Tuesday, 3 July 2018

सिंधू

लड्डाखमधून मुख्यत्वे तीन नद्या वाहतात. आपली 'सिंधू' (कोणत्या गधड्यानी तिचं नामकरण इंडस केलय देव जाणे. धरुन मारलं पाहिजे त्याला.) नावातच अवर्णनीय गोडवा असलेली 'झंस्कार' आणि शोक या नावाशी आणि अर्थाशी पण मिळती जुळती असलेली 'श्योक'.
हिमालयातल्या माऊंटन रेंजेस आपण इतक्या वेळा पार करतो ना की दिशा, नद्यांचा प्रवाह, त्यांच वेळोवेळी भेटणं आणि त्यांची नावं लक्षात ठेवणं खरच कठीण आहे. या महारथी नद्यांशिवाय अनेक नदी सदृश्य अनामिक प्रवाह इथे दुथडी भरुन वहात असतात ते वेगळेच.
अखंड खळखळाट करत वाहणाऱ्या या नद्या आपल्या प्रवासाचा अविभाज्य अंग बनतात आणि अक्षरशः मनात घर करतात. त्यात आपल्या हिंदुस्तानला आपलं नाव बहाल करणारी, आपल्याला तमाम जगतात हिंदू म्हणून ओळख देणारी जननी सिंधू म्हणजे आपल्या काळजाचा ठोकाच जणू. लड्डाखमधे पाऊल ठेवायच्या आधीच ठरवलं होतं की come may what सिंधूत पाय धुवायचेच.
रंगबिरंगी अजस्त्र पहाडांमधून अखंड खळखळणारी निळसर हिरवी सिंधू पाहिली की अक्षरशः गहिवरून येतं. सिंधू नदी म्हणजे मैलो गणती भारतात वाहून नंतर पाकिस्तानातून अरबी समुद्राला मिळणारी दुरावलेली आपली मायच जणू.

स्वभावानुसार ज्या ठिकाणी सिंधूत पाय बुडवले तिथला एक भावलेला गोटा उचलला. खरतर या ठिकाणी कुठलेच दगड-गोटे फार भावावेत असे नव्हते, तरी घरी जाऊन त्यावर पेंट करत 'मेरा भारत महान' हे लिहिता येईल असा एक गोटा उचलला. नंतर श्योक नदीतलेही काही दगड उचलले. पेंगॉंग आणि त्सो मोरीरी इथलेही काही आकर्षक दगड उचलले होतेच. ग्रुपमधे या दगडांनी आणि दगडवेचीच्या वृत्तीने हसी मजाकसाठी भरपूर खाद्य मात्र नक्कीच पुरवलं.
प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात वजनाच्या धाकाने दहाबारा दगडातले फक्त पाच दगड टिकले. त्यात सिंधूतला गुळगुळीत गोटा अग्रणी होता.

श्रीनगर एयरपोर्ट. कसून तपासणी. केबिन आणि हैन्ड लगेजच्या गोंधळात चाणाक्ष कैमे-याने दगड पकडले. सिक्युरिटीने ते वजनी दगडं हाताने तोलून मापून ऑब्जेक्शन घेतलच. दोन मोठे दगड काढून टाकावे लागले. त्यात सिंधूतला गोटा गेला. फार हिरमुसली झाले.
कुठे ती अनादी काळापासून वहाणारी सिंधू ?
कुठे यत्किंचित अशी मी ?
कशाला मी कुणाच्या जीवावर उठू ?
हा दगड कुणाच्या डोक्यात घालून मी विमान हायजॅक करणार होते ?
अगदी दुरान्वये देखील माझा या गोष्टींशी संबंध नाही. तरी देखील निर्ममपणे मला ते दोन्ही दगडं टाकून द्यावे लागले.
चलो..वक्त वक्त की बात है.
शायद जमाना हमे सिंधूसे एकबार और मिलाना चाहता है.
हम इंतजार करेंगे.

No comments:

Post a Comment