तसही लहानमोठ्या शहरातनं, गावातनं ब-याच संसारपयोगी वस्तू दारावरच विक्री साठी येत असतात. तरीही त्या विक्री मध्ये जागोजागचे, प्रांतोप्रांतीचे काहीतरी वैशिष्ट्य असतच. निरखलं तर एक अवाढव्य सिस्टीमच कार्यरत असलेली आपल्याला जाणवते.
आमच्या या कॉलनीत मी आजपर्यंत औरंगाबाद शहरात न पाहिलेले विक्रेते पाहिले आहेत. जराशी हिंदू बाजाचीच ही कॉलनी आहे. त्यामुळे रामदासी, वासुदेव, गोंधळी, किर्तन करणारे, बैल घेऊन फिरणारे इथे काळवेळ बघून येतच असतात. तसच गोधड्या शिवून देणा-या महिला, भाजीवाले, रद्दीवाले, कुल्फीवाले, बोहारी, हातसडीच्या डाळी, फुटाणे, जिरं, मोहरी, हळद, भगर, गोडंबी, डिंक, चारोळ्या, तुप, झाडू इत्यादी जिनसा विकणारेही नियमित येतात. गेलाबाजार इडलीवाला तर आठवड्यातून दोनचारदा डोकावून जातो. पंधरा दिवसातनं धार लावणारा येऊन जातो. गव्हाचे, नागलीचे मुरमुरे विकणारे अवचित कधीतरी येऊन जातात. उन्हाळ्याच्या चाहुलीत माठवाले तर पावसाळ्याच्या तोंडावर कुंड्या, फुलझाडंवालेही फिरतात. सतरंज्या, गालिचे विकणारेही सणावारी फिरतात. झालंच तर आमावस्या मागणा-याही रितसर येतच असतात. गणपतीनंतर तर या विक्रेत्यांचा धुमधडाकाच सुरु होतो.
माझ्या लहानपणी नांदेडला केसांच गुंतवळ विकत घेणा-या महिला फिरायच्या अस पुसटसर आठवतय. तर काही महिन्यांपूर्वी एक माणूस हाकारे देत आमच्या गल्लीत गंगावन विकत होता याच मला नवलच वाटलं. पंधरा एक दिवसांपूर्वी आंध्रातल्या पाच सहा शिसवी महिला गुंतवळी केसांच्या बदली चमकदार पॉलिशची पत्रट स्टीलची घाटदार भांडी विक्रीसाठी घेऊन दारोदार फिरत होत्या. त्यांना तर समजेल अशा मराठी भाषेत हाकारेही देता येत नव्हते. गल्लीतल्या कुत्र्यांनी त्यांना पळता भुई थोडी केली. नांदेडला जुन्या कपड्यांच्या बदल्यात आंध्रा घाटाची एकसे एक सुरेख स्टीलची भांडी मिळतात याची आम्हा दोघी बहिणींना फार असुया वाटते.
औरंगाबादला पहिल्यांदाच ही भांडी दारावर दिसली. हे नवल संपत नाही तर आज सकाळीसच दारावर शेवया, कुरुड्या, पापड्या, तिळ, जिरं, हळद, करवंद विक्रीसाठी या दोघींनी आणले होते. शहराजवळच्याच भागातून आलेल्या दोन तरुण विवाहिता. फोटो काढला की लगेच संभाव्य संकटानी घाबरल्या.
ताई..फोटो व्हॉट्सऍपवर नका हं टाकू म्हणत लाजल्या.
कुरुड्या, हात शेवया, पापड्या डालीतून दारोदार विकताना पहिल्यांदाच पाहिल्या.
कष्टकऱ्यांच्या वसाहतीत सुया-पोतं विक्रेत्या नेमाने फिरतात. हातगाड्यांवर प्लास्टिक, लाकडी, पत्री संसारपयोगी वस्तु, कॉस्मेटिक्स, दागिने, खेळणी घेऊन फिरत विक्री करत पोटभरणारेही खूप असतात.
म्हणजे विचार केला तर काही मुल्यवान आणि नेमक्या चिजा सोडल्या तर संसारपयोगी ८०% सामान दारावरच घरबसल्या मिळू शकतं. हा भटकंतीचा सौदा त्या विक्रेत्यांनीही नक्कीच परवडत असावा.
नुसतं हे लिखाण लिहायला बसले तरी इतक्या विविध वस्तू विकणारे विक्रेते आठवताहेत की गंमतच वाटत आहे. आमच्या इथल्या छावणी परिसरात सायकल वरनं पेरु, सिताफळ, काकड्या, लब्दू विकणारे टिपिकल दाढीवाले वयस्क मुसलमान इतके लोभस दिसतात ना की एकेकाचं सुरेख पेंटिंग करता येईल.
केवढी एक टाईम टेस्टेड व्यावसायिक सिस्टीम कार्यरत असते आपल्या समाजात. आपण नागरी लोकं दारोदारचे विक्रेते म्हणून जरा दुर्लक्षच करतो नाही त्यांच्याकडे.
प्रत्येक प्रांताची, गावाची, गल्लीची, धर्माची, सणावारांची, आर्थिकस्थितीची, गरजांची, राहणीमानाची छत्तीस गुणी कुंडली जाणूनच हे विक्रेते दारोदार फिरत आपली उपजीविका भागवत असतात.
समुहाने कुठून कुठे फिरत असतात. ऐकलं तरी थक्क व्हायला होतं. बायाबापड्या, पोरंसोरं घेऊन एक मानवी थवाच स्वतःच्या पोटासाठी, दुस-यांच्या गरजा ओळखत स्थलांतर करत असतो म्हटलं तरी वावगं होणार नाही.
पॉन्डेचरीला पहाटेसच दारोदार हाळ्या देत टोपल्यातनं सुगंधी फुलं विकणा-या आणि बकेटींमधनं ताजे चमकदार मासे विकणा-या बघून फार हरखून गेले होते मी.
पोटासाठी रोज ताजा मासा दाराशी तर प्रफुल्लित दिवसासाठी रंगबिरंगी सुगंध दाराशी...
वाह ! क्या बात है. लाईफ हो तो ऐसी हो.
No comments:
Post a Comment