Thursday, 5 July 2018

लेह-लड्डाख ट्रिप...२ (मनाली-जिप्सा)

दुस-या दिवशी अपेक्षेप्रमाणे लवकरच फटफटलं. ताज्यातवान्या मुडमधे परत एकदा गप्पांची मैफिल जमली. रितसर चहा-नाश्ता करुन जरासं उशीरानेच निघालो. आमच्यातली एक जोडी स्मिता आणि अभय जरीपटके आम्हाला सकाळी जॉईन होणार होते. पण तुडुंब ट्रेफीक जैममुळे त्यांना पोहोंचायला जरा उशीरच झाला त्यामुळे मग आमच्यातल्या काही जणांनी मनालीचा पायीच छोटासा फेरफटका मारला. कालचा पाऊस, मनालीतनं दुथडी भरुन वाहणारी बियास आणि तडाखेबंद पर्यटक यामुळे खुद्द मनाली या हिल स्टेशनचे स्वच्छतेच्या बाबतीत किती तिन तेरा वाजलेले आहेत हे लगेचच जाणवले. जुन-जुलै म्हणजे बहुतांश उत्तर भारत इथेच लोटतो म्हटलं तरी चालेल. इथल्या रोडसवर इनोव्हा, टवेरा आणि एक्सयुव्हीचंच राज्य आहे.
जरीपटके दांपत्य रात्रभराच्या दिल्ली-मनाली बस प्रवासातून दमून आलेले असले तरीही फारसा वेळ न घेता झटपट निघाले आणि आम्ही लेहसाठी रोहतांग पासच्या दिशेने उत्साहाने कूच केले.

मनाली पीरपांजल या हिमालयातल्या पहाडी रेंजमधल्या एका व्हैलीत वसलेलं आहे. आणि अगदी मनाली मध्यातूनच बियास नदी वहाते. पराकोटीच्या पर्यटनामुळे जमिनीलगत जरी गलिच्छपणा जाणवत असला तरी चहुबाजूंचे देखणे पहाड आणि त्यातळीची फर, सायप्रस, देवदारची घनदाट, देखणी, रुबाबदार झाडी मनाला मोहून टाकते. मनाली सोडताच अवघड असा रोहतांग पास चढायला सुरवात होते. एकाच पहाडावरचा अक्षरशः पेन्सिलने झिगझैग रेषा काढावी असा अति वळणदार रस्ता पाहिलाकीच धडकी भरते. त्यात तो खचाखच वाहनांनी भरलेला दिसला की पुढील प्रवासाची चिंता आणिकच वाटते. पण त्याच रस्त्याने सततच जा ये करणाऱ्या रिक्की नावाच्या लड्डाखी ड्रायव्हरने आम्हाला आश्वस्त केले.
वळणदार रस्ते आणि ट्रेफीक जैममुळे मुंग्यांच्या गतीने पुढे सरकणारी प्रचंड वाहतूक म्हणजे आमच्या विनोदाचाच विषय झाली. नशीब उंचावरनं अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य टिपता येत होतं. बर्फांच्या टोप्या घातलेले हिमालयीन डोंगर, त्यांच्या पायथ्यापासची तगडी हिरवाई, गगनात भरारी घेणारे पक्षी आणि गप्पाटप्पांसाठी नवनवीन सहप्रवासी. ट्रैफीक तुंबुनही कंटाळा असा आलाच नाही.
असेच मजल दरमजल करत दोनेक तास गेले आणि मग तमाम महिलांना वॉशरुमची निकड भासू लागली. अरुंद रस्ता, मागेपुढे खेटूनच असंख्य गाड्या, कुठेही आडोसा नाही. भलतीच पंचाईत झाली. शेवटी मुंबई स्पिरिटवाल्या मुलींनी डोकं लढवलं आणि सगळ्या महिलांनी मिळून ओढण्या, स्टोल्स जवळजवळ पडद्यासारखे पकडून आडोसा केला आणि वेळ निभावून नेली आणि स्त्री जातीची मैत्री अजून घट्ट केली.
शेवटी एकदाचा रोहतांग पास आला. इथे सहसा सगळेच प्रवाशी क्षणभर विसावा घेतातच.
मनाली समुद्र सपाटीपासून ६५००+ फुट उंचावर आहे तर  रोहतांग पास १३,०००+ फुटांवर आहे. इथे थंडी-वारं भन्नाटच होतं. म्हणजे हाय एल्टिट्युडच्या तडाखेबंद गारठ्याचा पहिला दणका इथेच मिळाला. परत एकदा वॉशरुमचा तातडीचा गोंधळ आटोपल्यानंतर गरमागरम चहाचे वेध लागले.
जवळच दोन हस-या हिमाचली गृहिणी नखशिखांत हिमाचली पेहरावात चहाचे फ्लास्कस घेऊन आमची मनोकामना पुरी करायला तयारच होत्या. वारेमाप थंडीत, रोहतांग सारख्या अवघड ठिकाणी चटपटीत रंगातल्या फ्लास्क मधला वाफाळता चहा प्यायला खरोखर मजा आली. शकुंतलाबाई आणि सुमनबाई रोज मनालीवरुन ये जा करत इथे रोहतांगला प्रवाशांना चहा विकतात. तोही हसतमुखाने. कशासाठी, पोटासाठी पटलं तरी एवढ्या खडतर रस्त्याने कठीण हवामानातही हे काम करण्याची त्यांची कमाल वाटली.

