आपल्या रोजच्या जगण्यात जरी आपण जातीयवाद, धर्मीयवाद करत नसलो तरी येनकेनप्रकारेण आपण आपल्याच धर्मबांधवांमधे, जातीबांधवांमधे जास्त परिचित असतो, सख्य बाळगून असतो. मुद्दाम असं नाही पण हे असच घडतं. नेमके ईद, क्रिसमस, नवरोज, नानक जयंती हे सण आले की मोबाईलवरन शुभेच्छा पाठवताना लक्षात येतं की अरेच्या या धर्मातल्या फार कमी लोकांना आपण ओळखतो म्हणून. म्हणजे तोंडदेखली ओळख खूप जणांशी असते पण त्यांच्या धर्मातील जिव्हाळ्याच्या सणावारी आवर्जुन फोन करावा, व्यक्तीशः भेटून शुभेच्छा द्याव्यात असे फार कमी लोक आपल्या नजीक असतात. अर्थात त्यात तुमचा-त्यांचा स्वभाव, रहायची जागा, व्यवसाय, गाव अशा ब-याच गोष्टींचा परीणाम होत असतो. म्हणजे मला तरी अशा इतर धर्माच्या सणावारी हे फार जाणवतं की अरे आपण फार काठावरनंच जगतो आहोत अजून. सण आला की दोन दिवस चुटपुट लागते. सण संपला की विसर पडतो आणि आयुष्य मागील पानावरनं
दुस-या पानावर सरकते.
गेली अनेक वर्ष मी रमजानच्या दिवसात आमच्या औरंगाबादेत लागणा-या मीना बाजारात जाते, मुस्लिम समाजाच्या रात्रीच्या खाद्य जत्रेतही जाते. तर एवढ्यातच औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या सदस्यांबरोबर या खाद्य जत्रेत सामील झाले होते. मजाच आली.
मग जरा फेसबूकवरही या अनुभवा विषयी रसभरीतपणे लिहून झालं. वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला. शहरवासीयांनी फुड हेरिटेज वॉकची आयडिया उचलून धरली. शहर पर्यटन वाढीसाठी अशा कन्सेप्ट अमलात आणाव्यात असं सगळ्यांना वाटून दोन तिन हिंदू-मुस्लिमांनी ही पोस्ट कौतुकाने शेयर केली तर मुस्लिम बांधवांच्या फ्रेंड रिक्वेस्ट्सचा अगदी पाऊस पडला फेसबुकवर. रोज सकाळी नेट ऑन केलं की पंधरा वीस रिक्वेस्टच नोटिफिकेशन असतच हल्ली. एकही कॉमन फ्रेंड नसलेल्या या रिक्वेस्ट्स स्विकारणही खरोखर अवघडच आहे.
पण आपल्या मुस्लिम धर्मातल्या एका सामाजिक प्रथेवर एका हिंदू महिलेने लिहिलेले कौतुकाचे चार शब्द वाचूनच मला तत्परतेने रिस्पॉन्ड करणारे मुस्लिम बांधव बघून मलाच आश्चर्य वाटलं.
No comments:
Post a Comment