Friday, 30 March 2018

पाणी मुंबईच.

आपण एका गावाहून दुस-या गावी जातो तेव्हा हवापालट, वातावरण बदल, स्थान बदल तर होतोच पण आपलीही मनस्थिती जरा बदलते. आपलं रहातं गाव, तिथली परिस्थिती आणि परगावची परिस्थिती याची एक तुलनात्मक टिपणं आपल्या मनात सतत टिपली जात असतात. अगदी एकच राज्य जरी असलं तरी प्रत्येक गावं आपापली एक वेगळीच कुंचडी घालून जगत असतं.

उन्हाळा म्हटला की आमच्या मराठवाड्यात पाणी टंचाई हा ज्वलंतपणे भिषण विषय होतो. वर्षभर दर तीन दिवसाआड येणारं माफक पाणी. प्रत्येक वसाहतीला वेगवेगळा दिवस आणि वेगवेगळी वेळ. मग तुम्ही कष्टक-यांच्या वसाहतीत रहा का, अपार्टमेंट रहा का, टोलेजंग बंगल्यात रहा. कॉर्पोरेशनच पाणी असच येणार. मग तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे, आर्थिक ताकदीप्रमाणे टैंकर्सनी जास्तीच पाणी मागवा आणि वापरा.
निगरगट्ट राजकारणी, आणि सोशिक जनता असल्यावर काय होणार ? पाणी हा दर ऊन्हाळ्यातलं एक वांझोट वाळवण आहे आमचं.
आता तर टैंकर्सनी पाणी मागवणही आमच्या पचनी पडलय. तरी पण पाण्याची काटकसर आयुष्याला पुजलेलीच आहे. नाही म्हटलं तरी गरीब-श्रीमंत सर्वांवरच या वातावरणाचा परिणाम होतो आणि मग पाणी शक्यतो काटकसरीनेच वापरणे अगदी सहजपणे सगळ्यांच्याच अंगवळणी पडते.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून तुमची मानसिकता कळत रहाते. पाहुणे-राऊळे निस्तरताना, स्वैपाक घरात, बाकीच्या घरात, बाग-बगीच्यात, गाड्या धुण्या-पुसण्यात आम्ही जमेल तेवढी डोळस काटकसर करतो, काळजीपूर्वक करवून घेतो. Now that has become our way of life.

मग जिथे मुबलक पाणी आहे अशा ठिकाणी आलं की सततच इथली-तिथली तुलना होत रहाते. आमच्या अडचणी आणि इथलं सुख, त्याचे बरे वाईट परिणाम..मनामधे सतत विचार सुरुच रहातात.

तर सध्या मुंबईत आले आहे.ऐसपैस पसरलेली महाराष्ट्राची राजधानी. देशाचं व्यावसायिक काळीज म्हणजे मुंबई, म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीनेही ओसंडून जाणारं एक महानगर आहे.
तरी पण इथे उत्तम प्रतीचं आणि भरपूर पाणी उपलब्ध आहे. वसाहती, चाळी आणि बंगल्यांशिवाय इथली बहुतांश निवासस्थानं अनेक मजली इमारतींमधे. एकेका इमारतीत किमान चाळीस-पन्नास कुटुंब. प्रत्येक घरात किमान चार माणसं. घरातली एखादी व्यक्ती सोडली तर बाकीचे दिवसभर घराबाहेर रहाणारे. जवळच समुद्र किनारा त्यामुळे दमट हवा आणि प्रचंड उन्हाळी घाम याचच राज्य.

गोष्टी छोट्याच असतात पण थेंबे थेंबे तळेसारखचं इथे धारे धारे पाणी वाया जाई असं वाटायची परिस्थिती घरोघर आहे. दहाव्या-पंधराव्या मजल्यांवरुन प्रचंड प्रेशरने येणारं पाणी, आणि पाणी वाहतं ठेवून वैयक्तिक सफाई करणारे घरातले आणी घराची सफाई करणारे कामगार किती वारेमाप पाणी वाया घालवतात इथे ? त्यात अनेकांचे अतिरेकी सफाईचे फंडे.
सकाळचे सात वाजत नाहीत की दोन दिवसाआड खिडक्या धुणारे, महिन्यातनं एकदा घराच्या सगळ्या भिंती धुणारे, दिवसातनं दोनदा संडास-बाथरुम धुणारे महाभाग इथे आहेत. अति घामाला, अति स्वच्छतेची जोड म्हणून दिवसातनं दोनदा शॉवर घेणे, तेवढेच दुप्पट कपडे धुवायला टाकणे. मशीनचे कपडे वेगळे, हाताने धुवायचे वेगळेच. पाणी खूप सॉफ्ट.. हा बदाबदा फेस होतो. म्हणजे कपडे स्वच्छ करायला भरपूरच पाणी लागणार. तशीच ती भांडी घासणं. चार माणसात ढिगभर भांडी. बाजारातली तरत-हेची साबणं हात सैल सोडून वापरायची आणि नळ वाहता ठेवून खंगाळत बसायची. कीती पाणी वाया जातय, केमिकली बनवलेल्या फैन्सी साबणांनी पाणी कीती पोल्युट होत असेल याचा किती जणी विचार करत असतील बरं ?
वैयक्तिक टापटीप रहाणं आणि टापटीपीची घरं याचा डायरेक्ट संबंध पाणी वापराशी आहे म्हटलं तरी चालेल.
धुणं-भांडी करतानाचं अखंड वाहणारं फोर्सफुल पाणी आणि सफेदीका चमत्कार करणारा झाग ही झाग हा पाणी वाया घालवायचा आणि अशुध्द करायचा एक राजमार्ग झालाय म्हटलं तरी वावगं ठरु नये इथे.

असो प्रत्येकच गोष्टीला चांगल्या वाईट बाजू असतात. मुंबईकरांनाही आमच्या कडचा धुराळा, रखरखीतपणा, कमी स्वच्छता खटकतच असेल. तरी पण पाणी वाचवणं हा जागतिक कळकळीचा मुद्दा झाल्यानंतर सुध्दा, खेडोपाडी, रस्तोरस्ती डोक्यावर हंडे घेतलेल्या लहान मुली, महिला दिसत असताना देखील,
अख्ख्या चराचराला चहुबाजूंनी असा हा पाण्याचा शोष लागलेला असताना हे असं फक्त आपल्यापुरतं बघत, घराघरातलं वारेमाप पाणी वापरणं खटकत रहातं.

No comments:

Post a Comment