Thursday, 12 April 2018

माझे आजोबा...एक चिरंतर स्मृती.

माझे आजोबा...एक चिरंतर स्मृती.

माझ्या आईचे वडील. श्री. रामदासराव कोळनूरकर. अत्यंत पुरोगामी विचारसरणीचे धडाडीचे व्यक्तीमत्व होते. गोरेपान, ऊंच, शिडशिडीत, घारे-निळे डोळे, शुभ्र आणि एकसारख्या दंतपंक्ती असलेला प्रसन्न हसरा चेहरा..
शुभ्र धोतर, खादीचा झब्बा..एकदम देखणे म्हटलं तरी चालेल. व्यवसायाने वकील, कृतीने स्वातंत्र्य वीर आणि नांदेड-कंधार भागात अतिशय नावाजलेले यशस्वी समाजकारणी.
आमचं पाध्यांच कुटुंब मी सात वर्षाची असेपर्यंतच नांदेडला होतं. नंतर इंजिनिअर असलेल्या माझ्या वडीलांची बदली औरंगाबादला झाली आणि आम्ही कायमचे औरंगाबादवासी झालो. माझ्या आजोबांच्या आठवणी याच काळापासूनच्या आहेत. नांदेडच्या सहवासातलं काहीच आठवत नाहीये आता.

