मनाली सोडलं आणि हिमालयावर वाहनातूनच चढाई करताना पुढील अवघड प्रवासाची, दिवसांची जाणीव झाली. 🙄
दिवसभराचा दिर्घ प्रवास करुन मध्यातल्या अनवट ठिकाणी म्हणजे जिस्पाला कैंपिंग टेन्टसमधे थांबलो. उंचावरल्या घाटातला वळणावळणांचा दिर्घ प्रवास करुन खूप दमलो त्यामुळे कानाशीच नदीचा रौरव ऐकू येत असूनही कानाडोळा करत लगेच झोपलो.
इथे फार लवकर उजाडतं त्यामुळे लोळालोळी करुन देखील सहालाच जाग येते. किचनमधे चहासाठी डोकावलो तर या असल्या रंगबिरंगी थर्मासांची जोडी पाहता क्षणीच नजरेत भरली.😍
पिण्याचं गरम पाणी, तयार गरम चहा आणि गरम दुध या साठी हे असे चटपटीत रंगातले, डिझाईनचे फ्लास्क इथे प्रत्येकच ठिकाणी दिसतात. या भागात इतकी थंडी असते की उठल्या उठल्या आणि दिवसभर सुध्दा गरम पाणी पिणे आणि पित रहाणे अशी इथली पध्दतच आहे.
जिस्पाला फार चौकशा करायला वेळ मिळाला नाही पण जसं जसं सर्वत्रच हे चित्ताकर्षक फ्लास्कस् दिसू लागले तसं तसं त्यांच्या बद्दलच कुतूहल चाळवलं गेलं.
शेवटी लेहच्या दोनेक दिवसाच्या मुक्कामी यांचा मागोवा काढला आणि धावत पळत लेहच्या एका जूनाट भागातल्या भांड्याच्या दुकानातून दोन फ्लास्कस् हिरण्यसाठी विकत घेतलेच.😇
असली नाजूक वस्तू प्रवासात सांभाळायची जोखीम होतीच पण आले देवाजीच्या मना तिथे कोणाचेच चालेना.😉
लेहमधल्या हॉटेलातल्या स्टेन्झिंग नावाच्या तरुण कर्मचाऱ्यांने उत्साहाने बॉक्समध्ये थर्माकोल टाकून इतका जबरदस्त बंदोबस्त करुन दिला की हे दोन्हीही फ्लास्कस् सहीसलामत घरी पोहोंचले.😃
ईस्ट लडाखमधे फिरताना शेजारच्या शत्रूराष्ट्रांविषयी फार खुन्नशी हिरीरीने सांगितल्या जातं, पण या चिनी बनावटीच्या फ्लास्कसमधल्या चहापाण्यावरच तमाम लेहच पर्यटन तगतंय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.😜
No comments:
Post a Comment