योगाक्लासहून परत येताना आमची भांडे घासणारीची मुलगी आमच्याच घराकडे येताना दिसली. तिचं आजचं उडत उडत चालणं आणि निखारी रुपडं बघून चकीत झाले.
चौदा वर्षाची शाळकरी मुलगी. दारुडा खवीस बाप आणि कष्टाळू आईची ही दुसरी मुलगी. सकाळीसच कामावर येऊन लोकांची झाडलोटीची कामं करुन शाळेत जाणारी अल्लड मुलगी. मोठी बहीण तीनेक वर्षांनी मोठी. नववीतली वयात आलेली मोठी बहीण. घरात कौटुंबिक स्वास्थ्य म्हणून काही नाहीच. सगळा तारणहार आईच. बहीणीचं अल्लड वय, नवखं तारुण्य...आईने वेळीच मुलीची मानसिकता आणि काळाची पावलं ओळखली आणि बहीणीचं झटपट लग्न उरकूनही टाकलं. ब-यापैकी मुलगा, घरदार पाहून मुंबईत दिलं. पण तिथेही थोड्याफार कटकटी आहेतच. एक कोवळी, हसरी अजाण मुलगी एका षडयंत्री व्यवस्थेला अकालीच बळी गेली.
आता मोठी बहीण गेली तर ही धाकटी आईला मदत करते हल्ली. रोजचं अंगण झाडलोटीचं काम तिचच.
पण आजचं तिचं रुपडं पाहून माझ्याच काळजात लक्कन हलललं. उजळलेला-भरलेला-सुकुमार चेहरा, छानसा लाल पंजाबी ड्रेस, ओढणी स्टोल सारखी स्टायलिशपणे गळ्या भोवती लपेटून घेतलेली, कापलेले, मोकळे केस एका बाजूने खांद्यावर घेतलेले, चेह-यावर लटकणारी लटकी स्वनिर्मित बट..आणि एका तंद्रीतली उडती चाल...बापरे ! ही पोर तरुण होतीये.
खरंतर रोज नजरेसमोर येणारी पोर तरी देखील तिचं आजचं षोडश रुप बघून मीच दचकले.
लिखाणासाठी विषय मिळाला.
मी स्कुटर लावून घरात शिरेपर्यंत मुलीने ओढणी छातीभर गुंडाळून अंगण झाडायला सुरवात केलेली.
अगं.. थांब जरा. मघाशी घेतली होती तशीच ओढणी घे बघू आणि केसही मघाच सारखे घे हं. तुझा एक फोटो घेते. लगेच तयार होऊन दारापुढे उभी राहीली पण.
अरेच्या ! आज फार ढगाळ हवा आहे. फोटो काही चांगला आणि स्पष्ट येणार नाही. इथे-तिथे करत एकदोनदा फोटो काढायचा प्रयत्न केला पण तिच्यावर अंधारच येत होता.
काय गं..सगळा अंधारच दिसतोय.
काकू..बाहेरुन काडा की..बाहेर उजेड हाय म्हणत पोर बाहेर जाऊन उभी पण राहिली...फोटोसाठी.
झकास फोटो काढला. पण तिच्या येऊ घातलेल्या, जाणवू लागलेल्या तारुण्याने मनात खळबळ माचवली. झपाट्याने तारुण्यात पदार्पण करणाऱ्या या मुलीच्या आयुष्यात देखील आता बहिणीसारख्याच आततायी घटना घडतील का ?
जात-धर्म, शिक्षण, गरीबी-श्रीमंती, आहेरे-नाहीरे...कशाचीही पत्रास न ठेवता उमलणारं शरीर, तरुण मनात होणारी भावनिक आंदोलनं या मुलीच्या आयुष्याच्या ओटीत आता काय माप टाकतील बरं ?
लिखाणाला मनस्वी विषय मिळाला, पोस्टीसाठी झकास फोटो पण मिळाला.
एक मातृत्वी काळजी मात्र कितीतरी वेळ काळीज कुरतडत राहीली.
No comments:
Post a Comment