त्सो मोरीरीहून लेहकडे परतताना सिंधू नदी अखंडपणे तुमच्याबरोबर खळाळत असते. हिमालयातल्या असंख्य वळणांपैकी एका वळणावर गरम पाण्याचे झरे आहेत. गारीगार हवेतल्या गारठून टाकणा-या सिंधूच्या पात्रातच हे उकळतं पाणी भकाभक वाफा सोडत सरमिसळत असतं. तुडुंब गारठ्यात या वाफांचा शेक अंगावर घेण्यासारखं उबदार सुख कुठलच नाही.
तर तिथेच एका घर कम दुकानात ओबडधोबड कार्पेट-गालिचा दिसला. चौकशी केली तर बकरी-मेंढीच्या केसांपासून हाताने बनवलेल्या या गालिच्याला स्थानिक भाषेत चुग्दान म्हणतात. गाडीत बसल्यावर लगेच त्याचा पाठपुरावा सुरु केला. आमच्या रिकी नावाच्या ड्रायव्हरच्यामते हे असे हाताने बनवलेले चुग्दान विक्री साठी नसतात. जो तो फक्त आपल्या घरासाठीच चुग्दान बनवतो. त्यामुळे असा चुग्दान तुम्हाला मिळणं कठीण आहे. रिकीचे बोल खरे ठरले. चुग्दान म्हणजे आपल्या कांबळींसारखं. घरोघर असणार आणि फक्त जत्रेतच मिळणार. मग काय दुधाची तहान ताकावर भागवत टिपीकल बुध्दिस्ट फॉर्मस आणि रंगसंगती असलेलं एक कार्पेट धावतपळत जून्या लेहमधून घेतल. खरी वुल, हाताने बनवलेलं का मशीनवर बनलेलं आहे याचा शहनीशा न करता झटपट हा गालिचा बांधून घेत प्रवासातला वजनाचा धोका मात्र दुप्पट वाढवून घेतला.
लड्डाखमधे वर्षभरच थंडीचा तडाखा असल्यामुळे बकरी आणि याकच्या कातड्यांचा वापर दैनंदिन जीवनात खूप केला जातो. विशेषतः दुर्गम भागात.
छोटी बैठी घरं. छोट्याच खिडक्या, दारं..दगड, कच्च्या विटा आणि लाकडांचा वापर करुन बांधलेली ही घरं कायम कडेकोट बंद असतात. घरभर उबदार गालिचे-चुग्दान पसरलेले असतात. दारांचे पडदे सुध्दा जाड- जाड वुलन ब्लैंकेटस सारखे असतात. माणसं सुध्दा सदैव एकावर एक अनेक कपडे चढवूनच असतात. शेवटचा कपडा म्हणजे डार्क कलरचा उबदार पायघोळ पण जरासा लांडा कोट, डोक्यावर दोनेक टोप्या. सगळा मामला याक आणि बकरीच्या केसांपासून बनलेल्या वुलचा. सध्या लड्डाखींचा उन्हाळा सुरु आहे त्यामुळे ठिकठिकाणी हिवाळी बेगमीच्या शेणाच्या गोव-या छतावर वाळत टाकलेल्या दिसतात. दोनेक ठिकाणी तर याकचं कातडंही गोधडी वाळत घालावी तशी तार कंपाऊंडवर वाळत घातलेलं दिसलं.
इथलं जगणं खरच अवघड आहे.
आहे त्या परिस्थितीत आणि उपलब्ध सामग्रीत आनंदाने जगणं हाच इथला मुल जीवनमंत्र आहे.
No comments:
Post a Comment