Friday, 1 June 2018

शाळा...पाखरांची.

कालच एका मैत्रीणीची चिमण्यांवरची पोस्ट वाचली. म्हटलं तर शहरीकरणामुळे चिमण्या हरवल्याच आहेत. तरीपण वाट चुकुन कधीतरी कुणाच्या तरी वाट्याला येतातच चिमण्या.
काय असेल ते असो पण कैलेंडरचे पान उलटून जून ही अक्षरं दिसली की काही आठवो न आठवो किलबिली शाळा, शाळकरी मुलं, उत्साही पालक अगदी आठवतात म्हणजे आठवतातच. भले तुमचं कुणीही आता शाळेत जाणारं असो वा नसो. जून महिन्यातली शाळेची लगबग म्हणजे मातृत्वातला एक इंद्रधनू अध्यायच असतो. आई आणि बालकांच्या ह्रद्य नातेसंबंधातलं सुवर्णपान म्हणजे हे जून महिन्यातले सुरवातीचे शाळेचे दिवस. नुस्ती बाजारात, शाळेजवळ एक चक्कर जरी मारली तरी या चिमणबाळांच्या किलबिलाटामुळे सुध्दा एक बुस्टर टॉनिक मिळाल्यासारखं होतं.
नॉस्टॅल्जिक होतं आपली खेळकर वांड मुलं आठवतात. आपला आईपणातला उतावळा उत्साह आठवतो. खरोखर नववर्षाची शाळा सुरु होण्यासारखा चैतन्यदायी सोहळा नसेल.
व्यक्ती तितक्या या उक्तीप्रमाणे बालकांच्याही अनेक
त-हा तर आयांच्याही अनेकपरी कळा.
परत विविध आर्थिक स्तरातल्या शाळांची शिस्तीची इस्त्री वेगळी, रंगरुप वेगळं, बाज वेगळा, ऐट वेगळी.
खाण तशी माती या उक्तीप्रमाणे जशी शाळा तशी मुलं, तसेच पालकही असतात नाही का ?

असं म्हणतात निसर्गातली कुठलीही गोष्ट वा वस्तू कुरुप,असुंदर वा टाकावू नसते. तरी पण वैयक्तीक मतांचा कौल घेतला तर चित्र वेगळं दिसतं.
Breakfast@Hiranya Resorts.
हिरवळीवर निवांत एकटीच बसले आहे.
सकाळची प्रसन्न आणि कोवळी वेळ. पाखरांचा किलबिलाट सुरु आहे. कुणाची लगबग, कुणाची चिवचिव, कुणाची कलकल..अगदी पाखरांची शाळाच भरली आहे असं म्हटलं तरी चालेल.

हे बघा..विस्कटून कलकल करणारे सातभाई.
झुंडीनेच असतात. मातकट, राखाडी रंग, तारवटलेले डोळे, विस्कटलेला पंखपिसा-याचा डोलारा, काटकुळे पाय आणि अनाठायी अशी करकर कलकल.
.....वैराण माळावरच्या एका छत नसलेल्या शाळेत वांड पोराला फरफटत आणून बसवणारी, स्वतःच्या अख्ख्या आयुष्यावरच कावलेली उद्विग्न 'आय' म्हणजे हे सातभाई.

.....तपकीरी रंगाच्या, पिवळ्या चोची-पायाच्या,मध्यम अटकर बांध्याच्या कर्कश्य साळुंक्या...
झेडपी वा पालिकेच्या शाळेत पोरांना डांबून परतताना इतर आयांशी रेशन, रॉकेल वा पाण्यावर अस्सल मायबोलीत करकचून बोलणा-या आयांसारख्या.

.....काळसर तपकीरी, पांढ-या रंगाची यथायोग्य पखरण, त्यावर लाल चुटुक कोंदण, मधूर किलबिल बुलबुलांची.
प्रथम अपत्याला पहिल्यांदाच शाळेत घातल्यावर पुत्रप्रेमाने, कौतुकाने अखंड बोलणा-या ग्रेज्युएट मम्मीसारखे हे बुलबुल.

No comments:

Post a Comment