Wednesday, 4 April 2018

खुळखुळा

मायला !
या मुंबैहून आलं लगी खुळ्यावानीच व्हतय रावं. दोनचार दिसं तं लगी सुदरतच न्हाई मपल्या जीवाला. काय ती ममई..काय तिचा थाटं ?
लगी देशाची पट्टरानीच जशी.
काय त्या बिल्डिंगा, काय त्ये रस्त्ये, काय त्या गाड्या, ट्रेना..लगी बघू बघू केल्य तरी मान मोडायचच काम हाय. काय ती दुकानं, ती गर्दी आन काय त्या मडमा. लगी कोन बामनाची आन कोन किरीस्तावाची आन कोन वान्याची काईच कळना बगा. समद्या बाया बापड्या, पोरीबाळी शिनुमातल्या सारख्या नायतर टिवीमधल्या सारक्या. लांडेलुंडे कपडे, क्येसाचं हे इरलं, काय त्ये शांडिला..कस्काय चालत्यात कळत नाय आपल्याला. आन जे दारी त्येच घरी.

काड्यापेटी सारकी का घरं आशेनात पन ठेवत्यात अशी टेचात की बगतच -हावं. गुळगुळीत फर्शी, भिंताड, आरश्यावानी वटे, बेशीना, ग्यास, कपाटं..भांडीकुंडी लगी समदच चकाचक. मला तं वाट्ते त्यो कोन्ता का जीन फिन येत आसलं रातच्याला सोच्छता करायला. यकल्या दुकल्याच कामचं न्हाई वं त्ये. बरं घरमालकीन कामं करती म्हनावं तं इस्वासच बसत न्हाई. लगी लोन्यागत मऊ हातंपायं, नखे वाढलेली, रंगवलेली, ओठं रंगवीलेले, केसाच झुंबाड..कपडेबिपडे लगी हेरॉईनवानीच. कामं करनारी अशी अस्तीया वं ?
आन त्या मोलं कामं करना-या तं लईच जोरात असतेत. कदीमदी गड्याळ मागंपुडं व्हईल पन यांच येनं चुकत न्हाई. चमकीचे ड्रेसं, आंगभर बारीकसारीक सोनं-चांदी, डोक्यात गजरा आन हातात उनाची छत्री, तोंडावर हसू..बाय..बाय..आमची तर मामलेदारीन पन इतकी टेचात -हात न्हाय.
हां तं म्या सांगत व्हते खुळेपनाच न्हाई का ?

आता मोट्या शेहराचं काई बी चांगलं पाईलं की आपल्याला बी लगी आपलं बी तस्सच असावोसे वाट्ते. आता मानुस म्हन्लं की आलचं की वो त्ये. तर म्या चार दिवस मुंबै फिरले की लगी माजे डोळेच फिरले. जशी ओरंगाबादला आले तशी लगी मही लईच चिडचिड व्हायली बगा. आवो काय ती धुळ, काय तो कचरा आन काय ते खड्डोखड्डी रस्ते. लगी मपल्या गावची लाजच वाट्ली बगा. आता गावचा राडा तं आपन न्हाय सुदरु शकत पन घर तं आपलंच हाय ना?
बाया नसल्या तरी मंग म्या लगी घर सोच्छ कराचा  ईडाच उचीलला. दोन दिस झाले लगी कंबरड गेलं मोडून माह्य ह्यो घर साफ करु करु.
ह्ये पूस, त्ये पुस..ह्ये टाकून द्ये, त्ये फ्येकून द्ये,
वटे धु..ग्यास पुस..लगी पान्याचा तर धूम खेळ मांडीला. आता पान्याचा पन काई रागरंग बगावा की नाई माह्यासारक्या शान्या बाईनं ? लागले सोच्छता कराले. दुनियेचं धुनंधानं केलं आन खालचं-वरचं पानी गेलं की संपून.
आता आंगोळीला बी पानी न्हाई का पेयाला पन पानी न्हाई. आसा उताडा झाला मह्या जीवाचा की इचारता सोय न्हाई. आता कदी पानी येईल म्हाईत न्हाई.
उगा आपन बरुबरी करीतली त्या मुंबैसारखी.
कुटं इंद्राचा ऐरावत आन कुटं आपली गावराण तट्टानी. इचारत करीत बसले तं उगा जीव तडतडला. ज्ये काय हाय ते आपलं हाय आन ब्येष्ट हाय.
फुगुन फुगुन बेडकाच बैल कदी झाल्याच ऐकलंव कावं ?
आपन उगी यडं लागल्यावानी खुळखुळू -हायलोत कदीचं !
एव्ढे केसं पांढरे झालेता पन आपल्याला आजून बी कळना की हांतरुन पाऊन पायं पस्रावेत त्ये !
येडी बाई.

No comments:

Post a Comment