आणि रुक्ष, वाळवंटी लड्डाखकडे नेणारा आहे. जिस्पा सोडलं आणि थोड्या अंतरावरच टेकड्यांच्या कुशीत लपलेलं एक तळहाता एवढं सुरेख तळं लागलं. इथेच खुपसारे बाईकर्स भेटले. मला माझ्या मुलाची आठवण झाली. लेह - लड्डाख तरुण बाईकर्सच अगदी हॉट डेस्टिनेशन झालय. उत्साहाने सळसळणारी जबाबदार भारतीय तरुण मंडळी बघून छान वाटलं.
हं..तर तळं बघताच थांबलो. इनोव्हातनं पटापट उतरलो आणि आपापल्या आवडीचे अँगल हेरत त्या टिकली एवढ्या तळ्याचे मस्त फोटो काढले. पटापट गाडीत बसलो आणि निघालो. आणि मग आपल्याला या पटापट चढ उतारामुळे दम लागलाय हे लक्षात आलं. सगळ्यांनी भीमसेनी कापूर जवळ बाळगलाच होता तो हुंगायला सुरवात केली. हाय एल्टिट्युडवर कुठलीही हालचाल सावकाशच करायला लागते नसता आपल्यासारख्या नवख्यांना धाप लागते. हळूहळू परत चढाचा रस्ता सुरु झाला. प्रत्येक मेजर वळणावर निसर्गाचे रुप, डोंगरांचे रंग, खडकांचे आकार बदलू लागले. दिसेल त्या नवलाईचा फोटो काढावासा वाटू लागला पण सततच थांबण शक्य नव्हतं

No comments:

Post a Comment