Sunday, 27 May 2018

दिल जीत लिया.

मला झाडा-फुलांची, निसर्गाची आवड असली तरी मॅनीक्युअर्ड बागेत, फुला-पानात म्हणावं तसं माझं मन रमत नाही. I like wild trees-flowers. सुशोभनीकरणाचे नियम तोडून अंगभूत गुणांनी भरभरून बहरणारी, फुलणारी झाडं, वृक्षच मला खरे प्रिय आहेत. त्यामुळे माझ्या घरात फार छान अशी सुबक बाग फुललेली आहे असं चित्र कधीच दिसणार नाही तुम्हाला.
तसच ते गुलाबांच देखील अतिरेकी कवतिकही माझ्याकडून फारसं होत नाही.
मला आपला भरभरून बहरलेला चाफा, बहावा, गुलमोहर, स्पेथोडीया,वड, पिंपळ, पळस अशी जंगली पण सर्वांगसुंदर झाडच आवडतात.
तरी हिरण्यला झाडं लावायच्या निमित्ताने बरंच वाचन होतं. त्यामुळे एवढ्यात सक्युलंटसनी जरा मोहातच पाडलं आहे. १५ वर्षांपूर्वी राजस्थानमधल्या बांसवारा येथे एका जमीनदाराची कैक्टसची विस्तीर्ण बाग पाहिली होती तेव्हा कैक्टस या वनस्पतींबद्दलही उत्सुकता चाळवली होतीच.

तर मागच्या वर्षी सांगलीला नातलगांकडे गेलो होतो. तिथे गच्चीत काही सक्युलंटस व कैक्टसेस होते. जरा चौकशा केल्यातर त्यांनीही एक दोन काटेरी खुंट कौतुकाने काढून दिले. घरी येऊन लावले म्हणजे कुंडीत खोचले.
कैक्टस असल्यामुळे फार काळजी घ्यायचा प्रश्नच नव्हता. एका ठिकाणी गच्चीत कुंड्या ठेवल्या आणि जमेल तसं पाणी घालत गेले. कैक्टस असल्यामुळे फार तरारुन वाढणं असल्या गोष्टी नव्हत्याचं, पण त्या इवलुशा काटेरी खुंटांनी चांगलं बाळसं धरलंच.
तर आज सकाळी पाणी घालायला म्हणून या कुंड्यां जवळ गेले तर एक मस्त दिमाखदार,तजेलदार पिवळं फुलं एका कांद्याएवढ्या काटेरी खुंटावर मस्त उमललेलं दिसलं. हरखूनच गेले. आणि नुसतं एकच फुल नाहीतर अजूनही काही कोमल कळ्या त्या काटेरी जाळीवर विराजमान दिसताहेत. म्हणजे कैक्टस अगदी बहरातच आहे की.
निसर्गाचीही कमाल असते. कुठल्याही अतिरेकी वातावरणात देखील फुलायची त्याची तयारी असते.
नाहीतर आपण ?
बसलोत मे महिन्याच्या नावाने कधीचे बोटं मोडत.

No comments:

Post a Comment