आदरांजली.
आयुष्यात अशा अनेक घटना, माणसं, गोष्टी असतात की त्यांच्याशी आपला तसा काही संबंध नसतो पण तरीही त्या व्यक्तीबद्दल, गोष्टीबद्दल आपल्याला आत्मियता असते. त्यांच्याबद्दलच्या एखाद्या चांगल्या घटनेनी आनंद होतो तर वाईट घटनेनी आपल्याला चुटपुट लागते.
अशीच एक व्यक्ती म्हणजे जन्माने भारतीय असलेली दिवंगत एस्ट्रोनॉट महिला कल्पना चावला.
कल्पना चावलाच एक वैज्ञानिक म्हणून अंतराळात जाणं आणि परतताना स्पेस शटलला आग लागून सर्वांबरोबर तिचा जळून अंतराळातच अंत होणं या दोनच घटनांमुळे कल्पना चावला ओळखीची झाली.
ही घटना घडली तेव्हा मी संसारात गर्क होते. पण या घटनेनी मला कायमची चुटपुट लावली. तिच्या अशा अपघाती मरण्यानी काळजात खरोखर कालवा कालव झाली. अशीच बैचेनी तमाम जगताची परी लेडी डायना गेली तेव्हा आणि मराठवाड्यातले लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे अपघातात गेले तेव्हा मला आली होती. किशोर शांताबाई काळेंनी वंचितांचा जीवन संघर्ष, शिक्षण संघर्ष फार काळजात रुतेल अशा पध्दतीने त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात मांडला आहे. त्यांचही अकालीच अपघाती निधन झालेलं आहे.
कल्पना चावला पंजाब-हरियाणातल्या कर्नालची.
संसारात गर्क असलेल्या, विज्ञानातल्या घडामोडींशी फारसं देणंघेणं नसलेल्या माझ्यासारखीच्या मनात कल्पना चावलाचं जाणं घर करुन इतकं राहिलं की तिचं मुळ गाव कर्नाल आहे हे मी कधीही विसरु शकले नाही.
खरंतर कर्नाल हे गाव नक्की कुठे म्हणजे पंजाब का हरियाणात आणि तेही कुठल्या भागात आहे हे ही मला माहित नव्हतं.
फक्त कल्पना चावला हे नावं, तिची अंतरीक्ष वैज्ञानिक बनायची दुर्दम्य इच्छा, स्वप्नपूर्ती आणि चटका लावणारं अकाली मरणं अगदी काळजात घर करुन आहे म्हटलं तरी चालेल.
दिल्ली-चण्डीगढ रस्त्यावरच कर्नाल हे गाव आहे.
काल त्याच रस्त्याने प्रवास केला.
कल्पना चावलाच्या ऐकीव, वाचीव आठवणींनी पुन्हा मनात गर्दी केली. रस्त्यावर थांबून दोनचार फोटो घेतले. एकही फोटो विषयाशी सुसंगत मिळाला नाही. शेवटी कर्नालच्या विस्तीर्ण आकाशात भरारी घेतलेला एक पक्षी टिपला आणि कल्पना चावलाला आठवत मार्गस्थ झालो.
No comments:
Post a Comment