जसं नुतन जावई घरी येणार म्हटलं की सासुबाईंची जशी धांदल उडते तशीच धांदल हा पाऊस आला की आपली तरी उडते बुवा.
एक तर हवेत होणा-या अमुलाग्र बदलानीच आपल्या चित्तवृत्ती खुलतात. दहा हत्तींच बळ अंगी येतं. तरल मानसिक अवस्था अनुभवायला मिळते. काय करु आणि काय नको अस्स होऊन जातं बाई.
पडत्या पावसात हिरण्यच प्लान्टेशन हा सगळ्यात मोठा वेळ आणि एनर्जीखाऊ प्रोजेक्ट राबवायचा असतो.
बीया, रोपं, खड्डे, माती, कटिंग्ज, कुंड्या, छाटणी..अक्षरशः कामांची जंत्रीच लागते.
घरातलं म्हणालं तर गरमागरम पदार्थ करावेसे वाटतात, खावेसे वाटतात. मेलं स्वैपाकातही डोकं इतकं चालतना या दिवसात की रात्र थोडी सोंग फार असं होऊन जातं अगदी.
उरलंसुरलं शिवण उरकावसं वाटतं. भरतकामाच्या आयडियाज भरभरुन सुचतात. घर आवरायचं स्फुरण चढतं. डोक्यात पेंटिंग्ज घोळायला लागतात.
दुर दूरपर्यंत अखंड फिरायला जावसं वाटतं. गेलाबाजार अजिंठा-वेरुळची एक तरी वारी आहेच आहे. या दिवसात निसर्ग इतका निथळागौरीसारखा मनोहारी असतो ना की तडक फोटोग्राफीसाठी बाहेर पडावसं वाटतं. पुन्हा फेसबुकवर तत्कालीक पोस्टींचा रतीब. म्हटलं तर तेही एक व्रतच आहे ना ?
In short you get flooded with end less ideas.
म्हणजे अख्खा मे महिना पाहुणे येणार येणार जपत बसायच, आल्यावर काय काय करायच ते ठरवायचं आणि वेळ आली की पाहुणे येतात कधी आणि जातात कधी अक्षरशः कळत नाही.
पुन्हा यायचा वायदा करत अळवावरच्या पाण्यासारखा पावसाळा कधी हातून निसटतो कळत देखील नाही.
No comments:
Post a Comment