Tuesday, 29 May 2018

Godliness

Cleanliness is godliness.
अशी स्वच्छतेची महत्ता सांगणारी म्हण आहे. गांधीजींनी कायम आपल्या पापभिरू, धर्मभिरु भारतीय समाजात या विचाराचा प्रचार केला.
स्वतः ती कार्यप्रणाली त्यांनी आयुष्यभर अवलंबली.

आम्ही जिथे रहातो ती गल्ली अरुंद आणि डेड एन्डवाली आहे. साहजिकच गाड्या वळवून मार्गस्थ होणं वेळखाऊ आणि जरा ट्रिकी काम आहे.
त्यातही रात्रीतनं प्रत्येक घरासमोर, घराच्या कंपाऊंड वॉलला खेटून एकापाठी एक इतक्या गाड्या उभ्या असतात ना की सकाळी गाडी काढणं इज अ एक्सपर्ट्स जॉब.
त्यातही काही भारी लोकं कंपाऊंड वॉल आणि गाड्यांच्यामधल्या चिंचोळ्या भागात रात्रीतनं कचरा फेकतात. कॉर्पोरेशनचे कर्मचारी पहाटेसच झाडझूड करायला गल्लीत येतात. रस्त्याच्या मधला भाग स्वच्छ होतो पण प्रत्येकाच्या कंपाऊंड वॉलजवळचा भाग अतिशय घाणेरडा असतो. थर्माकोल, प्लास्टिक, पुठ्ठे, चपला, कपडे, फोम, डबडे..अगदी काहीही पडलेलं असतं. ज्याच्या वॉलजवळ हा कचरा आहे त्याचा त्या कच-याशी काही संबंध नसतो. सकाळी जो तो घरात असतो. सफाई कर्मचारी वरवर दृश्यभाग साफ करतो. सकाळच्या ११वाजेनंतर गल्ली पहावी. दुतर्फाच्या कंपाऊंड वॉल्स नाही नाही त्या कच-याच्या विळख्यात असतात. आलं वारं कि इस्ततः कचरा उडतो आणि स्वच्छतेचे तीन तेरा वाजवतो.
सफाई कामगारही वरवरच झाडतात. थोडं काही सांगितलं कि स्वतःच्याच अडचणींचा पाढा वाचतात. शब्दाला मान म्हणून थोडं तुमच्या दारासमोरच, गाड्यांपासच साफ करतात आणि मार्गस्थ होतात.
मग जरास गप्पा मारत, त्यांच्या अडचणी समजून घेत, चहाची मैफिल करत त्यांच्याकडनं काम करुन घ्यावं लागतं. निदान मी तरी तसं करते. लालूच म्हणून नाही पण माणूसकीच्या नात्याने चार शब्द गोड बोलायला काय हरकत आहे.? पण इथे जरा कर्मठच पब्लिक आहे. मला नाही वाटत या महिलांशी या गल्लीत कुणी बोलत देखील असेल. आणि झाडाझूड होऊनही
उरणा-या कच-यावर विचार करत असेल. ज्याची त्याची आपापली घरं मात्र स्वच्छच असतात.
तर मुद्दा असा की सफाई कामगार देखील फार मनलावून काम करतात असं नव्हे. तेही वरवरचंच काम करतात. बघायला कुणी नाही, बोलायला कुणी नाही. आणि आपलं काम आपण चोख करावं ही वृत्ती नाही. कायमच अंगचोरपणा करायचा हे विशेषकरून सरकारी नोकरवर्गात फार फार जाणवतं. सफाई कामगार तर इतके लहान आहेत. मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्समधेही अगदी शुल्लक कामासाठी पाच दहा खेटे घालावे लागतात. थोडेफार पैसे चारल्याशिवाय, किंवा कुठलातरी धाक दाखवल्याशिवाय तर कामच होत नाहीत.

No comments:

Post a Comment