प्रत्येक ऋतूचा आपल्या शरीरावर, स्किनवर बरा वाईट परिणाम होतच असतो. हवामानाच्याही अनेक त-हा आहेत. आणि त्याचेही काही फायदे तोटे आहेत. आता आमच्या औरंगाबादची तापमानीय अंगकाठी कोरडी आहे. म्हणजे थंडी आवडली तरी बोच-या कोरडेपणाने कातडी उलते, तडतडते. त्वचेची रया जाते.
तसंच उन्हाळ्याचही आहे. कातडी काळवंडवणारं रणरण ऊन, बेताचा घाम तरीही कातडी कोरडी पडत त्वचा लाईफलेस होते.
पावसाळा त्यातल्यात्यात सुखावह.
हवेतल्या दमटपणाने कांती सुरेख खुलते, तजेलदार होते. अर्थात कोरडं हवामान अंतर्गत शरीरासाठी, श्वसनासाठी आरोग्यासाठी चांगलच मानलं जातं पण या हिवाळी आणि ऊन्हाळी कोरडेपणात आपली कांती सुदृढ आणि निरामय ठेवणं फार अवघड जातं.
पण हवेतला बदल जाणून घेत घरच्याघरी जर काही उपाय नियमितपणे केले तर बराच फरक पडतो.
खरंतर हल्ली सिझन बदलाप्रमाणे कॉस्मेटिक्स, कपडे, पेय..इत्यादी गोष्टींच्या इतक्या जाहिराती टीव्हीवर असतात की असे प्रश्न कुणालाच पडायला नको.
पण त्या खंडीभर प्रॉडक्ट्सच्या योग्यतेची खातरजमा कोण करणार ?
जॉन्सन एन्ड जॉन्सनच्या बेबी पावडरमधे एस्बेस्टॉसचे कण सापडले. आणि त्यामुळे एका बाळाचा मृत्यु झाला हे सिध्द होऊन कंपनीला करोडोंचा फाईन भरावा लागला असं एवढ्यातच वाचनात आलं आहे. हल्ली ब-याच महिलांना चेह-यावर काळपट असे बटरफ्लाय पॅचेस येताहेत त्याच्या अनेक कारणातलं एक कारण हेयर डायचा नियमित वापर हे आहे. कंपनी आणि जाहिरातवाल्यांनी तर सतत अतर्क्य असे काही बाही प्रलोभनं दाखवायचा विडाच उचललाय.
कमळांच्या एक्सट्राक्टचे, केशर-बदामाचे देमार शैंपू बघून तर मला अचंबाच वाटतो. टनांनी हा शैंपू बनवायला यांना इतकी मुबलक कमळं-केशर-बदाम मिळतात तरी कुठे ? आणि परवडतं तरी कसं ? आम्हाला तर वर्षभरात दोन डझन वॉटरलिलीज फुलवणं देखील कठीण जातं.
थोडक्यात स्वतःची काळजी घेतलीही पाहिजे आणि ती घेताना जागरुकही रहायला पाहिजे. कॉस्मेटिक्स वापरायला सोईचे असले तरी अधून मधून घरगुती उपायही करावेत या विचाराची मी आहे.
प्रखर उन्हाच्या तडाख्यातून बचाव करण्यासाठी आपण अंगभर कपडे घालतो. स्कार्फ वापरतो. या उपायांमुळे अल्ट्राव्हायोलेट रेज पासून जरी आपलं संरक्षण झालं तरी भरपूर घामामुळे त्वचेची रंध्रे बंद होतात व त्वचा काळवंडते, तेजहीन होते. रोजच्या वापरातल्या साबणांचा फेसच खूप होतो आणि तो फेस धुवून काढला की आपला समज होतो की आपलं शरीरंच स्वच्छ झालं म्हणून. पण ते तसं नसतं.
तर त्वचेची रंध्रे अधूनमधून तरी मोकळी करायची असतील तर घरगुती सहजसाध्य उटणं वापरावं असं मला वाटतं.
जरासा वेळ हातात असेल तेव्हा चार चमचे दही, तिन चमचे बेसन, दोन चमचे तांदुळाचं पीठ, चमचाभर हळद, चार थेंब लिंबू रस घेऊन व्यवस्थित मिक्स करुन घ्यावं. आंघोळीच्या वेळेस चेहरा आणि संपूर्ण शरीराला माफक ओलं करुन ह्या उटण्याने व्यवस्थित मर्दन करावं. मर्दन करताना साताठ मिनिटं उटणं शरीरावरच वाळू द्यावं. नंतर कोमट पाण्यानी शरीर रगडत उटणं धुवत शरीर स्वच्छ करावं. नंतर साबण मुळीच वापरु नये. या उटण्यानी रंध्रे छान स्वच्छ होतात. (हवेतल्या उष्णतेने ती तशी मोकळी झालेलीच असतात)
कुठलही क्रीम वा लोशन वा पावडर चेह-यासाठी, शरीरासाठी वापरु नये. मोकळ्या रंध्रांनी त्वचेला खुला श्वास घेऊ द्यावा. निदान एक दिवस तरी त्वचा अतिशय रसरशीत आणि स्वच्छ होते-वाटते. मनालाही प्रसन्न वाटतं. घामटलेल्या दिवसात आठवड्यातनं एकदा तरी या उटण्यानी येथेच्छ स्नान करावं. उन्हाचा-घामाचा राप निघून जातो आणि तनामनाला एक प्रसन्न तजेला मिळतो.
No comments:
Post a Comment