मध्यंतरी माझं रिस्टवॉच बंद पडलं होतं. शोरुममधे दाखवलं तर कुठेतरी कार्बन जमा झाला होता तो साफ केला आणि घड्याळजी परत टकाटक सुरु झाले.
लेहसाठी चण्डीगढला पोहोंचेपर्यंत घड्याळजी परत ठप्प झालेले. प्रवासात परत कुठेतरी शोरूम गाठणं शक्य नव्हतं. थोडक्यात घड्याळजींची रवानगी सुटेकेसच्या तळाशी केली गेली.
या ट्रिपसाठी का कुणास ठाऊक पण एकही ज्वुलरी न्यायची इच्छा झाली नाही एक्सेप्ट मोरणी. न कानातले, न गळ्यातले, न बांगड्या बरोबर घेतल्या गेल्या. घड्याळाचाही पत्ता कट झालेला.
खूप पुर्वी ठरवलेलं की लड्डाखला गेलं की तिथल्या सुप्रसिध्द टर्क्वाईज ब्लु स्टोनची खरेदी करायचीच. तसच फिक्कट लालरंगी तिबेटीयन कोरल्समधे पण जीव गुंतला होताच. पण का कुणास ठावूक लेहच्या बाजारात धावत का होत नाही पण दोन तीनदा जायचा प्रसंग आला. तिथे देखील ठिकठिकाणी
ख-या-खोट्या दागिन्यांचे अनेक स्टॉल्स लागलेले असतात. दागिने सुध्दा इतके वैविध्यपूर्ण असतात की मोह पडतोच. याकच्या हाडांपासून बनवलेली युनिक ज्वुलरीही इथे मिळते. पण यावेळेस नाही काही घ्यावसं वाटलं मला.
लड्डाखी भाषेत टर्क्वाईज ब्लु स्टोनला यु स्टोन म्हणतात तर कोरलला चुरु म्हणतात. सहसा सर्व पारंपरिक महिला यु स्टोन, चुरु स्टोन आणि थोडेफार मोती बहुतांशी रिवाजामुळे घालतातच. अर्थात थंडीमुळे इतके कपडे अंगावर असतात की लड्डाखींचे हे ठेवणीतले दागिने आपल्या नजरेस पडायचा प्रश्नच येत नाही.
हं, तर काय सांगत होते मी ?
ठरवल्याप्रमाणे दागिने बरोबरही नेले नाहीत आणि खरेदीही केले नाहीत. विकत घ्यायचा जरासा मोह पडला होता पण निग्रहाने त्यावरही विजय मिळवलाच. घरी आल्यावर सुध्दा दागिने खरेदी न करण्याची चुटपुट लागण्यापेक्षा आपण आपल्यालाच केलेलं प्रॉमिस पाळू शकलो याचं जास्त समाधान वाटतंय.
Monday, 2 July 2018
चुरु.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment