Wednesday, 6 June 2018

शिदोरी.

पावसाळा आला की गरमागरम भाकरी, ठेचा, मऊशार भात, मेतकूट, कढीची स्वप्न पडायला लागतात. हवेतल्या फरकाने सैपाकघरातही कर्तृत्वाच स्फुरण चढतं.
तर आज हिरव्या मिरच्यांचा ठेचा केला. जसं आपल्या लेकराला सांभाळायला दिवसभराची जरी बाई ठेवली तरी बाळाला न्हाऊ घालणं, अंगडं-टोपडं चढवणं, भांग पाडणं हे ह्रदयापासून आपल्यालाच करावसं वाटतं. तोच प्रकार स्वैपाकाच्या काही पदार्थांच्या बाबतीतही खरा असतो.
आता व्यक्तीपरत्वे पदार्था वेगवेगळे असू शकतात. तरी पण सुक्या-कोरड्या चटण्या, वांगे-शेवेची भाजी, वरणफळं, थालिपीठं, पुरणपोळी, कणकेचा शिरा असे एक ना अनेक पदार्थ एकेका गृहिणीची खासियत असते. घरातल्यांनीही त्या पदार्थांचा बेमीसाल सरताज तिला सन्मानाने बहाल केलेला असतो. मग तीही माऊली बिचारी सगळं प्रेम, आत्मीयता पणाला लावून तो पदार्थ आपल्या कुटुंबीयांसाठी आवडीने करते आणि आयुष्यभर करत रहाते.

तर ठेचा करायला १२-१५ पोपटी मिरच्या घेतल्या. तव्यावर चमचाभर तेल टाकून परतायला ठेवल्या. त्यातच १०-१२ लसूण पाकळ्याही टाकून झाकून वाफवून, परतून घेतल्या. (काही जणं अशा गरम तव्यावरच चिरलेली कोथिंबीर व जिरे पण परतायला टाकतात) काही जणं मिरच्या आधी गरम तव्यावर वाफवतात, मग तेल टाकतात. काही जणं लसूण कच्चाच वापरतात. काहीजणं मुठभर भाजलेले शेंगदाणे पण एकत्र परतून घेतात.

तर मिरच्या-लसूण चांगलं परतल्यावर दगडी खलात ते मिश्रण आणि कोथिंबीर, मीठ टाकून दणदण बत्ता चालवून ठेवा चांगला एकजीव वाटून घेतला आणि लगेच जेवायला बसले. गरम भाकरी-पोळीबरोबर हा ठेचा झक्कास लागतो.
रंगरुप, चव तर खणखणीतच असते.
पण तमाम भारतीयांचा, गरीबातल्या गरीबांचा, भारतीय शेतक-यांचा, आपल्या पुर्वजांच्या रोजच्या आहारातला एक अत्यंत प्राथमिक पण रुचकर पदार्थ दगडी खलबत्त्यात वाटताना खरोखर बारा हत्तींच बळ मिळतं आणि खाताना तर या मातीशी ईमान राखल्याचं अवर्णनीय असं समाधान मिळतं.

तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा,
दगडी खलबत्त्यात हा ठेचा वाटणं आणि खाणं म्हणजे तुमची मातृभुमीत रुजलेली पाळंमुळं अजून खोलवर नेण्यासारखं आहे.
करुन बघा आणि अनुभव घ्या.

No comments:

Post a Comment