रात्रीचे साडे आठ वाजलेत. माझ्याकडे भरपूर सामान आहे. CST वरुन निघणारी ठाण्याची स्लो लोकल. दिवसभर पायपीट करुन कशीबशी ही लोकल पकडली तर उलट्या दिशेची का होत नाही चक्क खिडकीजवळ बसायला जागा मिळाली. सामान ठेवता आलं.
माझ्या समोर दोघीजणी नियमित ये-जा करणाऱ्या बसल्या आहेत. पटापट एकमेकींना आवाज देत बोलावून घेत लगटुन बसल्या आणि लगेच आपापसात गप्पा मारायला सुरवात पण केली दोघींनी. एक दोन स्टेशनं जाईपर्यंत मी त्यांचा अंदाज घेतला आणि हळूहळू त्यांच्याशी बोलती झाले.
माझ्या समोरची खिडकीतली मुलगी जेमतेम तिशीची. बॉम्बे हॉस्पिटल जवळ एका घरात नर्स म्हणून काम करते. सकाळी आठ ते रात्री आठ. बारा तास ड्युटी. पगार पंधरा हजार रुपये. रहाते डोंबिवली जवळच्या गावात. डोंबिवली पासून परत शेयर रिक्षाकरुन घरी जाते. रोजचा रिक्षा प्रवास खर्च पंचवीस रुपयांपेक्षा जास्त. परत लोकलचा पास वेगळाच. घरी दहा वर्षाचा मुलगा आहे. नवरा दुसरीच्या मागे गेलेला. रोज परतीची ट्रेन साडे आठला. घरी पोहोंचायला रात्रीचे दहा वाजतात. घरी जाणं म्हणजे फक्त दोन घास गिळायला आणि निश्चिंच अंग टाकायलाच. मुलाचा आणि हिचा काय सहवास घडत असेल देव जाणे.
...तू ठाण्याजवळची नौकरी का नाही धरत ? पैसे जरा कमी मिळतील पण ही रोजची तीन तास प्रवासाची कटकट तरी वाचेल ना ?
ताई..तिकडे फक्त पाच सहा हजार मिळतात. इथे माझा खर्च जाऊन नऊ-दहा हजार रुपये हातात पडतात.
...अगं मग ब्युरोकडनं नौकरी बघ.
ताई..ब्युरोतनं चांगली नौकरी मिळते पण दर महिन्याला पाच हजार त्यांना द्यावे लागतात. नकोच तू. त्यापेक्षा आपण आपल्या ओळखीतच नौकरी पाहिलेली परवडते. आणि ते ब्युरोवाले कुठेही पाठवतात गरजेप्रमाणे. ते काही आपल्याच्याने होतं नाही. ही नौकरी बरी आहे. मी पण या घरा बरोबर ऍडजस्ट झाले आहे. प्रवासाचं म्हणाल तर करायची मेहनत, होते सवय.
तेवढ्यात एका टुकार समोसेवाल्याकडनं तिने दोन समोसे घेतले. तिच्या मैत्रीणीला विचारलं तर तिचा उपास होता. मग मला विचारलं, मी नको म्हटलं.
तीची मैत्रीण पस्तिसच्या पुढची. CST जवळच्या कैन्टीनमधे स्वैपाक घरात पडेल ते काम करते. नवराही कुलाब्याला कुठल्या तरी स्नॅक्सबार वर काम करतो. ही पण महिला दिवा का कळव्या पर्यंत जाणार. सकाळचे ११ ते ८ ड्युटी हिची. नव-याची सकाळचे ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत. म्हणजे नवरा एव्हाना घरी पोहोंचलेला. दोन्ही वेळच्या पोळ्या-भाजी सकाळीच करते, आता घरी पोचल्यावर कुकर लावणार.
...तुम्ही अक्षरशः रोज तीन तास प्रवासात घालवता. काही वाचत का नाही ?
ताई...सकाळी तर उभ्यानेच प्रवास होतो. रात्रीच फक्त बसायला जागा मिळते. मग जरा मैत्रीणींशी गप्पा मारतो. तरी मी हल्ली लोकरीचं तोरण करायला घेतलं आहे. पण मला गप्पाच मारायला आवडतात. नाही तर काय घर-प्रवास-नौकरी-प्रवास-घर..दुसरं काही आयुष्यचं नाही बघा आम्हाला.##
इतक्यात उपासवालीने पर्समधून बटाट्याचा किस काढून, शेजारी विचारुन खायला सुरवात केली.
##नर्सबाईंनी मोबाईलवर सिनेमा लावला व दोघी मिळून इयरफोन्सवर सिनेमा ऐकण्यात तल्लीन झाल्या.
बायकांच्या कलकलाटात आणि लोकलच्या तालावर.
No comments:
Post a Comment