तर या माझ्या आजोबांच लहानपण कंधार, कोळनूर याच प्रांतात गेलं. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला आणि त्यांची प्रथम पत्नी निर्वतली. अगदीच दुधपितं असलेलं बाळ(माझा मामा)एका त्रयस्थ बाईंच्या दुधावर वाढवलं गेलं. स्वतःच्या मुलासह एखाद्या अशा आईवीना लहान मुलाला आपलं दुध देणा-या स्त्रीला दुधमाय म्हणून संबोधलं जात असे. या बाई (कौसामाय म्हणत असू आम्ही त्यांना) त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सन्मानाने आमच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून कायमच येत जात राहिल्या. कालांतराने आजोबांच्या दुस-या लग्नाचा विचार घरातले करु लागले. पण स्वातंत्र्य चळवळीने झपाटून गेलेले माझे सुधारक विचारांचे आजोबा म्हणायचे आता दुसरं लग्न करेन ते विधवेशीच. जमल्यास तेही परजातीच्या मुलीशीच. पण कसं काय माहित नाही पण ब्राह्मणाच्याच एका पहिलटकरीण लग्नाळू मुलीशी माझ्या आजोबांच लग्न झालं. त्यानंतर या आजीला पाठोपाठ तिन्ही मुलीच झाल्या. आजी बहुदा मुलीच झाल्या म्हणून नाराज रहात असावी पण वडीलांच देखणं रुप घेऊन आलेल्या तिन्ही मुलींचं आजोबांना मात्र फार कौतुक असायचं. आजोबा मुलींच्या शिक्षणाबाबतीत फार आग्रही होते. झालही तसचं. माझी मोठी मावशी कॉलेजपर्यंत पोहंचून मग विवाहित झाली. पण दुर्दैवाने पाठच्या दोन्ही मुलींना(त्यातली एक माझी आई) मात्र ते शिकवू शकले नाहीत. मॅट्रीकला पोहंचत नाही की त्यांनी छकू-शालू या दोन्ही मुलींची एकाच मांडवात दोन दिवसात लग्नं लावून दिली. एवढे सुधारक असणा-या, मुलींना स्वातंत्र्य देणा-या, त्यांच्या शिक्षणाविषयी जागरुक असणा-या माझ्या आजोबांनी धाकट्या दोन्ही मुलींची लग्न इतक्या लहान वयात कशी काय लावून दिली याचं अनेकांना अजूनही फार आश्चर्य वाटतं. काही अपरिहार्यता त्यांच्या पुढे असल्याशिवाय त्यांनी हे मनाविरुद्धचे पाऊल उचलले नसावे याची मला खात्री आहे. मी समजदार झाल्यावर आईने मला सांगितले होते की आजोबांना एकदा छातीत दुखलं होतं आणि नेमकं त्याच वेळेस एका ज्योतिष्याने तुम्हाला अल्प आयुष्य आहे असं सांगितलं होतं. खरंतर माझे आजोबा ज्योतिष्यावर विश्वास न ठेवणारे होते. पण या वेळेस त्यांनी तो विश्वास ठेवला आणि आपल्या पश्चात आपल्या मुलींच कोण बघेल या धास्तीनेच त्यांनी मुलींची लग्न झटपट उरकून टाकली म्हणे. असो.
तर या तिन्ही बहिणीत माझी आई दिसायला जास्त आजोबांसारखी होती. फार लहान वयात संसार मागे लागूनही आईने संसार छान करत स्वतःला खूप डेव्हलप केलं याच त्यांनाही फार कौतुक होतं. आजी मात्र घर-संसार-स्वैपाकघर यातच रमणारी होती. पण दुर्दैवाने सत्तरच्या आसपास ती मणक्याजवळच्या ट्युमरमुळे कमरेखालून जी पांगळी झाली ती कायमचीच. नेमके आम्ही त्यावेळी औरंगाबादला शिफ्ट झालो होतो. घाटीसारखं सरकारी टोलेजंग हॉस्पिटल नुकतच औरंगाबादेत सुरु झालं होतं.
मग आजीच्या तब्येतीच्या कारणाने आणि इतर सुविधांमुळे आजी आजोबा आमच्याकडे बरेचदा दिर्घ वास्तव्यासाठी असतं.
याच काळात आजोबांचे आयुर्वेदाचे, खादीचे, शिस्तिचे, व्यायामाचे, नेचरोपथीचे, वाचनाचे, लिखाणाचे, समंजसपणाचे अमिट असे संस्कार माझ्यावर झाले.
या पाच-सहा वर्षाच्या कसोटीच्या काळात अत्यंत चिकाटीने आणि जिद्दीने आजोबांनी आजीची तब्येत सुधारायचे अथक प्रयत्न केले. औरंगाबाद तर होतचं. मुंबईतलंही बॉम्बे हॉस्पिटल गाठलं पण काही उपयोग झाला नाही. तरी फिजियो थेरपीसाठी म्हणून ते नियमितपणे तिला घाटीत घेऊन जात असतं. त्यांना घेऊन जायला दाराशी रिक्षे घेऊन येणारे आम्ही, आई आणि रिक्षावाल्याच्या मदतीने पांगळ्या अवजड आजीच्या बखोट्याला धरत तिला उचलून रिक्षात ठेवणारे आजोबा अजूनही माझ्या डोळ्यापुढे आहेत. दिवसभर सरकारी दवाखान्यातच थांबून डॉ. मारवांच्या नजरेखाली आजीची शुश्रूषा आणि फिजियो थेरपी करुन घेणारे सत्तरीतले काटक आणि धडपडे आजोबा डॉक्टरांमधेसुध्दा एक कौतुकाचा विषय होते.
मला वाटतं त्याकाळी एक दिवसाआड का आठवड्यातनं दोनदा तिला दवाखान्यात नेत असत. मग बाकीचा वेळ ते घरातच आमच्याबरोबर असत. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद असल्यामुळे त्यांची नांदेडची बरीच समवयस्क मित्रमंडळी शहरात होती. तिथे ते संध्याकाळी फेरफटका मारुन यायचे. पण पहाटेची वेळ मात्र आम्हा बहिणींचा अभ्यास घ्यायची, पाढे शिकवायची, निमकी-पावकी घोटून घ्यायची, चाराणे-आठाणे-रुपया शिकवायची असायची. पहाटेसच लाईट गेल्यानंतर कंदीलाच्या उजेडात त्यांनी नाणे हाताळत गणित शिकवलय आम्हाला. तसंच योगासनांच महत्वही ते आम्हाला याच काळात पटवून द्यायचे. संत्र्या-लिंबाच्या साली वाळवून पुड करुन उटणं म्हणून वापरायला मला आजोबांनी शिकवलं तर आहेच पण बीडस्थित मामाच्या घरी ते आमच्यासाठी अशा साली आवर्जून वाळवून ठेवत.
तसंच तो गुळाचा चहा. साखरे ऐवजी गुळ वापरायचा ट्रेंड आज रुजला आहे. गुळाचा चहा आम्ही पुर्व सत्तरच्या दशकातच प्यायला शिकलो होतो. तेही आजोबांमुळे. कुठेही मुका मार लागला, हात-पाय मुरगळला गेला की गरम-थंड-गरम-थंड पाण्याच्या पट्ट्यांनी तो भाग शेकणं, मीठाच्या पट्ट्या वापरणं, पस झालेल्या ठिकाणी पोटीस बांधणं हे सगळे प्रयोग आजोबा आम्हा दोघीं बहिणींवर करायचे. सत्तरीतले आजोबा आम्हा बहिणींना शेतातली उसाची कांड सरासर दाताने सोलून द्यायचे. त्याकाळी आजच्या मुकुंदवाडी परिसरात शेतं होती. आमच्या मामींच्या भावाचं तिथे शेत होतं. आजोबा उत्साहाने आम्हाला ऊस, पेरु, बोरं, टहाळ खाऊ घालायला त्यांच्या शेतात घेऊन गेले होते. बिन चष्म्याचे ते व्यवस्थित वाचू शकायचे. त्यांनी एक घरगुती औषध बनवलं होतं डोळ्यांसाठी. कांद्याचा रस आणि मधाच मिश्रण होतं बहुदा. डोळ्यात थेंब घातले की खूप आग व्हायची पण ते सहन करायचे आणि नियमित ते औषध घालून घ्यायचे. गाईच्या तुपाच घरगुती काजळ तयार करुन ते देखील ते डोळ्यात घालायचे.

