Thursday, 14 June 2018

फोन आहे पण घरीच असतो. नवरा कामावर फोन वापरु देत नाही म्हणजे आपल्याला त्या फोनचा कामाच्या सोईसाठी उपयोगच नाही.
सकाळचं करकरीत उन फरशीवरनं तिच्या चेह-यावर पडलेलं. थांब तशीच फोटो काढते तुझा. अगं जरा हास की खळखळून.. काकू..आता फोटो कशापायी ? अगं फार सुंदर लाईट पडलाय तुझ्या चेह-यावर. खळखळून हसत..
आता बाई..
परत कामाला लागली. जरा वेळाने..
काकू..फोटू काढला तं काढला पन त्यो वॉटसेपवर टाकू नगा बरं ?
कागं..नवरा रागवतो का ?
मंग..लगी धांगोडाच करतो तो. कुटं जाती, काय करीती म्हनून. आता पेना-याच डोकं कसं चालते ते मैती ना तुम्हाला ?
अगं तुझा तं नंबर पण नाही माझ्याकडे, कसं काय टाकू व्हॉट्सऍपवर.
नंबर लागते का त्येला ? पन मग माझ्या भावाकडं, भावजयीकडं आहे की फोन आन् वॉटसेप ? कळल त्याला. त्यांच्या फोन वर जाईल की माजा फोटू.
व्हॉट्सऍपच्या वापरा बद्दल एकदमच अनभिज्ञ असलेली तरुण महिला आपला फोटो नव-यापर्यंत पोहोंचला तर काय या धाकानेच इतकी विचलीत झाली की स्वतःचा फोटो पहायचा देखील विसरुन गेली.

संसार करताना-निभावताना अक्षरशः दुधारी तलवारीवर चालणा-या या समस्त तरुणी.
अक्षरशः या वर्गातल्या घराघरात दारु पिणारे, संशयी, छळणारे निकम्मे नवरात्मे असतात. हातावर पोट असणारे. काम लागलं तर स्वतःच्या पैशाने दारु पिऊनच घरी येणारे आणि काम नाही लागलं तर संशयाचं पिशाच्च सोबतच घेऊन घरी बसणारे. म्हणजे या नवरोजींना काम लागलं तरी बोंब नाही लागलं तरी बोंबच असते.
काय करता काकू, आपल्या लेकरांकडं बगायचं आन् या बाबाला सांबाळायचं. आपन आपले कष्ट करावे आन घर सांबाळावं. याला हाकल्लं तर दुसरे चारजनं घरात डोकावतेत. त्यापेक्षा हा बरा. लेकरांकडं बघून कदीतरी सुदरलं अशी आस लावाची आणि आविश्य रेटाचं. मला तं लगी ह्यो कामाला गेला त बी धस्स व्तय आन बिगर कामाच घरला बसलं त बी टेंसन असतया.

No comments:

Post a Comment