Saturday, 9 June 2018

Aurangabad History Society.

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी तर्फे सतत शहरातले हेरिटेज वॉक्स सकाळच्या वेळी आणि सोयीच्या रविवारी अरेंज केले जातात. चारशे वर्षाचा इतिहास असलेल्या, मुगल साम्राज्याचा सर्वेसर्वा असलेल्या औरंगजेबाच्या आसपासच्या काळातील अनेक मॉन्युमेंटस् औरंगाबाद परिसरात आहे.
आज जरी औरंगाबाद-मराठवाडा मागासलेला म्हणून हिणवला जात असला तरी प्राचीन हिंदू, मुस्लिम, बुध्द संस्कृतींच्या खाणाखुणा इथे भरपूर आहेत.
एकेकाळी मुगल साम्राज्याचं हे दक्षिणेतलं देखणं व संपन्न शहर होतं. त्यामुळे दर्गे, मस्जिती, मंदीरं, सराया, महलं, दरवाजे, तटबंद्या, मकबरे अशा वास्तुंची इथे रेलचेल आहे.
इतिहास या विषयात तज्ञ असलेल्या आणि औरंगाबादवर जीवापाड प्रेम करणा-या आसामींनी या वॉकच्या निमित्ताने शहरवासीयांमधे कुतुहल आणि प्रेम नक्कीच या हेरिटेज वॉक्सच्या माध्यमातून जागरुक केलं आहे.
या वॉकला नियमितपणे येणारेही खूपजणं आहेत. त्यामुळे ब-याच जणांशी छान मैत्री झाली आहे. व्हॉट्सऍपवर हेरिटेज ग्रुपही तयार झाला आहे.

सध्या रमजान सुरु आहे. औरंगाबाद म्हणजे छोटसं टुमदार गावं आहे. हितशत्रुंनी भलेही कितीही हिंदू-मुस्लिम दंगली पेटवल्या तरी सुजाण नागरिकांमधे एकोपा आहे. मुस्लिमांच्या बरोबरीने हिंदू नागरिकही रमजान आणि त्या निमित्ताने जून्याभागात भरणा-या खाद्यपदार्थांच्या सायंकालीन जत्रेत सामील व्हायला उत्सुक असतात.
व्हॉट्सऍपवर चैटिंग करतानाच बुडीलेनमधे हेरिटेज फुड वॉक काढायची टुम निघाली.
झट ठरलं पट निघालो देखील. शहरातल्या जुन्या भागातील जामा मशिदीजवळील नेहरू भवन इथे सगळे संध्याकाळी ७.३०ला जमले. त्याच परिसरात फिरत आशरु खाना पाहिला. भटियार गल्लीत फिरलो. नान बनवणा-या धगधगणा-या भट्ट्या पाहिल्या. एक्सपर्ट नान बनवणा-यांशी गप्पा मारल्या. रमजाननिमित्त झगझगीत झालेल्या जुन्या अंधा-या चिंचोळ्या गल्ल्या. नीचे दुकान, उपर मकान.
उपरवाले मकानसे शरमाते हुवें झांकनेवाली खालायें. रस्त्याने आमची कुतुहली टोळी.
हॉटेलवालेही उत्सुकतेने बघणारे. आईयें..आईयें म्हणत कबाब, बिर्यानी, फालूदा, ताहिरी, जिलेबी, बेकरी पदार्थ खाऊन बघण्याचा आग्रह करणारे. आमचीही टोळी मोठी होती आणि मुस्लिम बांधवाचीही इफ्तारची वेळ झालेली. सगळं वातावरण झगमगलेलं, चैतन्याने सळसळणारं. खाण्यापेक्षाही या उत्सवी गल्ल्यांमधे फिरुनच पोट भरलं.

खरच किती छान वारसा आहे आपला. विविधता मे एकता. भगवा काय हिरवा काय ? जगण्यातल्या संघर्षातून जमेल तसा आनंद लुटणारे मानवी जीव आपण. उगाचच भांडत बसतो नाही ?

आपल्याला परिचित नसलेले अनेक पदार्थ जाणून घेणे, त्यांचा इतिहास, खासियती समजून घेणे, इच्छा असल्यास पदार्थ चाखून बघणे, त्याच कौतुक करणे..आनंद अजून काय वेगळा असतो हो ?

मैत्रीणींबरोबर चारसहा पदार्थांचा आस्वाद घेईपर्यंत बरीच रात्र झालेली. परिसर अजूनच उजळलेला.
शहराच्या टुरिझममधे नक्कीच एक ठोस भुमिका बजावू शकेल असा हा माहौल आहे. शासनाने लक्ष घालून जर वर्षभरासाठीच हा उत्सवी माहौल कायम राहील याची जर तजवीज केली तर या शहराला आणि भायतीय सहिष्णूततेला नक्कीच चारचांद लागतील.

No comments:

Post a Comment