आमच्या सरकारी तीन लहान खोल्यात साताठ जणांच्या कुटुंबात आजोबांनी मला स्टिम बाथ दिला आहे. लोखंडाच्या फोल्डिंग खुर्ची का स्टुलवर मी बसायचे. बाजूला स्टोव्हवर पाणी भरलेला कुकर ठेवलेला असायचा. शिट्टीच्या ठिकाणी निळी-हिरवी(एनिमा फेम) ट्युब फिट करायची आणि मग ट्युबचं मोकळं तोंड आणि स्टुलावरची व्यक्ती भोवती जाड चादर गुंडाळायची. ट्युबमधनं येणारी सगळी वाफ शरीराभोवती फिरायची. हा सगळा द्राविडी प्राणायाम आजोबा अगदी उत्साहाने करायचे. आम्हाला अशा नैसर्गिक उपचारांच महत्व पटवून द्यायचे. बहुदा आजीच्या आजारपणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्याच विचारधारा त्यांनी अमलात आणून पाहिल्या होत्या. अगदी भंग्यांकडनं पारव्याच रक्तही त्यांनी आजीच्या पायांना चोळलं होतं. पण सगळे उपचार आजीपुढे फोल ठरले. मग त्यांना एकच चिंता लागायची की माझ्या आधी ही(आजी) जावी. कारण ते जर आधी गेले असते तर आजीचे हालच झाले असते याची त्यांना जाणीव होती. आजी गेली आणी वर्ष दिडवर्षात आजोबा हार्ट अटॅकने झटपट गेले.

उन्हाळ्याच्या सुट्टीत ते खास मुलींच्या माहेरासाठी म्हणून नांदेडात घर करायचे. आजीचा फार हट्ट असायचा माझ्या पोरी माझ्या घरी माहेरपणासाठी आरामात रहायला आल्याच पाहिजेत म्हणून. ती स्वतः पंगू पण आजोबांकडनं सगळी तयारी करुन घ्यायची. एकदम दहाबारा जणांची महिन्याची तयारी म्हणजे भांड्याकुंड्यांपासून तयारी करावी लागायची. पाणी, किराणा, दुधाचा राबता, अंथरुणं-पांघरुणं..भरपूर काम पडायचं आजोबांवर पण आजीचं मन ते राखायचे. पडेल ते काम आनंदाने करायचे.
नक्की आठवत नाही पण बहुदा नांदेडलाच त्यांनी आम्हाला गोदावरीत पाठीला डबे लावून पोहणं शिकवायचा प्रयत्न केला होता. त्या वयात ते स्वतः अर्ध पात्र पोहले होते.
आजोबांनी फार पुर्वीच नांदेडला घर बांधलं होतं आणि आजी-मुलींनाही(शिक्षणासाठी)नांदेडलाच ठेवलं होतं. दोनतीन खोल्या स्वतःकडे ठेवून ब-याचशा खोल्या भाड्याने दिल्या होत्या. मग कालांतराने दुसरा मजला चढवला. पण अगदी पुर्णत्वाला इमारत काही नेता आली नाही. गच्चीला कठडा नव्हता, पाय-या सुरक्षित नव्हत्या. घराला नावही नव्हतं. पण उत्साही भाडेकरुंमुळे तुळस, तगर, जास्वंद, कण्हेर, कढीपत्ता, शेवगा, जाई-जुई, बटमोगरा अशी संसारोपयोगी वृक्षवल्ली मागच्या पुढच्या अंगणात छान फुलत होती.

