Friday, 1 June 2018

आईची शाळा.

ही माझ्या आईची शाळा.
औरंगाबादेतली गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल. शहरातली मध्यवर्ती भागातली बहुतेक निजामकालीन शाळा. भरपूर मोठं आवार, लांब रूंद, देखणी, प्रशस्त इमारत. आम्ही सभु संस्थावाले त्यामुळे या सरकारी मुलींच्या शाळेत डोकवायचा प्रश्नच नव्हता. कधीतरी शालेय नृत्य स्पर्धांसाठी गेलो असू एवढचं.
पण या शाळेमागच्या भल्या थोरल्या आवारात फटाक्यांची दुकानं अगदी आत्तापर्यंत लागत होती.
इथे एक मोठी विहीरही आहे त्यामुळे गणपती उत्सवातही हे मैदान ओसंडून वहात असते. शहरातली एकमेव मध्यवर्ती मोकळी जागा म्हणून इथे पुर्वीपासूनच सामाजिक समारंभ, आनंद नगरी, राजकीय सभा वगैरे नियमित होत असत. त्यामुळे या शाळेचं नाव सर्व परिचित आहे.

माझ्या आईचं फार लवकर म्हणजे ती मॅट्रिकला असतानाच लग्न झालं त्यामुळे तिने दहावीची परिक्षाच दिली नाही आणि नंतर मुलंबाळं झाल्यावर तर विचार करायलाही फुरसत नव्हती. पण माझी आई फार छान शिवण शिवायची. इतकी छान की झारापकरचा प्रमाणीत शिवण क्लास चालवणा-या बाई देखील आईचा सल्ला घ्यायच्या. पण कुठलाही शिवणाचा, भरतकामाचा डिप्लोमा करायचा किंवा रितसर क्लासेस घ्यायचे म्हटलं की तिचं नॉनमॅट्रिक असणं अडचणीचं ठरायचं. आणि संसारात तर इतकी डुबलेली होती की आता या वयात नवीन अभ्यासक्रम समजून परिक्षा देणही कल्पने पलिकडचं होतं. पण मला वाटतं बहुतांश समाजात येनकेनप्रकारेण दहावी होऊ न शकलेली पब्लिक फार होती त्याकाळी. ७५-७६ साली सरकारनी अभ्यासक्रम बदलून १०+२+३ करायच्या आधी जुन्या अभ्यासक्रमवाल्या लोकांना दहावी काढण्यासाठी १-२ चान्सेस द्यायचं ठरवलं. आणि दहावीचं रजिस्ट्रेशन, अभ्यासक्रम आणि परिक्षा फार सुटसुटीत ठेवली. परिक्षा अर्थात जून्या अभ्यासक्रमावर आधारीत होणार होती. ७६ साली माझी बहिण दहावीला गेली आणि त्याच वर्षी आईने जिद्दीने बाबांच्या सहकार्याने तिचा दहावीचा फॉर्म भरला. आई आणि मुलगी एकाच वर्षी दहावीची परिक्षा देणार होत्या. आईचं अभ्यास करणं मला अजिबात आठवत नाहिये. पण नक्कीच तिला गणित आणि इंग्रजीची भिती असणार.
तर तेंव्हाच्या अशा घाऊक प्रौढ विद्यार्थ्यांच परिक्षा केंद्र ही जिल्हा परिषदेची गर्ल्स हायस्कूल होती. खूप संख्येनी लोकांनी याचा फायदा करुन घेतला.
परिक्षा कधी झाली ते आता आठवत नाही पण बेदम कॉपी प्रकरणाची तिथे चलती झाली हे आई कडून कळायचं. किती पेपर्स होते, किती दिवस परिक्षा होती, तिची तयारी आता काही आठवत नाही. या सरसकट परिक्षेचा रिझल्टही कधी आणि कसा लागला हेही आठवत नाही. पण एकदिवस बाबा ऑफिसमधनं आले आणि त्यांनी आई मॅट्रीक उत्तीर्ण झाल्याच सांगितलं. आम्ही सगळे खूष झालो. घराजवळच्याच एका मिठाईवाल्याकडनं पेढे आणले. मित्र परिवारात वाटले. सगळा संसार बघत, आला गेला करत, शिवण करत आईने हे यश मिळवलं म्हणून तिचं सगळीकडे फार कौतुक झालं. अशा प्रकारे स्वतःच्या पहिल्या अपत्याच्या दहावी व्हायच्या काही दिवस आधीच आमची आई मॅट्रिक पास झाली. आणि पुढे काही शिवणाचा वा हस्तकलेचा रितसर डिप्लोमा करायचा तिचा मार्ग मोकळा झाला.
शिवण टाकायला येणा-या मराठवाड्यातील सुशिक्षित महिला तर नेहमी आईला म्हणायच्या पाध्येबाई..तुम्ही फक्त मॅट्रिक आहात हे खरंच वाटत नाही हो तुमच्याकडे बघून.
अगदी बीए झाल्यासारख्या वाटता. अहो सांगतही जाऊ नका कुणाला की तुम्ही फक्त मॅट्रिक आहात म्हणून.
आणि त्या उलट पुण्या-मुंबईहून आलेल्या शिकलेल्या कोकणस्थ महिला कायमच आईला वाकड्यात पहायच्या. शिवलेल्या कपड्यांमधली फॅशन थोडीफार जरी इकडे तिकडे झाली तरी फार कटकट करायच्या. शिलाईचे हिशोबही स्वतःला फार शहाणं समजत पुन्हापुन्हा करायच्या. एकीचा तर नवरा बायकोच्या अपरोक्षच कपडे झाले का म्हणून चकरा मारायचा.
असो.
शिक्षण तुम्हाला काय देतं आणि तुमच्याकडून काय नेतं हा चिंतनीय विषय आहे.

आज पहिला पावसाची झिमझिम पडली. बाजारात गेले तर पोलिसांची गाडी रस्त्यावरच्या गाड्यांना जॅमर लावत सुटलेली. सावधगिरी म्हणून या हायस्कुलच्या मैदानावर गाडी लावायला गेले तर पावसाचा सडा पडलेल्या मैदानावर दोन तिन मुली, महिला दुचाकी चालवायला शिकत होत्या, शिकवत होत्या.
खाली ओलसर तपकीरी मैदान, वर करडे-पांढरे झुकलेले ढग, मावळतीची कुंद पण प्रसन्न गार हवा आणि हिरव्या झाडीतली या शाळेची ऐतिहासिक पिवळी इमारत.
मोबाईलमधे देखणी फ्रेम मिळाली म्हणून मग हा आठवणींचा शाब्दिक सडा घातला.

No comments:

Post a Comment