एखाद्या ग्रुप बरोबर तेही कंडक्टेड टुर करणं हा आमचा पहिलाच प्रसंग होता. पंधरा जणांचा ग्रुप होता. त्यात औरंगाबादचेच सहा जणं होते. आणि त्यातही आम्ही नांदेडहून औरंगाबादला कोटला कॉलनीत रहायला आल्यापासून आमची शेजारीण असलेली शिलाताई देशपांडे/अराध्ये ही आणि तिची मावस बहिण जयुताई या दोघी होत्या. त्यामुळे तसा परकेपणा मुळीच नव्हता. तरी काही मुंबई, पुण्याचे लोकं अनोळखी होते त्यामुळे पुढचे दहा दिवस एकत्र कसे जातील याची जराशी काळजीच होती. आमचा टुर मनाली पासून सुरु होणार होता तरी दोघं वगळता बाकीचे सगळेजण चण्डीगढ एयरपोर्टलाच भेटलो. भेटता क्षणीच सूर जुळले आणि हसी मजाक करत मनालीकडे तीन इनोव्हातून प्रस्थान केले.
चण्डीगढ ते मनाली व्हाया मंडी प्रवास चढाचाच पण सुरेख आहे. गर्द जांभळे-निळे पहाड, हिरवीगार शेती, सुखद हवा आणि नुतन नवलाईच्या गप्पा. कितीतरी मजल कधी मारली गेली कळलंच नाही. चहा-जेवणाच्या हॉल्टवर पुन्हा सगळ्यांशी थट्टामस्करी करत संवाद सेतू बांधले गेले.
या प्रवासात आपल्याला ऐटदार पहाडातून धो धो वहाणारी चिनाब नदी भेटते. मुळातच पहाड आणि नदी हे कॉम्बिनेशनच अफलातून आहे त्यात परत ओथंबलेलं आभाळ, दुर्गम पहाडातली एकांती पण टुमदार घरं, या पहाडावरुन त्या पहाडावर जा ये करण्यासाठी बांधलेले लाकडी पुल, वस्तुंची ने आण करण्यासाठी रोप वेला बांधलेले पाळणे, कायमच दुरुस्तीत असणारे खडतर वळणदार रस्ते आणि काठांवरची लालसर माती घेऊन घनगर्द वाहणारी चिनाब..नजरेचं पारणं फिटवते. विशेषतः पन्डोह या ठिकाणी वाहणारी कमनीय चिनाब फार सुंदर दिसते. सुंदरते बरोबरच किती कठीण परिस्थितीत इथले लोकं रहातात याचंही आश्चर्य वाटतं. रोजच्या रोजीरोटीसाठी, शिक्षणासाठी या रोजच पहाडावरनं, त्या पहाडावर ये जा करणं केवढं कठीण काम आहे नाही ? तरी पण मंडीपासच चित्र बदलतय. मोठ्ठ सरकारी मेडिकल कॉलेज मंडीत सुरु होतय. जवळच्याच प्रशस्त व्हैलीत मोठं एयरपोर्ट येऊ घातलय. मंडीचाच रहिवासी असलेला आमचा कर्नालसिंग नावाचा ड्रायव्हर कौतुकाने मंडीची प्रगती सांगत होता. आणि प्रगती दिसतच होती. दुर्गम भागातलं मंडी इतर भारतीय शहरांचा तोंडवळा घेत झपाट्याने बदलत आहे हे पदोपदी जाणवत होतं.
रस्त्यात एका टी हॉल्टवर राजस्थानी जोडीने रावणहट्ट्यावर राजस्थानी धून वाजवून मनोरंजन केलं.
कुठे हिमाचल, कुठे राजस्थान आणि कुठे ते रावणाचं आवडत वाद्य रावणहट्टा ?
असो.
कशासाठी पोटासाठी म्हणत का होईना पण सांस्कृतिक सरमिसळ मात्र अव्याहत सुरु असते.
मनालीत पोहोंचेपर्यंत अंधारुनच आलं, त्यात पुन्हा पाऊस, थकवा आणि परत उद्यापासूनची ख-या ट्रिपला निघायची तयारी. बहारदार फुलझाडांनी सजलेल्या हॉटेलमधे चेक इन करुन झटपट जेवणं केली आणि निद्रेच्या अधीन झालो.
Wednesday, 4 July 2018
लेह-लड्डाख ट्रिप...१
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment