Friday, 15 June 2018

मराठवाडी गडगीळं निघाली लड्डाखला.

लड्डाखला जातोय. मुळात दुर्गम लड्डाखला पोहोंचणच फार दूर पडतं. त्यात पुन्हा तिथले साईट सिईंगचे पॉईंटस म्हणजे अजूनच दुर्गम आणि महाकाय हिमालयाला वळसा घालून जावे लागणारे. अतिशय खडतर रोड. मनुष्य वस्ती जवळजवळ नाहीच. साहजिकच प्रवासातल्या दुपारच्या जेवणाचे हालच होणारहेत. मैगी वगैरे मिळतं म्हणे पण मला मैगीने एसिडीटी होते. मग त्यावरचा उपाय म्हणून खमंग चिवडा, कणकेचे शंकरपाळे आणि कणकेचीच आमची मराठवाडी कमी गोडाचे गडगीळं करुन घेतली.
मुलाने हे पाहिलं आणि आ..ई..असं म्हणत एक उसासा सोडत तो बाजूला झाला. असो आमच्या तब्येती आणि मानसिकता आम्हालाच ठावूक.

गडगीळं.
कणकेत गरम तेलाच मोहन टाकून कणीक घट्ट भिजवून घेणे. फोटोत दाखवलेत तसे लंबुळके गडगीळं वळून घेणे. नंतर ही गडगीळं तेलामधे मंद आचेवर खुटखुटीत तळून घेणे. नंतर एका मोठ्या कढईत अंदाजे साखर घेणे. साखर अगदी बेतानेच बुडेल असे पाणी टाकून सतत हलवत राहून साखर विरघळून घेणे.
अगदी दहा टक्के साखर विरघळायची राहीली की ही तळलेली गडगीळं त्या पाकात टाकणे. गैस लगेच बंद करणे आणि गडगीळं सतत हलवत राहून साखरेचा पाक प्रत्येक गडगीळाला लागेल असे बघणे. एक पाच दहा मिनीटात पाक सर्वत्र लागलेली गडगीळं थंड होतात. थंड झाली की त्यावर लागलेली साखर परत क्रिस्टलाईज होते. कढईत परत साठ-सत्तर टक्के साखर उरतेच.  अगदी झटपट ही खुटखुटीत आणि गोडसर गडगीळं खायला तयार होतात.
ग्रामीण भागात मिळणाऱ्या गोडीशेवे सारखाच हा पदार्थ आहे.
गडगीळांची जमेची बाजू म्हणजे. कणकेचे आहेत. साखर, बीन साखरेचेही छान लागतात. आणि गोडसर असूनही फार कमी साखर लागते यांना. म्हणजे पाक करताना जरी बेताने साखर घेतली तरी त्यातलीही बरीच क्रिस्टलाईज्ड साखर परत कढईत उरतेच उरते. गडगीळांची कृती वाचताना शंकरपाळ्यांचीच आठवण नक्की येईल. पण शंकरपाळ्यांपेक्ष्या निम्मी साखरपण या गडगीळांना लागत नाही हे त्याचं विशेष आहे.

मराठवाड्यात बरेचजणं ही गडगीळं गुळाच्या पाकातली पण करतात. माझा हात साखरपाकावर बसलेला आहे म्हणून मी साखरच वापरते.
मुलानी आत्ता जरी नाक मुरडलं असलं तरी माझ्या मुलांनी शाळकरी वयातल्या सगळ्या ट्रिप्स या मराठवाडी गडगीळांसोबतच केल्या आहेत आता मीही तोच पदार्थ लड्डाखला नेत आहे.

No comments:

Post a Comment