Thursday, 19 April 2018

चालबाजी..मीटरची.

तसही माझ्या गावात मला रिक्षात बसायची वेळ फारच कमी येते. त्यातही कधी त्या रिक्षावाल्याची आणि माझी कुंडली जमली तरी स्वतः वाहन स्वतःच चालवायची सवय असल्यामुळे रिक्षावाल्याला डायरेक्शन देताना हमखास दिरंगाई होते. रिक्षा पुढेच निघून जाते. मग होते चिडचिड. आणि कर्मधर्म संयोगाने राहिलंच लक्षात तर अक्षरशः डावा-उजवा हात उचलून बघत कंफर्म करत दाये से, बाये से, लेफ्ट से, राईट से लेलो असं करावं लागतं. 👈👉👆👇
असो. असतात कुणा कुणाला कशाचे पण लिमिटेशन्स. हसायच काय त्यात.😬

मला ऑटोमोबाईल मधलं गाडी चालवण्या व्यतिरिक्त काही कळत नाही. चलती का नाम गाडी हा आपला खाक्या. तरी पण आज गेलेच माझी कार घेऊन गैरेजमधे.
गाडी तिथेच ठेवून जरा आसपासचा परिसर बघत पायीच निघाले. जरा मेनरोडपाशी पोहोंचल्यावर रिक्षाला हात केला तर दोन रिक्षावाले मानेनीच नकार देत निघून गेले. मग एकजण थांबला. दुरचं ठिकाण असल्यामुळे बसा म्हणाला. पण १२० रु. द्यावे लागतील म्हणाला. म्हटलं मिटर लाव जे होतील ते देते. नाही म्हणत सरळ निघून गेला. परत काही पावलावर एक रिक्षा होती तर तिचं रिक्षावाल्याच्या मताने मिटरच खराब होतं. मीही मिटर शिवाय रिक्षा नाहीच करायची असं मनोमन ठरवलं होतं. परत पुढची रिक्षा थांबवली तर मिटरची वायर तुटलेली. एक जण मिटरशिवाय शंभर रुपये होतील म्हणला. मिटरने पण तेवढेच होतात हो असं ठासून सांगत तोही गेला. अजून दोन रिक्षेवाले थांबवले. एकजात सगळ्यांचे मिटर कामातून गेलेले. 🤔
बरच चालल्यावर एकजण थांबला, मिटरही चालू होतं. प्रवासात रिक्षावाल्याला म्हटलं अहो साताठ रिक्षांनंतर तुमची रिक्षा मिळाली जिचं मीटर व्यवस्थित चालतय.
अहो ताई असेच करतात ते. गि-हाईकाला आडवून बघायचं. काळवेळ बघायची आणि तोंडाला येईल ते पैसे मागायचे. सगळा धंदा बरबाद करुन ठेवलाय या लोकांनी.
या काकांची स्वतःची रिक्षा. दोन शिफ्टमधे रिक्षा चालवतात. दिवसाचे पाचशे रुपये सुटतात. एक मुलगा पुण्याला तर दुसरा औरंगाबादलाच इंजिनिअरिंग करत आहेत. घराजवळ किराणा दुकान टाकलय. घर सांभाळत बायको आणि जमेल तसं हे काका दुकान चालवतात. एकूणच कष्टाची कमाई खाणारं कुटुंब दिसतय. पंच्याहत्तर रुपयात घरी पोहंचले.

माझ्या लहानपणी औरंगाबादची रिक्षा सिस्टीम इतकी व्यवस्थित आणि बिनघोर होती की नांदेड-नागपूरची सायकल रिक्षा आणि ऑटोरिक्षाची घासाघीस बघीतली, ऐकली तरी उबग यायचा. मुलींची, महिलांची काळवेळ बघत छेडखानी करण्यात तर नागपूरचे दोन्ही रिक्षावाले बहाद्दर असायचे. त्यामानाने औरंगाबाद फार सुरक्षित होतं. हात केला कि रिक्षा थांबायची, मिटरप्रमाणेच पैशाची देवाणघेवाण व्हायची, कुठलीही फसवाफसवी नसायची, घुमवाघुमवी नसायची. We were very proud of this system.😍

परंतू दुर्दैवाने हे चित्र आता पुर्णपणे पालटलयं.
अतिशय उर्मट आणि दादागिरी करणारे रिक्षावाले आता उदयाला आले आहेत. कोणाचा कुणाला वरदहस्त आहे कळत नाही पण कितीही आवाज उठवा, तक्रारी करा रिक्षेवाले काही सुधरत नाहीत. अवेळी प्रवासातनं शहरात पोहंचत नंतर रिक्षाने घरी सुखरुप, भांडण न करता, चार पैसे जास्तीचे न सोडता जाणं म्हणजे एक दिव्यच अनुभवायला मिळतं. आमची मुलं तर एकवेळ बसस्टैंड, रेल्वेस्टेशनवरनं घरची गाडी नसेल तर पायी येतील पण त्या बेदरकार, बेडर रिक्षावाल्यांच्या नादी लागत नाहीत.
बसस्टैंड आणि रेल्वेस्टेशनवरचे रात्रीबेरात्रीचे अडलेले, अडवलेले सामान्य प्रवासी पाहिले की या रिक्षावाल्यांना माणुसकी तरी आहे की नाही असा प्रश्न पडतो.
खरोखर रक्त उसळून येण्यासारखेच वागतात हे रिक्षावाले. 😤
विश्वासाकडून अविश्वासाकडे गेलेली ही वाट या शहराचे नागरिक म्हणून अक्षरशः लाज आणते.

महाराष्ट्राच्या पर्यटन नगरीचा पहिला नक्षा कोण उतरवत असतील तर हे सगळ्यांनाच डोईजड झालेले निगरगट्ट रिक्षेवाले.
कुणालाही न जुमानणारी ही भ्रष्टाचाराची वाळवी हे खरं भारताच अवघड जागीचं दुखणं आहे म्हटलं तर वावगं ठरु नये अशी परिस्थिती आहे.

No comments:

Post a Comment