Saturday, 2 June 2018

लोभस अगत्य.

मला एक पार्सल न बांधता द्या.
हो..फक्त दहा मिनिटं.
फोटो काढू का तुमचा.
हो काढा की. फोटोला काय ? फक्त अपलोड करु नका म्हणजे झालं.
चेह-यावर हसू. जेमतेम तिशीच्या आतली व्यक्ती. भर बाजारात कच्छी दाबेलीची गाडी लावते. मला एका मित्राच्या बायकोने तिथे छान दाबेली मिळते हे सांगितलं होतं. गावात चारचाकी नेली की माझं जुन्या भागात चालणं खूप होतं.
त्यामुळे परतताना सिझनप्रमाणे कधी बसैयेचे शेंगदाणे, कधी कैडबरी (कधी ऊसाचा रस) तर कधी ही दाबेली रस्त्याने खात खात मी रमत गमत गाडीपाशी येते.
या मुलाकडे बरेचदा दाबेली घेते. दाबेली तर छानच असते पण सगळ्यात मोहवून टाकणारं काय असेल तर याचं शांतपणे पण मनाला गुदगुल्या करणारं विनोदी ढंगाच बोलणं. सगळा एकहाती कारभार. गाडी भोवती सततच गिर्हाईकांचा गराडा असतो. प्रत्येकाशी संवाद साधत हा गडी पावला चटणी लावणं, सारण भरणं मग मोठ्या तव्यावर बटरमधे ती दाबेली सहा अंगांनी शेकणं आणि एकानंतर एक अशा दाबेल्या गोलाकार रचत, मिश्कीलपणे बोलत शेकणं आणि मधल्या वेळात पार्सलं बांधून देणं. एक दाबेली दहा रुपयाला.
दहा रुपयांच्या बदलात एक नरम-गरम दाबेली तर मिळतेच वर या गड्याचे स्वगतासारखे एकसूरी मिश्कील बोलणं ऐकायला मिळतं. त्यामुळे तिथे ऊभं राहून आपला नंबरची वाट पहाणा-यांना कंटाळा म्हणून येत नाही. परिसरातही गडी लोकप्रियच दिसतोय. सगळेच त्याला बोलायला उद्युक्त करताहेत.
तुम्ही सुट्टी कधी घेता हो.
फार नाही. गणपती, दसरा, दिवाळी, होळी, पोळा, ईद, बकरी ईद आणि कर्फ्यु असेल तेव्हा. कर्फ्यु ऐकल्यावर परत खसखस पिकली.
याच्या स्वादिष्ट दाबेलीमुळे आणि खुसखुशीत एकताली बोलण्यामुळे ताई-माई-दिदी-मौसी-दादा-काका-भैया, पोरं-टोरं सगळे इथे गाडी भोवती फार रमतात. दाबेलीच्या,पैशाच्या देवाण घेवाणीत प्रत्येकाशी अगत्याचे चार वाक्य तर होतातच या गड्याचे.
माझ्या हातात कागदात गुंडाळलेली दाबेली देत,
ताई..तुमचं पार्सल. थोडं थांबावं लागलं. तसदी झाली. क्षमस्व. पण तुम्हाला सेवेचा लाभ देता आला.
धन्यवाद. या पुन्हा.

न बोलणा-याचे बदामही विकले जात नाहीत आणि बोलणा-याचे शेंगदाणेही विकले जातात याची प्रचिती इथे या गाडीवर नक्कीच येते.

No comments:

Post a Comment