Wednesday, 4 April 2018

मुंबईतल्या एका मॉल(आधुनिक किराणा दुकान) मधे फिरताना ही अशी ट्रॉली पहिल्यांदा दिसली आणि चकीत झाले. जिथे खूप अवजड सामान खूप दुरवर न्यायचं असेल तिथे अशी वाकायला न लावणारी, उचलायला न लावणारी ट्रॉली असणं गरजेचच आहे पण दैनंदीन गरजेच्या गोष्टी नियमित आणि सततच घेताना या ट्रॉलीची का गरज पडत असावी बरं?
वाकणं नाही, जड उचलणं नाही, शरीर ताणणं नाही. उच्चभ्रुंचे सगळेच व्यवहार शरीराला फारसा धक्का न लावता कसे होतील असचं या कंपन्या बघत असतात हल्ली.
फ्रिजचे डिप फ्रिजर्स सुध्दा हल्ली खाली असतात तर सतत लागणारा भाज्यांचा कप्पा सहजपणे न वाकता भाज्या हाती येईल असा असतो.अगदी वॉशरुम्समधेही नळ सुरु करावा लागत नाही का नैपकीन, टिश्युला हात पुसावा लागत नाही. तीच गत त्या जेट वॉशवाल्या कमोडसची. हल्लीच कमोडवर बसून सुध्दा पोटावर योग्य दाब येण्यासाठी म्हणून पायाखाली घ्यायच्या स्टुलची जाहिरात पाहिली आहे. एकुणातच सगळ्याच शहरी लोकांचा कामं करतानाचा सहजगत्या होणारा व्यायाम अक्षरशः मोडीत निघालाय. असले सहज वाकायचे, ताण द्यायचे व्यायाम करायला जिम, योगवर्ग गाठायला लागताहेत हल्ली. अगदी छोट्या छोट्या हालचाली पण त्या देखील आपण करायला विसरुन चाललो आहोत हे देखील आपल्याला आपला जिम ट्रेनर किंवा योग शिक्षक सांगतो म्हणून कळतात.
महानगरातली तर गोष्ट अजूनच निराळी असते.
मानेचे, मणक्याचे, पाठीचे दुखणे, फ्रोजन शोल्डर, कॉन्स्टिपेशन, ऍसिडीटी सारखे आजार तर घरोघर होताहेत आणि वारेमाप उठवळ जिम, हेल्थ सेंटर्स, गल्लोगल्ली उगवताहेत. बहुतेकांचा सगळा भर त्या शरीराच्या वरवरच्या सडपातळ सुदृढतेकडे.
नाही म्हणायला त्या ऋतुजा दिवेकरनी मात्र जुनं ते सोनं, local is best सांगायचा बरा विडा उचलला आहे.

No comments:

Post a Comment