Monday, 18 June 2018

दिलदार पंजाबीज्...

दिल्लीवरनं बाय रोड 'चण्डीगढ'.💪
(हे असच पंजाबी दणकटपणे लिहायच बरका.) आपल्या आळूमाळ म-हाटीतलं 'चंदीगड' असं सौम्य रुप इथे आलं की भलतच कसंतरी वाटतं हो.🙈

अगदी सकाळीच पुणं सोडलेलं. कसाबसा एक चहा घेऊ शकलेलो. विमानातही आनंदच असतो खाण्याचा. त्यात त्या एयर होस्टेस नामक कठपुतली ललनांच्या नादी विंग्रजीत लागायचय म्हणजे नाही म्हटलं तरी संकटच हो.😦 तरी जुजबी काही तरी खाल्लं. एयरपोर्टच्या बाहेर आलो आणि लगेच टैक्सी मिळाली.
I-we always look forward to meet good and talkative taxi drivers. It helps and gives you a very basic and vital information of the new place. 😜

अगदी तरुण पंजाबी टैक्सी ड्रायव्हर. जरुरी इतकाच बोलका. ट्युनिंग जमल. भैया हमको अच्छी जगह खाना भी है ना. ओरिजीनल हरयाणवी फुड चाहिये. वो पनीर बटर वगरह नही चाहिये. जी..मैम..अच्छे धाबे पे ही रुकेंगे. लेकीन खाना तो पंजाबीही मिलेगा. चलो कोई बात नही. रविवार त्यामुळे झटपट दिल्लीबाहेर पडलो. चण्डीगढला पोहंचताना बराच प्रवास हरियाणातूनच होतो. अगदी थोडा पंजाब मधनं होतो.
सोनिपत, पानिपत..सगळा प्रांत अतिशयच सपाट. दुरदुरपर्यंत कुठेही टेकडी नाही, डोंगर तर नाहीच नाही. खडकांचा तर नामोनिशाण नाही. पांढुरकी-पिवळट रेताड माती. झाडून सगळी बांधकामं विटा-सिमेंटनी केलेली. सपाट गच्च्या. चिंचोळ्या बेंगरुळ इमारती.
आपली गावठाणाकडची दगडी चि-यांची, कौलारु, उतरत्या छपराची घरं आठवताहेत.
रस्ता मात्र एकदम टकाटक.😃

नुकताच पावसाळा हजर झालेला. सखल भागात ठिकठिकाणी चकचकीत उथळ तळी साचलेली. भात शेतीची कामं सुरु आहेत. आणि रस्त्याच्या दुतर्फा भरगच्च पण आठमाप वाढलेली निलगिरीची झाडं. चार तासाच्या प्रवासात निलगिरीचं झाडं दृष्टीपथात नाही असा एकही किलोमिटर गेला नसेल. पण खरोखर फारचं सपाट भौगोलिक प्रदेश दिसतोय हा. पानिपतहून जाताना उगा मनात आलं की आपल्या मराठ्यांना गनिमीकावा करायला स्कोपच नसावा इथे. कसे लढले असतील ?🤔