त्याकाळी बागेला नाव, घराला नाव द्यायचा फार छंद होता मला.नांदेडच्या याच दिर्घ वास्तव्यात आजोबा आमच्याकडनं बोरुने अक्षरं गिरवून घ्यायचे. बोरु स्वतः तयार करायचे. बहुदा झाडूच्या मागच्या पोकळ केनसारख्या काड्या वापरुनच. मी तेव्हाही फार क्रियेटिव्ह होते हे, हे या क्षणीचं लिखाण करताना फार जाणवतय.
कुणीतरी दूष्टाने आमच्याकडच्या कुठल्यातरी उंच्यापु-या झाडावर पिवळ्या रंगाचा बारीक वायर सारखा विषवेल टाकला होता. झाडाच्या उंचावरच्या डोला-यावर तो सरसरून वाढत होता. तर आम्ही मुलंमुली दुपारच्या निवांत वेळेस तो वेल काढत असू. आणि आम्ही मुली त्या पिवळ्या दोरा सदृश्य वेलींनी आणि गार वेलींनी माळा, बांगड्या, कंबरपट्टे, पैंजण असले दागिने बनवून, घालून फुलराणी बनत असू.
आम्ही सगळ्या बहिणी बाग फार मनलावून साफसूफ करायचो, झाडांना हातानेच आळे करायचे, वाळलेली पानं-काटक्या काढून टाकायचो, रंगीत दगड,विटा, फरशा छान पैकी ओळीत रचायच्या, वाळू एकसारखी पसरायची आणि फळकूटी फाटकावर या न्हाऊमाखू घातलेल्या बागेच्या नावाची पाटी लटकवायची. वहीच्या पुठ्ठ्याला पांढरा कागद चिकटवायचा, त्यावर रुंद बोरुने नाव लिहायचं आणि दो-याने पाटी फाटकाला लटकवायची. हल्ली कॅनव्हास लटकवतात तशी. रोज नवं लिखाण, नवी पाटी. एकदा 'रुद्राक्ष' आणि एकदा 'शृंखला' नाव दिल्याचं आठवतंय. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अस्मादिकांकडून डायरेक्ट आजोबांच्या दुमजली इमारतीलाच नाव दिल्या गेलं.
नाव काय दिलं तर 'Twinkle' ! हे नाव राजेश खन्नाच्या नुकत्याच जन्माला आलेल्या अपत्याचं आहे ह्या वाचीव माहितीवर घेतलेली ही मर्कट उडी. बाकी काही कळो का न कळो राजेशखन्नाचं गारुड मनावर होतचं होतं.
बरं बाकीच्याही लहान बहिणी मराठवाडी मागासलेल्या पण माझ्या चेल्या. त्याही फार खळखळ न करता हो ला हो लावायच्या. मग काय आमचा वारु चौखूर उधळला. इंग्लिश का मराठीत लिहिलं तेआठवत नाही (बहुदा इंग्लिशच कारण मराठीत ट्विंकल लिहिताना, टाईपताना आत्ताही तारांबळ होत आहे.) पण ट्विंकल हे बोरुने कागदावर लिहिलेलं नाव इमारतीवर झळकलं. मग सगळ्यांनी फार अभिमानाने ही गोष्ट आजोबांना सांगितली आणि आजोबा स्तब्धच झाले. मला जवळ बोलावून म्हणाले तू हे नाव का निवडलस ? मीही मोठ्या माहितगाराप्रमाणे त्यांना श्रीयुत राजेशखन्नांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडीची माहिती दिली आणि 'Twinkle' हे नाव देण्यामागची माझी भुमिका सांगितली. अतिशय शांतपणे त्या वयस्क आणि खादीधारी स्वातंत्र्य सैनिकाने त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल आता किती समाधान वाटतय ते सांगितलं आणि ट्विंकलच्या ऐवजी 'समाधान' हेच नाव या घराला जास्त योग्य आहे हे मला पटवून सांगितलं. दुस-या दिवशी मी परत एक पाटी तयार केली आणि समाधान हे अक्षर बोरुने मराठीत लिहून ती पाटी पुन्हा गौरवाने स्थानापन्न केली.

