Sunday, 17 June 2018

खिडकी.

विमानात काय अन रेल्वेत काय अन बसमधे काय प्रवासात असताना खिडकीजवळ बसायला कुणालाही मनापासून आवडतं. त्यातही विमानात तर अजूनच. बर्डस् आय व्ह्युने खालची आजपर्यंत फक्त कागदी नकाशांवरच पाहिलेली भौगोलिक लॅन्डस्केपस तर कीतीही वेळ भान हरपून बघत राहिलं तरी मन भरतच नाही. आत्तापर्यंत अभ्यासलेली गावं, डोंगर, नद्या, धरणं आठवायची आणि हे गाव दिसतय का, ही तीच नदी आहे का असा मनोहारी खेळ खेळत बसायचा तर मला भारी छंद आहे. भरीसभर अधूनमधून ढगांचाही लपंडाव असतोच मन रिझवायला. So always look forward for window seat.

नेमकी आज विंडो सीट नव्हती. तरी मनात ठरवून ठेवलच होतं की आलं कुणी शेजारच्या खिडकीजवळच्या सीटवर बसायला तर विचारायचच की मी बसू का खिडकीजवळ म्हणून.
एवढ्यात जागा शोधत पंचवीशीतला एक काटकोळा मुलगा आमच्या रोजवळ आला.
त्याला खिडकीजवळ जाऊ द्यायच्या आधीच मी घाईने त्याला विचारलं की, मै बैठू विंडो सीटपर ?
जी..नही..मै फर्स्ट टाईम प्लेन में बैठ रहा हू. मुझे मेरी विंडो सीट चाहिये.
Oho..thats great. पहली बार एयर जर्नी कर रहे हो तो आपनेही बैठना चाहिये. You ought to have a window seat. प्लीज बैठीये..and enjoy.
तो तरुण अगदी लहान मुलासारखा खुशीत होता. खूप साध्या बैगराऊंडमधला वाटत होता. पहिल्यांदा विमानात बसण्याचा मासूम आनंद देहबोलीतनं अगदी ओसंडून वहात होता. दोनचार वाक्यांची देवाणघेवाण होईपर्यंत विमानाने रन घेतला आणि सुंग करत आकाशात झेप घेतली आणि इकडे या तरुणाने स्वतःच स्वतःला थंब्स अप करत शाबासकी देऊन टाकली. पटकन मोबाईल काढला. भराभर फोटो काढले. खालची लेन्डस्केपस डोळे फाडफाडून बघू लागला. त्याला तो विमानात बसल्याचा, बसू शकल्याचा इतका अवर्णनीय आनंद झाला होता की कुणाशी बोलू आणि कुणाला सांगू असं त्याला झालं होतं. मीही खालची लैन्डस्केप्स वगैरे विसरुन नव्यानेच पंखात बळ आलेल्या एका स्वप्नाळू, होतकरु तरुणाला निरखण्यात दंग होऊन गेले.
आंटी..ये हवाई जहाजका स्पीड क्या होगा ? या प्रश्नाने संवादाला सुरवात झाली.
हरियाणाच्या एका खेड्यातला राजेंदर यादव. एयर फोर्समधे एयरमन म्हणून सिलेक्ट झालाय. नौकरीतलं पहिलं ट्रेनिंग संपवून सुट्टीसाठी घरी निघाला आहे.
Absolutely thrilled by his new job and  lifes first flight journey back home.

वेळ सकाळची होती. विमानात ब्रेकफास्ट कसा मागवायचा याच्या विषयी त्याच्या मनात गोंधळ होता. थोडसं मार्गदर्शन केलं आणि मग आमच्या गप्पा रंगल्या.
ग्रामीण भागातला मुलगा. ग्रेज्युएट झालाय. मनासारख्या नोकरीचही टिपण जमलय. पहिलीच सुट्टी मिळाली आहे. घरी जायची उत्सुकता आहे. विमानप्रवासाचही कौतुकच आहे. पंखात बळ आलय. मनाला उभारी आलीये. त्याच्या डोळ्यातली चमक, चेह-यावरच हसू आणि बोलण्यातला आनंद बघून आम्हीही हरखून गेलो. बोलताना सतत खिडकी बाहेरच्या दृश्यांचे फोटो काढतोय. फोटो काढताना निरागसपणे मनमोकळं बोलतोय.
त्याच्या मोबाईलची स्क्रीन छिन्न-विछीन्न झालीये असं दिसतय. अब घर जा रहा हूं ना. कल मेरा नया मोबाईल आ रहा है. नोट फाईव्ह लिया है. पुन्हा एकदा आनंदाची उकळी. कमिशन्ड ऑफिसर व्हायच स्वप्न बघतोय. ट्रेनिंग बद्दल भरभरुन हरयाणवी टच असलेल्या हिंदीत बोलतोय. फारसं जग पाहिलेलं नाही, माहितही नाही.
तरी पण या निरागस तरुणानी मनात घर केलं.
आपल्या मुलासारखाच हा मुलगा. खिडकीची जागा नाही मिळाली याचा काकणभरही विषाद मनात राहिला नाही. उलट या धडपडणा-या तरुणाशी बोलून मातृत्वी मनात कीतीतरी हळूवार तरंग उमटत राहिले.

No comments:

Post a Comment