Wednesday, 28 March 2018

चंची.

किती उत्सुकता चाळवतो नाही हा शब्द. मराठी ग्रामीण भाषेत चंची म्हणजे बायकांची कमरेला खोचायची पिशवी. अगदी प्रत्येकच बाई रोजच वापरणार ही चंची. त्यामुळे या आपल्या चंचीच डिझाईन पण खुपच
पारंपरिक पण अगदी व्यवहार योग्यतेचं आहे.
या चंच्यांमधे पण स्त्रियांची सृजनशीलता आणि व्यवहारी नजर ठळकपणे दिसते. विविध राज्यातील भागात फिरताना मला आपला छंदच जडलाय या चंच्या आभ्यासायचा आणि जमवायचा पण.
आपल्या महाराष्ट्रातल्या चंच्या पांढरट किंवा गडद रंगाच्या दणकट कापडाला चटपटीत रंगांच्या प्लेन कापडांच्या चिमण्या(त्रिकोण), झालरी, लेसेस लावलेल्या असतात. याला चार मोठे कप्पे असतात व एक छोटा बाहेरचा झिपवाला कप्पा असतो. कधी कधी चोरकप्पा पण असतो. सहसा नऊवार नेसणा-या ग्रामीण महिला या चंच्या वापरतात. प्रवासाला निघताना चंचीला दोरी बांधून ती दोरी कमरेला गुंडाळतात. काय बिशाद आहे चंची चोरीला जायची ? या चार कप्प्यांमधे नोटा, सुटे पैसे, सुपा-या, खांडक्या...हो..हो..
आग्दी तंबाकू, इडीकाडी पन आस्ती, दातकन, क्वानकोरी, यकादा फोटू आन फोनाची डायरी बी अस्तीया बरं ! ख्वोट कशाला ब्वोला ?
फोटो दिसणा-या मण्यांनी नखशिखान्त विणलेल्या चंच्या(बंजारा भाषेत त्यांना पिवशी म्हणतात) बंजारा महिलांच्या आहेत. अक्षरशः मानपाठ एक करत, जीव ओतून केलेल्या या चंच्या प्रत्येक बंजारा महिलेच्या दिल के करीब असतात. आणि का नाही असणारं ?
ज्याची नजर पडेल त्याला भुरळ पडेल असचं त्यांच साजीरं रुपडं आहे. मराठी चंच्यांसारखाच याचा पैटर्न असतो फक्त प्रत्येकच गोष्ट मणी, घुंगरांनी नटवलेली असते. या चंच्यांची मणी विणकामाची पद्धत फार युनिक असते.
कीतीही त-हेच्या या चंच्या घेतल्या तरी तृप्तीच मिळत नाही.
फुलवाली चंची तर बचतगटाच्या प्रदर्शनातील एका बंजारा महिलेकडनं तिच्या कमरेची काढून घेतली. म्हणजे तिनेच विकत दिली. हातसडीच्या डाळी विकत होती. आता मी घेऊन घेऊन किती डाळी घेणार ? काही तरी घ्याच म्हणली. माझी नजर हिच्या पिवशीवर पडून हरकली. म्हणली आता ही तरी घ्या आणि आल्यासरशी माझा धंदा तरी होऊ द्या. नजाकती पांढ-या मण्यांच्या लेसची 'पिवशी' आंध्रातल्या नागार्जुन कोंडाच्या रस्त्यावर आठवडी बाजारात घेतली.
भौमितिक आकारातल्या दोन्ही चंच्या जरी पुसदच्या बंजारा पहुरादेवीच्या जत्रेत घेतलेल्या असल्या तरी त्या आमच्या मराठवाड्यातल्या जिंतूर भागातल्या बंजारा महिलांनी बनवलेल्या आहेत. आता बोला ?
जी एक साधी जरीच्या पट्ट्याची चंची आहे ती बटव्यासारखी एक कप्प्याची आहे. सिंथेटिक कापडाची आहे. खुप स्वस्तात मिळाल्या पॉन्डेचरीच्या भाजी बाजारात. अर्धा डझन विकत घेतल्या होत्या. काही वाटल्या.
Its an excellent gift article.
आपलं प्रवासातलं मेकअप, ज्वुलरी, टिकल्या, पिनांच शृंगार किट म्हणून वापरायला या सारखी बाजिंदी आणि पारंपरिक वस्तू नाही.

No comments:

Post a Comment