बहुतेक याच ट्रिपमधे आजोबांच्या तिन्ही मुलींनी मिळून आपल्या आई-वडीलांचा घरगुती सत्कार केला होता. त्याचे फोटो अजूनही आहेत. आजोबांपेक्षाही कायमच मागे मागे राहिलेल्या अपंग आजीसाठीच हा घाट बहुदा मुलींनी घातला असावा.
खरं सांगू जसं जसं हे लिहित जातेय तशी तशी एक हताश हुरहूर मनाला लागलीये.
काळाच्या ओघात किती माणसं, किती नातेसंबंध गडप झालीयेत. छोट्या-मोठ्या पण ह्रद्य गोष्टी, घटना व्हेरीफाय करायलाही आता कोणी शिल्लक नाही. अक्षरशः भडभडून येतयं. खरंच आपण फार म्हणजे फार बेफिकीर जगतो नाही कधी कधी ?

आजोबा फार शिस्तप्रिय आणि नेटके रहाणारे होते. घरातला मोठा आणि आदरणीय दादा म्हणून सर्वांनाच त्यांचा आदबशीर धाक होता. त्यांच्या तरुणपणी म्हणजे साधारण १९४८च्या आसपास त्यांनी कंधारमधल्या मारुती मंदिरात हरीजनांसाठी पहिली शाळा सुरु केली होती. हरीजनांसाठी मंदीरं, विहिरी खुल्या करायची धडपड केली. जवळच्याच लोहा येथे एका विधवेचा पुनर्विवाह पुढाकाराने लावून दिला. कंधार मधलं आजचं सुप्रसिद्ध विचार-विकास मंदिर ग्रंथालय ही पहिली लायब्ररी त्यांनीच सुरु केली आणि फार हिरीरीने ती लायब्ररी चालवली पण. मराठवाडा विद्यापीठांतर्गत बहिःशाल व्याख्यानमाला त्याकाळी अनेक गावी चालवली जात असे. आजोबांच्या धोरणीपणाने ती व्याख्यानमाला कंधारलाही राबवली गेली. त्यानिमित्ताने कंधारला राम शेवाळकर, युसुफ पठाण, द मा मिराजदार, सुधाताई काळदाते, नरहर कुरुदकर, वसंत कुंभोजकर असे एकसे एक दिग्गज विचारवंत, लेखक  येऊन गेले, आमच्या घरीही राहून गेले आहेत.
हैद्राबाद मुक्ती संग्राम व्हायच्या आधी मराठवाड्याचा सर्वेसर्वा हुकुमशहा निजामाचा वाढदिवस मराठवाड्यातील गावोगावी रोषणाई करुन जुलमाने साजरा केला जाई. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा निजामाचा जुलूम जास्तच वाढला तेव्हा त्याचा निषेध म्हणून निजामाचा वाढदिवस एकही दिवा, कंदील वा पणतीही घरादारात कुठेही न पेटवता कंधारमधे निषेधपुर्वक फार यशस्वीपणे साजरा केल्या गेला. ही कल्पनाही आजोबांची आणि अमलात आणायची हिंमत पण आजोबांचीच.
त्यांना वाचनाची फार आवड होती. मराठवाड्यातील लेखकांना, कवींना प्रोत्साहन द्यायला ते तत्पर असत. शालेय वयातील माझ्या कविता ऐकून ते मलाही शाबासकी देत. चांगली पुस्तकं कशी ओळखायची, पुस्तकातल्या कंटेटचा परामर्श कसा प्रस्तावनेत, अनुक्रमणीकेत असतो. पुस्तक वाचायच्या आधी पुस्तकाची प्रस्तावना वाचावी ही त्यांनी दिलेली शिकवण मी अजूनही पाळते. म्हणजे कुठलीही प्रस्तावना वाचायला घेताना मला आधी आजोबाच आठवतात. मी दहावीची परिक्षा दिली. आई आणि लहान भाऊ आणि आजोबा नांदेडच एका परिचितांच लग्न लावून औरंगाबादला आले होते.
आमच्याकडे पाहुणेही होते आणि आईने कुणाला तरी जेवायला पण बोलावलं होतं बहुदा. आजोबा सकाळी सरस्वती भुवन या संस्थेतील लायब्ररीच्या उदघाटनाला का एका कार्यक्रमाला उदघाटक म्हणून जाऊन आले. दुपारचं खीरपुरीचं जेवण जेवले आणि तासाभरातच बैचेन वाटतय म्हणून कासावीस झाले, सैरभैर झाले. आम्ही शेजा-याचे हैद्राबादहून पाहुणे म्हणून आलेले डॉक्टर जावाई तातडीने बोलावून आणले. त्यांनी जमेल तशी जुजबी तपासणी केली आणि मॅसिव्ह हार्ट अटॅक आहे म्हणून सांगितलं. काहीही वैद्यकीय मदत मिळण्या दृष्टीने हालचाल करायच्या आधीच बघताबघता पाच मिनिटात आजोबा गेले पण आणि एकच हलकल्लोळ माजला. डोळ्या देखत आम्ही पाहिलेला पहिला मृत्यु.

यथावकाश मी दहावी बेतानेच पास झाले. माझ्या आईचं ड्रॉईंग चांगलं होतं, माझ्या आजोबांचही ड्रॉईंग छानच होतं. माझही बरं होतं. काहीतरी वेगळं शिकायच म्हणून मी आर्ट स्कुलला प्रवेश घेतला. बहुदा या किंवा आधीच्या ट्रिपमधेच आजोबांनी आईच्या क्रायलीन पेंटसनी आम्हाला एक पोपट अगदी सहजपणे रंगवून दाखवला होता. आईच्या सांभाळलेल्या शिवणाच्या गाठोड्यात ते कापड खूप दिवस होतं. पण काळाच्या ओघात आणि करंटेपणाच्या जोशात ते आता हरवलय. तसंच मी आर्टस्कुलला गेल्यावर एका सिनियर होतकरु चित्रकार मुलाकडनं माझ्या आईने आजोबांच एक पेन्सिल पोर्ट्रेट करुन घेतलं होतं. बरेच दिवस ती हसरी, राखाडी फ्रेम आमच्याकडेच होती. कालांतराने वसमतच्या मावशीकडे ती फ्रेम गेली. आता तर मावशी पण गेली. मध्यंतरी त्यांनी घरही बदललं. मीही बसल्या जागेवरुनच त्या फ्रेमचा मागोवा घेतला. पण एकूणच जसं काळाबरोबर पुलाखालून बरच पाणी वाहून जातं-गेलं. तशीच ती फ्रेमही कालौघात गायब झाली.
पण आजोबांची  ते गेले त्या वेळेसची कुडत्याची बटनं मी अजूनही सांभाळून ठेवली आहेत.
मनात आलं तर अनेक पिढ्यांचा इतिहास जपला जातो नसता तीन पिढ्यात नामशेष व्हायला वेळ लागत नाही.
काळाची ही गती कधी पथ्थ्यावर पडते तर कधी काळीज कोरत रहाते.

आजोबा एवढे विचारी आणि परिवर्तनवादी तरी त्यांच्यांतल्या या गुणांचा वारसा कुटुंबातील कुणाही कडनं फार ठळकपणे चालवल्या गेल्या नाही याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं. कदाचित मुलींमधे ते गुण असले तरी संसारीक जबाबदारी सांभाळून काही वेगळं परिवर्तनवादी आचरण करणं स्त्री या नात्याने त्यांना शक्य झालं नसावं. पण विचारांनी समाजवादी आणि आचरणानी परिवर्तनवादी असलेल्या एका आदर्शवत व्यक्तीची गादी कुणीही म्हणावी तशी हिरीरीने चालवली नाही. तरी देखील एक पुरोगामी कुटुंब अशीच ओळख कोळनुरकर कुटुंबाची आजही आहे हेही खरं.
आज आपल्याच स्वतंत्राने स्वातंत्र्य घेणा-या मुलांना समजुन घेताना आपलीही बरीच कुचंबणा होत असते. आजोबांनी तर अमुलाग्र विरोधी स्वभावाच्या पत्नीला, अपत्यांना सांभाळून घेत आयुष्याची इतिश्री समाधानाने केली. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच समाधान मला थोडंफार समजतंय.

  
नांदेड-कंधारचे तेव्हाचे दिवस, आजोबांचे निसर्गोपचार, वाचन-लेखनाचे धडे, आजीच्या बाबतीतली धडपड...
स्पष्टपणे आठवलं तरी हे सगळं आता दुरच्या ग्रहावरचं वाटण्या इतकं पुसट झालंय. माझ्या सध्याच्या आयुष्यातल्या पाऊलवाटेवर माझ्या आजोबांची कुठलीही सदेहाची पाऊलखुण नाहीये.
कुठून जर प्रकट झालेच आजोबा तर ते मला ओळखतील तरी का ?
माझ्या खादीप्रेमात, निसर्गोपचारात, वळणदार हस्ताक्षरात, वाचनप्रेमात ठाईठाई मी त्यांचीच सावली आहे हे त्यांना जाणवेल का ?
तल्लीनपणे आज एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना वाचताना मला बघून ते समाधानाने प्रसन्न हसतील का ?

No comments:

Post a Comment