पुढच्या वळणावर पहाडाची दिशा बदलली आणि खडकाळ रस्ता सुरु झाला. या रस्त्यापुढे रोहतांगचा रस्ता राजमार्गच म्हटला पाहिजे अशी या रस्त्याची कथा होती. खाचखळगे, धुळ, वाहतं पाणी, कोसळलेल्या दरडी, वेडीवाकडी वळणं..गाडी चालकांची कमाल वाटते. नाही म्हणायला चहूबाजूंचे हिमांकीत पहाड सगळा वैताग विसरायला लावतात.
या पहाडी प्रवासात खरतरं आपण फार अंतर पार करतच नसतो पण या महाकाय पहाडांवरच्या वळणावळणांनीच खूप प्रवास झाल्यासारखा वाटतो. वळणावळणांमुळे तेच ते डोंगर इतके सतत दिसत रहातात तरीपण कीतीही फोटो काढले तरी मन भरतच नाही. त्यातही बर्फाच्या शुभ्र झिरमाळ्यांच्या टोप्या घातलेले, ढगांशी लपंडाव खेळणारे भिमकाय निळे-जांभळे डोंगर, मधूनच लख्ख निळं दिसणारं आभाळ, खोल द-या, कपारी तर फारच भावतात. परंतू शेवटी घी देखा लेकीन बडगा नही देखा सारखी परिस्थिती होते आपली. हाय अल्टिट्युडचा थोडा परिणाम जाणवायला लागतो. अति उंची आणि वळणदार रस्ते, साहजिकच डोकं जड होतं, पोटात डचमळायला लागतं त्यात पुन्हा अंधारलं की निसर्ग सौंदर्यही लुप्त होतं आणि मग मुक्कामाचे अंधारी वेध लागतात. मनाली लेहच्या दिर्घ प्रवासात एक ब्रेक घेणं कधीही हिताचं आहे. हाय अल्टिट्युडमुळे इथे अंधारतही उशीराच आणि उजाडतही लवकरच. आम्ही हिमाचल मधल्याच एका व्हैलीतल्या जिस्पाला थांबणार होतो.

जिस्पाला पोहोंचेतो रात्र झालेली. झटपट कापडी तंबूत सामान टाकलं आणि जेवणाकडे वळलो. दुस-या एका ग्रुपने शेकोटी पेटवलीच होती. तिचाही थोडा उबदार पाहुणचार जेवणानंतर घेतला आणि आकाश दर्शनाची सुयोग्य वेळ आणि ठिकाण असूनही अगदी हाताच्या अंतरावरुन वाहणाऱ्या 'भागा' नदीचा रौरव कानात साठवत त्या किर्र अंधारी आणि एकांती परिसरात गुडुप झोपलो.

आज फक्त १३५ किमीचा पल्ला मारला होता, उद्या यापेक्षा जास्त मजल तीही जास्त उंचीवरची मारायची होती. त्यातही तीनचार अवघड पासेस पार करायचे होते. आणि मुख्य म्हणजे आता पुढे हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा संपून बुध्दीस्ट संस्कृतीच खरं लड्डाख सुरु होणार होतं. साहजिकच पुढील खडतर रोड प्रवासाचं औत्सुक्यपुर्ण दडपण होतच तरीपण मैफिल जमने लगी थी और दिलखूश कारवां दिमाग पे छा रहा था.

No comments:

Post a Comment