जेवणाचा ब्रेक रस्त्यालगतच्या शिवा ढाब्यावर.
अवाढव्य ढाबा. साठ-सत्तर मोठी टेबलं मांडलेली. सगळीकडे गजबज. तरी एका काटकोळ्या माणसाने चार्ज घेत बसायला जागा दिली आणि एखादं पुस्तक वाटावं असं वजनदार मेन्यु कार्ड(?) हातात दिलं. मला आपली सवय आहे परक्या ठिकाणी कॅप्टन, वेटरलाच विचारायच इथे काय चांगलं आहे म्हणून. तेही खुलतात, आपलही काम होतं. तसच या व्यक्तीला विचारलं तर तो जो बोलत सुटला की थांबायच नावच घेईन. नमाज को क्या गये, पुरी मज्जिद गले मे पडने को आई म्हटलं तरी चालेल. 😎 थोडंस तारतम्य वापरुन छोले-भटुरा आणि मिक्स व्हेज तंदूर पराठा मागवला. ऑर्डर येईपर्यंत निरिक्षण करत बसलो.
धुम चालणारा ऐसपैस ढाबा. चालवणारेही तसेच दणकट तब्येतीचे. पठाणी ड्रेस घातलेले. दाढीवाले. मिश्यांना पिळ देत बोलणारे गोरेगोमटे, उंचेपुरे, नाकेले, तिक्ष्ण भेदक नजरेचे, वजनी पंजाबी, हरयाणवी माणसं.
आपले मावळे तर फारचं काटकुळे हो यांच्यापुढे.😏 यांच बोलणही दणदणीत आवाजातच.
भल्या मोठ्या थाळीत भलामोठा तंदूर पराठा समोर आला. दोनाचा एकच पराठा केलेला दिसतोय. गरमागरम तंदूर पराठ्यावर साठ-सत्तर ग्रॅमचा पांढ-या लोण्याचा लपका, एक चटणी. गरम परांठ्यावर चुर्र वितळणा-या लोण्याच्या दरवळानेच भुक चाळवली गेली.😋 लगेच छोले भटुरेही आले. टंब फुललेले पण अजिबात तेलकट नसलेले लंबुळके भटुरे.

पंजाब्यांच्या सगळ्याच गोष्टी आडमाप दिसताहेत. ढाबे, टेबलं, थाळ्या, वाट्या, चमचे, ग्लास सगळ्या वस्तू आपल्यापेक्षा दिडपट मोठ्या आणि दुप्पट वजनी.
दह्याची वाटी( म्हणजे वाडगाच होता तो) बघून तर आम्ही हबकलोच. कसं संपवणार हे घट्ट, लपकी दही ?
आपले पुणेकरी चौकोनी कुटुंबीय तर उतत-मातत दोन्हीवेळचा लोटपोट दहीभात खाऊन, आग्रहाच्या वाट्या-वाट्या ताक पिऊन देखील विरजणाला चमचाभर दही शिल्लक ठेवतील यातलं. 😇
दोघही समजून-उमजून हसलो. कुठेही जा. पुणेकर मनात डोकावतातच. असो.
इथल्या पंजाब्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे पर्यटनासाठी. एक माणूस तिघांच्या वाटच खाऊन जाईल. अशी बुमकन आर्थिक परिस्थिती सुधारेल आपली.😍

परत निघालो आणि दिड-दोन तासाने चहासाठी एका ढाब्यावर थांबलो. सेठी ढाब्याचा मालक पंजाबी गायक गुरदास मानचा निस्सीम चाहता आहे म्हणे. अख्खा चारपाच हजार स्क्वेयर फिटचा ढाबा चैत्रगौरीच्या आरासीसारखा बटबटीतपणे नटवून ठेवलेला. छताला डझनांनी पंजाबी डफ टांगलेले. त्यावर धार्मिक, सामाजिक वचनं, विनोद, लाडक्यांचे फोटो, खोट्या फुलापानांच अतिरेकी डेकोरेशन, अखंड गाणी चालू. देवाधिकांचे फोटो, पुतळे. त्यात आपले साईबाबाही विराजमान आहेत बरं.
आपल्या उसाच्या रसाचे जे ग्लास असतात त्यात भरुन चहा आला. बापरे एवढा चहा ? कसा संपवणार हा ?
आपल्या फुटकळ टपरीवर प्लास्टिक कपमधे मिळणा-या चहा इतकी तर साखरच यात असेल. चहा होता मात्र झक्कास. त्यामुळे कधी गटकावला गेला कळलच नाही.

आपलाच देश, आपलेच बांधव तरी पण किती वेगळेपणा आहे आपल्यात-त्यांच्यात. आपल्या-त्यांच्या राहणीमानात-जीवनमानात. ही अशी अनेकता में एकता आणि एकता में विविधता जाणून घ्यायलाच तर आपण बाहेर पडतोना !

टैक्सीत बसताना..मैडमजी..आप अगर हमारी इक गिलास लस्सी पियोगे ना तो दिनभर खानाही नही खा पाओगे.
अच्छा ? चलो कलही ट्राय करते है.

No comments:

Post a Comment