छोट्या शहरात घरगुती कामं करणा-यांचा खरच प्रॉब्लेम असतो. कुठलीही शिस्त, जबाबदारी नसते त्यांना. कामावर आल्या तो दिवस आपला म्हणायचा. त्यात उन्हाळा म्हटलं की त्यांच्या कहरी घरगुती घडामोडींच पर्यावसान कामं सोडण्यात होतं. तर असच माझ्याही एका बाईने काम सोडलं. मे महिना तसाच दुस-या महिलांच्या भरवश्यावर धकवला. आणि एक तारखेपासून नवीन कामवाली लावली.
आमचं घर दुमजली आहे त्यामुळे नेलकटर्स, कात्र्या, स्टेपलर्स, स्क्रू ड्रायव्हर्स सतत खालीवर फिरत असतात. बरेचदा नेमक्या कामाच्यावेळी सापडत नाहीत. तर परवा टाचण्या, युपिन्स आणल्या आणि त्याची खालच्या व वरच्यासाठी विभागणी करुन ठेवताना या नवीन महिलेशी गप्पा मारत होते. अर्थात कामावर घेतानाच जुजबी चौकशी झाली होतीच. पण का कुणास ठाऊक आज भडभड बोलत होती.
काय सांगू ताई..शिक्षण नाही मला. वडील लहानपणीच गेले. आम्ही दोघी मुलीच आईला. मग माझं लग्न लवकरच केलं बघा आईनं. नवरा पण आठवी नववी शिकलाय माझा. काय उपयोगे शिक्षणाचा ?
दारु पितो, भांडतो, कटकट करतो, कामंधामं निट करीत न्हाई. लयी त्रास देतो. माझ्यापाठीशी न बाप न भाऊ. लयी मस्ती दाखवतो. बस आपलं लेकरांकडं बघायचं, आपली कामं करायची आन् याला सांभाळायचं.
या वर्गातल्या १०० टक्के महिलांमधल्या ९५ टक्के महिला याच दारुण भरताडात जगत असतात.
हातावर पोट असणारे नवरे. दारुचं व्यसन. न पुरणारा पैसा, न टिकणारं काम, नैराश्य, मग बायकोवर संशय, नाही नाही ते आरोप, मोबाईल न देणं, मोबाईल फोडणं, रात्र रात्र अर्वाच्य भांडणं, मारझोड करणं इत्यादी..
अशा महाभारतीय कथा यांच्या रोजच्याच असतात. बेताल नव-याच रोजचच संकट असतं तरीपण या महिला दुर्दम्य इच्छेने संसार रेटतात. स्वतःच्या मुलींशी हितगूज करतात, मुलांना शिकवतात, उद्याची स्वप्न पहातात. परत रोज हसत-खेळत कामावर येतात. खरंच दुस-यांचे सुखाचे, टुकीचे संसार बघून यांना काय वाटत असेल बरं ?
चिमूटभर सुख तरी यांच्या वाट्याला येत असेल का ?
आधी बापाचा खवीसपणा, मग दारुड्या नव-याचा छळवाद आणि नंतर दिवट्या चिरंजीवांचा रंगेलपणा.
या वर्गाकडे पाहिलं की तमाम पुरुषजात म्हणजे स्त्रीजातीचं सर्वांगीण शोषण करायलाच जन्माला आली आहे की काय असं वाटतं.
सगळे पुरुष एकाच व्यसनी माळेचे मणी तर तमाम महिला एकाच चिरंतन दुःखाच्या धनी.
Sunday, 3 June 2018
एका माळेचे मणी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment