Monday, 9 April 2018

चढत्या उन्हातला शॉवर, सुगंधी पावडर, एसीतला सुकून, हलके फुलके कपडे, डोक्यावर स्टोल, डोळ्यावर गॉगल, गाडीतला एसी, गीता दत्तची मादक धून..Going out for summer special hair cut.

बाहेरच्या उन्हाळी रखरखाटात आपण मात्र आपल्यापुरता उन्हाळा नामोहरम करत आल्हाद जात असतो...
अचानक करकचून ब्रेक लावावा लागतो,
कारण मधे ती तडमडलेली असते.
ती म्हणजे एक स्त्री रुपातली सावळ-मावळ, बाभळ काठी..
भर मध्यान्हीची टिव्ही बंद करुन घराबाहेर पडलेली..
पाण्यासाठी..
कुणा एका साहेबरावांची घरधनीण.
पिंढ-या दिसतील अशी खोचलेली साडी..
दोन्ही वक्षांमधनं जाणारा घट्ट पदर..
केसांचा बुचडा..
डोईवर घागर, हातात बादली..
पाण्याने भरलेली..
वजनाने देहकाठी वाकडी झालेली,
केसांमधल्या घामाने पाठ-छाती भिजलेली..
पण चेह-यावर एक चिवट्ट जिद्दी ओला आनंद.

तिच्या मागुनच एक म्हतारी.
केसांची अंबाडी, दाताचं बोळकं..
विशविशीत देह..
वाकडे पाय..
विरलेलं लुगडं..
फाटकी चोळी..
डोईवरची घागर थरथर धरलेली..
हातावरचं धुसर श्रीरामा गोंदण ओलावलेलं..
भर माध्यान्हीची चुल विझवून पाण्यासाठी खोपटाबाहेर पडलेली ती कुणा अनेकांची माऊली.

तिच्यामागे एक पोरवसदा पोट्टी.
केसांच्या झिप-या..
फाटका युनिफॉर्म..
पाठीला उघडा..
छातीशी मोकळा..
उमलू लागलेली कोवळी काया..
रंगीत नख्या..तळहाती मेंदी..
बारकुड्या हाती भरलेली कॅन..
चेह-यावर भिजट्ट हसू.
भर माध्यान्ही शाळा बुडवून पाण्यासाठी आलेली कुण्या एका बापाची छकुली.

कुठला तरी सार्वजनिक वा फुटका नळ.
नळाचं बेबंद, बेगुमान पाणी..
चार-सहा दिवसांनी कृपाळूपणाने येणारं..
कमल, विमल, सुमन, मंगल..
छबाबाई, गंगाबाई, सोनाबाई..
कविता, अनिता..
हातातली कामं टाकतात आणि भर उन्हाचं शरीर जाळत, मन मारत घरातल्यांसाठी पाणी भरतात.

No comments:

Post a Comment