हिरण्यला...
सकाळची प्रसन्न हवा आणि निरभ्र, कोवळं आभाळ..चित्तवृत्ती खुलवणारं. पण फसू नका उन्हाळा आहे. पाच मिनिटं इकडे का तिकडे होत नाही की तो आक्रस्ताळा सुर्य रंग दाखवायला सुरुच करतो.
भरभर निघाले तरीपण एका निष्पर्ण पण ऐटबाज स्पेथोडीयाने नजरबंद केलंच. पानगळी नंतरचा झाडाचा पांढरट सापळा, दोनचार फांद्यांवर पानांची कोवळी हिरवी महिरप आणि आकाशाकडे झेपावणारी एकूण एक फांदी तपकिरी शेंगफळांच्या टरफली अणकुचीदार टचटचीत टरफलांनी सजलेली.
जणू हिरव्या पानांची आणि लालभडक फुलांची सत्ता हरवलेल्या राजाचा मुगुटचं. स्केच करत पार्किंगमधेच रेंगाळले. वानरसेना आधीच कांचनवृक्ष धरुन बसली होती. कोवळ्या कांचन पानांवर आणि फुलांवर येथेच्छ ताव मारणं चालू होतं. बुलबुलांची उडती आणि शीळघाली लगबग चालूच होती.
फुलचुख्यांच्या तर पायाला भिंगरीच असते. उन्हाला भीक न घालत बसले स्केच करत. स्केच संपवून पुढे रेस्टॉरंटकडे निघाले तर नुकतंच झाडावरनं पडलेलं हिरवंगार, रसरशीत शहाळं वाटेवरच दिसलं. लगेच उचलून घेतलं. आज चहा नकोच. दमदार शहाळ्याच्या ताज्या पाण्यानेच दिवसाची सुरवात करु यात. चालताना वाटेवरच्या पॉन्डमधले मासे पोहायचा सराव उत्साहाने करताहेत. त्यापासच्या तामणी वयात आल्यासारख्या तुडुंब फुलल्या आहेत. मधमाश्यांनी त्या लोभस आणि मधूर फुलांवर हल्लाबोल केला आहे. वाटेवरच्याच पिंजऱ्यातल्या सश्यांच्या हालचाली लक्षवेधून घेताहेत. उडायची सामुदायिक कवायत करणारे कबुतरं डोक्यावरुन भरा-या मारत आहेत.
आणि आमची लाडकी ब्लश अरेच्या! तु आज इथंच मुक्कामी होतीस का ? असं नजरेनीच पण लोभसपणे विचारत आहे.
गर्द हिरव्या वृक्षवल्लींच्या सानिध्यातलं रेस्टॉरंट, गरमागरम नाश्ता, जोडीला चहुबाजूंनी तजेलदार उम्मीदभरा फुललेला निसर्ग...
अहाहा... काय ही सुहानी-रुमानी सुबह !
बस्स ! तुमको हमारी उमर लग जाय.
Saturday, 14 April 2018
सुप्रभात हिरण्यची.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment