Tuesday, 27 March 2018

ओंजळभर चिंचा.

मधे नांदेडला गेले तर माझ्या सर्वात मोठ्या चुलत बहिणीकडे बरेच जुने फोटो पहायला मिळाले. लगेचच त्याचे स्नैप्स मोबाईलमधे घेऊन टाकले. आज सकाळी गुढी पाडव्याच्या शुभेच्छांची फोटोंची पोतडी रिकामी करत होते तर हा फोटो निट पाहिला आणि यातली तिनचाकी सायकल पाहिली आणि ब-याच गोष्टी मनःचक्षुसमोर तरळून गेल्या.

आम्ही सत्तर साली नांदेड हे गाव सोडून औरंगाबादला रहायला आलो. बहिण नऊ वर्षाची, मी सात वर्षांची होते आणि माझ्या पाठचा भाऊ जेमतेम तीन वर्षांचा होता. सगळ्यात धाकटा तर इथेच जन्मला. दोन मुलींच्या पाठीवर झालेला म्हणून माझ्या या भावाचं विशेष कौतुक होतं. बहुदा त्याच्या तिसऱ्या वाढदिवसाला ही तिनचाकी सायकल घेतली असावी. फरश्यांची घरं, एका मजल्यावर जवळ जवळ अशी तिन बि-हाडं. तिन्ही घरातनं माझा भाऊ धडपडत सायकल चालवायचा. बहुतेकांना त्याकाळी अशी सायकल विकत घेणं सुध्दा दुरापास्त असावं. एकूणच भावाचं आणि सायकलचं त्याकाळी तिथे कौतुक होतं.
आम्ही कोटला कॉलनीत तळमजल्यावर रहायचो तर आमच्या अगदी डोक्यावर एक पुणेरी भावे आडनावाचे कुटुंब रहायचं. आईवडील, चौदा-दहा वर्षाची अशी दोन आडदांड मुलं असं ते कुटुंब होतं. मराठवाडी ऐसपैस देशस्त कुटुंबाला तर भावे आडनावाचाच आधी दरारा वाटला असावा बहुतेक.
त्यात भावे काका एग्झिक्युटिव्ह इंजिनिअर. काकांना घ्यायला रोज सरकारी जीप यायची. भक्कम बांध्याचे काका अबोल तर भावे काकूही तशाच उंच्यापु-या,
गो-यापान, चापुनचेपून हलक्या रंगांच तलम नऊवार
नेसणा-या, बोलक्या, हस-या..एकूणच दडपण कमी करणारं व्यक्तिमत्त्व. आणि त्यांची दोन्ही मुलं तशीच ऊंचीपुरी, घारोळ्या डोळ्यांची पण ब-यापैकी असमंजसच म्हणजे एकदम पुर्णतः मतीमंद म्हणता नाही येणार पण जरा डोक्याने यथातथाच होती. बुध्दीभ्रंश असल्यामुळे बहुदा ती शाळेतही जायची नाहीत. सतत घरीच असायची. आम्ही तर त्यांच्यामानाने वयाने आणि शरीययष्टीने बरेच लहान होतो पण त्यांना कुणी मित्र परिवार पण नसावा कारण ते सतत त्यांच्या आईच्या मागेच रहात व चिडचिडही खूप करत.
मोठा चौदा-पंधरा वर्षाचा सदानंद आणि धाकटा
दहा-बारा वर्षाचा आनंद. आनंद जरा मवाळ आणि आईसारखाच हसरा होता पण सदानंद मात्र पाहताच धडकी भरावी असा होता. ऊंचापुरा, हाडापेराने मजबूत, बोलायला-वागायला रांगडा, आवाज फुटलेला...टेरर होता म्हटलं तरी चालेल. आम्ही तर तो दिसला की धूम पळायचो.

सदानंद भयंकर संतापी होता. शक्तीमान होता. आईला खूप त्रास द्यायचा. चिडला की घरात थयथयाट करायचा. घरातल्या वस्तू, भांडे दणादण फेकून द्यायचा. माळ्यावरचं सामान जमीनीवर फेकायचा. काठीने बल्ब, ट्युब्ज फोडून टाकायचा. आसपास दहशत बसेल असा ठणठण आरडाओरडा करायचा. आईवर धावून जायचा. बहुतेक वेळा संध्याकाळी-रात्री हा गोंधळ व्हायचा. चौकातली आमच्या सारखी भित्री पण भोचक मुलंमुली एका घरात जमून त्या आरडाओरड्याकडे कान देऊन लक्ष द्यायची. (कदाचित आमच्याच डोक्यावर युध्द होतं म्हणून आमचा हेवाही करत असतील)
एकत्र जमून वर नक्की काय गोंधळ चालला आहे याचा आम्ही अंदाज बांधत असू. मधूनच मग काकू ओरडायच्या सद्या..मुडद्या..गप्प हो..आता बाबा आले की सांगतेच त्यांना. बापाच नाव ऐकताच संतापलेला सद्या अजूनच चिडायचा. एकदा तर काकूंनी पोळ्यांसाठी परातीत काढलेलं सगळं पीठ-परात त्याने रागाने खिडकी बाहेर फेकून दिलेलं. तसंच एकदा आईच्या अंगावर झुरळ टाकलेलं. मग काकूही चिडायच्या मुडद्या, चांडाळा म्हणून शाब्दिक उध्दार करायच्या. नाही म्हणायला या धुमश्चक्रीत आंद्या मात्र आईच्या बाजूने असायचा. तरीपण कधी अतिरेक झाला की भावेकाकू आमच्या तळमजल्यावरच्या पोलिस डिपार्टमेंटमधल्या देशपांडेकाकांना मदतीला बोलवायच्या. या सगळ्या गोष्टी उशीराने टुरवरनं येणा-या भावेकाकांच्या कानावर जायच्या मग काकांचाही तोल जायचा आणि मग भावेकाका सदानंदला बदडून काढायचे. तेव्हाही तो राक्षसासारखाच पण धुमसत भयंकर आरडाओरडा करायचा. अख्खा चौक चिडिचुप व्हायचा. आमच्यासारखी पोरं स्तंभित होत वरच्या घटनांचा कानोसा घ्यायचा प्रयत्न करायची आणि
दुस-या दिवशी या घटना कानोकानी कुजबुजायची. सद्या आंद्या मात्र काहीच झालं नाही अशा आवेशात सकाळी खाली यायचे. काकूही नॉर्मल व्हायच्या.

काका सरकारी डिपार्टमेंटमधे क्लास वन ऑफिसर होते. बहुतेकदा टूरवर असायचे. ब-यापैकी दारुही प्यायचे म्हणे. सुट्टीच्या दिवशी घरी असले की ते बुलबुल तरंग वाजवायचे.
काकू मात्र खूप सोशल होत्या. चौकात बायकांचा पत्त्याचा क्लब चालायचा म्हणे. काकू तिथेही नियमित जायच्या. माझ्या आईच्या कष्टाचं त्यांना फार कौतुक होतं.
धाकटा आनंद सहसा काकूंबरोबरच असायचा. आनंदाला बहुदा फुलपाखरं पकडायचा नाद होता. नक्की आठवत नाही. सदानंद मात्र आई जिथे असेल तिथे जाता येता डोकवायचा. त्याचं व्यक्तिमत्व आणि वागणूकही अशी होती की कुणी त्याला फार कौतुकाने घरात बोलावत नसावेत. बहुदा त्यांचा आहारही खूप असावा.

एकदा अशाच संतापाच्या भरात सदानंद शहरातल्या रंगारगल्लीत पळून गेला होता म्हणे. आम्ही यायच्या आधीची ही गोष्ट. पण आमच्याच समोर तो एकदा २ रात्र गायब झाला होता. रागारागाने चालत दौलताबादला निघून गेला होता. तिथल्या एका उसाच्या रसवाल्याला काहीतरी संशयास्पद वाटलं म्हणून त्याने त्याला ऊसाचा रस दिला, पोलिसांना कळवलं आणि मग पोलिस आणि भावे काका येईपर्यंत याला अक्षरशः तिथेच बांधून ठेवलं होतं म्हणे.

