धोबीणीच्या वहीवर कपडे देताना तारीख लिहिली १३ जून. आणि लक्षात आलं अरेच्या काल बाबांचा वाढदिवस होता. This is the first time that I have forgotten his birthday after so many years.
माझ्या वडिलांनी त्यांच्या तरुणपणी कींवा आई असेपर्यंत कधी वाढदिवस सेलिब्रेट करुन घेतल्याच मला आठवत नाही. पण आई अचानक गेल्यानंतरच्या अस्थिरते नंतर आम्ही बाकीची भावंड जेव्हा स्थिरस्थावर होत संसाराला लागलो आणि कुटुंब पुन्हा बालगोपालांनी भरुन गेलं तेव्हापासून मात्र आम्ही बाबांचे वाढदिवस आवर्जून साजरे करु लागलो.
खरतर वाढदिवस साजरा करणे, जेवणखाणाची धम्माल करणे या पंथाचे ते मुळीच नव्हते. पण त्यांच्या आयुष्यातली पोकळी आणि एकापाठचे स्थानिक उत्साही नातवंड यामुळे त्यांना उत्तर आयुष्यात वाढदिवस सेलिब्रेट करायला खूप आवडायला लागलं होतं. अगदी घरगुतीच कार्यक्रम असायचा.
मी आणि दोन्ही भावजया एकेक पदार्थ करायचो, संध्याकाळी एकत्र जमायचो. जेवण करायचो. बहुतेक वेळा सुट्ट्या संपत आलेल्या असायच्या त्यामुळे मुलं दिवसभर धुडगूस घालायची. मग जेवणानंतर बाबांतर्फे आईस्क्रीम असायच. अख्ख चार लिटरचं आईस्क्रीम मुलं हातोहात संपवत आम्हाला चकीत करायची. निमित्त वाढदिवसाचं पण आपली मुलं, नातवंड, जावई, सुना एकत्र हसत खेळत बागडताना बघून बाबा मनापासून खुश व्हायचे, खरोखर तृप्त वाटायचे.
असं फारसं अवडंबर न करता एकत्रीतपणे साजरे केलेले त्यांचे वा आमचे देखील वाढदिवस त्यांना इतके आवडायचे की कधीही, आमच्या पैकी कोणाचाही वाढदिवस साजरा करायला ते तयारच असायचे.
उन्हाळी सुट्ट्यांच मावंद म्हणून आम्ही त्यांचा वाढदिवस अगदी आवर्जून साजरा करत असू.
त्यामुळे जून महिना म्हटलं की आजोबांच्या बरोबरीने नातवंडही या वाढदिवसाकडे डोळे लावून बसत असत.
आता बाबाही गेले. मुलही उन्हाळी सुट्ट्यांच्या चक्रातून बाहेर पडली आहेत.
तर आत्ता लक्षात आलं बाबांचा काल वाढदिवस होता म्हणून.
खरंतर दिवंगत व्यक्तींच्या आठवणींच आपल्या आयुष्यात नेहमीच तळ्यात-मळ्यात असं रुंजण चालू असतं.
जन पळभर म्हणतील हाय हायचे दाखले देखील कायमच मिळत असतात. तरीपण अशी एखादी ह्रद्य आठवण मनातून निसटली की काळीज विध्द झाल्याशिवाय रहात नाही.
Wednesday, 13 June 2018
१२ जून.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment