माझ्या शेजारच्या बिल्डिंगमधल्या फ्लॅटमधे चारसहा दिवसांवर लग्न आहे.
लग्न ठरुनच पाचसहा महिने झालेत बहुधा.
दिडेक महिन्यापूर्वी घराची रंगरंगोटी झाली. महिनाभरापासून चहलपहल वाढली आहे. गेले दोन दिवसांपासून माणसांचा, पाहुण्यांचा राबता वाढला आहे. आज तर अगदी सकाळपासूनच मसाल्यांचे वास दरवळताहेत. आणि आत्ता बिल्डिंगच्या आवारात भर दुपारी झाडांच्या सावलीत शेव, बुंदी पाडणं चालू आहे. तेलाचा, तळणाचा घमघमाट सुटलाय नुसता.
पुर्वी घरोघर लग्न ठरलं की हीच रितसर कथा असायची.
हल्ली सारखी कॉन्ट्रॅक्टची पध्दत तेव्हा शहरात देखील बोकाळली नव्हती.
अजूनही खेडोपाडी, छोट्या गावात लग्न अशाच काटकसरीने, श्रमदान पध्दतीने होतात.
शहरी लोकांनी हिवाळ्याच कितीही कौतुक केलं तरी अजूनही खेडोपाडी बहुतांश लग्न कहरी उन्हाळ्यातच होतात.
मध्यमवर्गीय घरांमधे घराला रंग देण्यापासून लग्न कामाला सुरवात व्हायची. आपापल्या गावातच, फारतर तालुक्याच्या ठिकाणी बस्ता बांधला जाई.
पत्रोपत्री आधीच काका, मामा, भाचरं, पुतणे यांच्या वाटणीच्या कामाची विभागणी करुन ठेवत असत. लग्ना आधी राबायला हक्काची माहेरची माणसं निदान आठवडाभर तरी आधीच येत असत.
मग रात्रीच्या जेवणानंतर अंगणात,गच्चीत बसत, लोळत विवाहविधींच्या दिनक्रमानुसार, कार्यक्रमानुसार कामांची आखणी, साहित्याची जुळणी, स्वैपाकाच नियोजन केलं जायचं.
आमच्या पीढीतलं पहिलं कॉन्ट्रॅक्ट पध्दतीचं लग्न म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीच झालेलं. पण बाकी मराठवाडी मावस-चुलत बहिणींची लग्न म्हणजे सगळी कामं घरातनच करावी लागणारी. त्याकाळी इतका वारेमाप पैसाही लग्नांवर खर्च केला जात नसे. मुळात पैसाच फार नसायचा आणि त्यात एका पोरीसाठीच इतकी उधळमाधळ केली तर बाकीच्या पोरांच्याही लग्नालाही त्याच तोलामोलाचा खर्च करावा लागेल या भितीने -धोरणीपणाने कायमच हात आखडता असायचा. खेडोपाडी तर पैसा देऊनही सोय लागायची नाही. कुठल्याही बहिण-भावांच्या लग्नाला गेलं की बाईमाणसं दबादबा घरकामं करायची. पुरुष माणसं बाहेर पिटाळली जायची, पोरंसोरं शक्तीची कामं करायची, गाद्या टाकायची, पाणी भरायची, जेवणावळी वाढायची..काही म्हणा पण ही कामं काम करणारी मंडळी काकणभर शहाणीच व्हायची हो अनुभवामुळे.
माझ्या एका बहिणीच लग्न अगदी छोट्या गावात झालेलं. घरातलं पहिलं लग्न, परिस्थिती फारच बेताची. सगळी काम अंगावरची आणि काटकसरीची.
अर्थात घरोघर हीच परिस्थिती असायची.
तरीपण चार दिवस घरा पुढे मागे मंडप पडायचा.
हलवाया कडून चिवडा, लाडू, शेव करुन घेतली जायची.
घरातल्या महिलाच रवा, बेसन लाडु बांधायच्या.
कोठीघर सांभाळायला एखाद्या खमक्या पण कर्तबगार आणि अनुभवी महिलेची नेमणूक असायची.
ती महिलाही प्रसंगी बाणेदार वागून विश्वास सार्थ ठरावयची. स्वैपाक्याच्या मार्गदर्शनाखाली सिमंती आणि लग्न जेवणाचा भाजीबाजार सुध्दा घरातली तरुण मंडळी करायची. मेथी, वांगी, बटाटे, पत्ताकोबी अशा ठोस भाज्याच व्हायच्या प्रामुख्याने.
हं तर बहिणीच सांगत होते ना ?
तिच्या लग्नात हलवायाने अगदी वेळेवर बुंदी पाडली. तर रात्रभर बसून आम्ही सगळ्यांनी मिळून गप्पागोष्टी करत, हसतखेळत हजार एक लाडू तरी वळले असावेत. तेव्हाचं लाडू वळतानाचं नातलगांबरोबरच हितगूज माझ्या आठवणीतून अजूनही पाझरतय.
माझ्या मावस बहिणीची एक चुलत बहिण तर दोन्ही हातांनी दोन लाडू एकावेळेस वळत असे. आमचे पंचवीस तर तिचे पन्नास लाडू होत असत.
आम्ही शहरातले चित्रकार आणि देखणे ना !
(देखणे लोकं कामात ढड्डोबा असतात या समजाचं मुळ काय असावं बरं ?)
काय ते माझं कौतुक ? काय त्या मी हिरीरीने वळलेल्या एकसारख्या गोल लाडवांच कौतुक.
I still remember it very vividly.
जेवणावळी वाढायला तरुण कॉलेज कुमार.
नखरेल पोरी आपल्या नटून थटून जेवायला बसलेल्या आणि जुल्फी पोरं आपली झुकुन झुकुन वाढताहेत लाडू, मसाले भात आणि मठ्ठे...अहा..हा...वो भी क्या दिन थे.
गमतीचा भाग सोडला तर या अशा प्रकारच्या लग्नात सगळ्यांचच शिक्षण खूप व्हायचं. कॉमन सेन्स वाढीला लागायचा. नातेसंबध अजूनच गोळीबंद व्हायचे आणि मुख्य म्हणजे साथी हाथ बढाना हा मंत्र कायमचा मनावर कोरला जायचा. जीवनातले सगळे क्वोशंटस् समजून घेत एका आनंदी वातावरणात लग्न सोहळा संपन्न व्हायचा. Life learningचा एक क्रॅश कोर्सच असायचा ही असली अंगावरची काटकसरीची लग्न म्हणजे.
दुर्दैवाने सुबत्तेच्या वावटळीत सगळं हरवून चाललय. हल्लीच्या लग्नात काही कामच नसतं. आपापले कंपू करुन बसायचं. शिळ्या गप्पांच दळण काढायचं, यजमानांच्या सुबत्तेच मोजमाप काढायच.
साडी काय चेह-याची घडी हल्लीच्या लग्नात मोडत नाही बघा.
आणि उच्च शिक्षित मुलांना बेसिक सार्वजनिक व्यवहार ज्ञान शिकवता शिकवता पालकांना नाकी नऊ येताहेत.
नांदेडकडच्या प्रत्येक लग्नाची आठवण अगदी ठसठशीतपणे माझ्या मनावर कोरलेली आहे.
अशा लग्नांमधून सासर-माहेर, चुलत-मावस, शेजार-पाजार हा भेद मिटवत विस्तारलेलं अख्ख गणगोत मला अजूनही आपलसंच वाटतं.
No comments:
Post a Comment