आमच्या कॉलनीत दोन प्रचंड मोठी जुनी-पुराणी चिंचेची झाडं होती. हाताच्या कवेत येणार नाही असे जाड बुंधे होते. आधी चिगुर आणि नंतर कोवळ्या चिंचांनी ही झाडं लदबद व्हायची. एक झाड तर आमचंच होतं कारण ते आमच्या चौकाजवळ होतं.
पण एवढ्या अजस्त्र झाडावर चढणार कोण ? आणि आम्हाला चिगुर-चिंचा देणार कोण ?
सगळी कुटुंब नोकरशहा वृत्तीची आणि लहान लेकरंबाळं असलेली. पण त्याकाळी कुणीही बाहेरची व्यक्ती आमच्या कॉलनीत बिनदिक्कतपणे येऊ शकायची. तर एकदा अशीच काही टुकार मुलं आली आणि सरसर झाडावर चढून भराभर चिंचा तोडून घेऊ लागली. आम्हाला मुलींनाही या चिंचा हव्या होत्या पण ती मुलं काही आम्हाला चिंचा देईनात. तोडातोडीत खाली पडलेल्या चिंचा आम्ही जमा करत होतो तर ती मुलं आरडाओरडा करायला लागली. तिथे जरा गोंधळ आणि भांडाभांडीचच वातावरण झालं. तो गोंधळ ऐकून सदानंद तिथे आला त्यानी पाहिलं की आपलं झाड आणि दुसरेच चिंचा घेताहेत आणि आपल्या शेजारच्या मुलींना मात्र काहीच मिळत नाहीये. आमची केविलवाणी परिस्थिती बघून सदानंद म्हणाला काय मुलींनो..तुम्हाला चिंचा पाहिजेत का ? आत्ता देतो काढून. थांबा जरा म्हणत झाडाजवळच्या बिल्डिंगच्या गच्चीवरनं सदानंद सरसर झाडावर चढला देखील आणि खिसे भरभरून चिंचा आमच्यासाठी घेऊन पण आला. घ्या..पाहिजे तितक्या चिंचा. आणू का अजून ?
त्याचं ते उंच झाडावर सरसर चढणं बघून तर आमची दातखीळ बसायचीच बाकी होती. पण ओंजळभर चिंचा घरी आणताना सदानंद सारखा भक्कम शेजारी आमचा आहे याचा कोण अभिमान आम्हाला वाटला होता तेव्हा. भावेकाकूंनाही पुढे खूप दिवस या गोष्टीच फार अप्रुप वाटत राहिलं.

पण तोच तो आंद्या भावेकाकू आमच्याकडे आल्या की माझ्या भावाची सायकल तडफेनं चालवायचा. आईचा तर जीव तिळतिळ तुटायचा. तिन वर्षाच्या कौतुकाच्या पोरासाठी, पोटाला चिमटा घेऊन आणलेली सायकल हा दहाबारा वर्षाचा आडदांड मुलगा बिनदिक्कत चालवतो म्हणून. बरं काकूंचा दराराही असा होता की काही बोलता यायचं नाही. भाऊ पण लहान. त्याला सायकल चालवणं निट जमायच नाही पण आंद्याच सुसाट सायकल चालवणं बघून तोही खूष व्हायचा आणि आनंदाने त्याला सायकल परत परत द्यायचा.

या आनंदला स्टैंप्स जमवायचा नाद होता म्हणे. तसंच त्याने एकदा गणपती उत्सवात जादुचा प्रयोग दाखवत लोकांना हसवलं होतं म्हणे. लोकांना हातातलं पिवळं केळ दाखवलं आणि हात पाठीमागे घेऊन त्याची साल काढून पांढरं केळ त्यांना दाखवलं. पिवळं केळ पांढरं करणं अशी ती जादू होती म्हणे. मला आठवत नाहीये. पण खरं असावं. त्या गोष्टीचही भावेकाकूंना फार कौतुक होतं म्हणे. तसही काकूंना आपला नवरा क्लास वन ऑफिसर आहे, त्यांना घ्यायला जीप येते, पैसा चांगला कमावतो, दारु पिऊ शकण्या इतका याचं फार भुषण होतं म्हणे. त्यांचा आमचा सहवास जेमतेम दोन तीन वर्षांचा. मग त्यांची बदलीच झाली पुण्याला. पुण्यात त्यांच कोणत्या तरी पेठेत घर होतं. काकांना डायबेटीस होता. त्यातच त्यांचा पाय कापावा लागला. उत्तर आयुष्यात ते फार चिडके आणि व्हिमिजीकल झाले होते म्हणे. आम्ही पण काही वर्षांनंतर त्यांना भेटायला पुण्यात गेलो होतो. मधे एकदा सदानंदही औरंगाबादला येऊन गेला होता म्हणे. अजूनच दांडगा आणि भितीदायक झालेला. माझ्या आईने त्याला जेवू घालूनच पाठवलं होतं.

पुण्यात भेटलो तेव्हा सदानंदच लग्न झालेलं होतं. गरीबा घरची पण शिकलेली व सुज्ञ सुन मिळाली होती. आनंदाच काय झालं कळलं नाही. पण काकांना मात्र घड्याळं दुरुस्त करत बसायचाच छंद लागला होता म्हणे. काका आधी गेले. काकूपण गेल्या असाव्यात. सुनेनी संसार आणि नवरा-दिर बरे सांभाळले असं एवढ्यातच ऐकून आहे.

आनंदी आणि उत्साही स्वभावाच्या भावे काकूंची दोन्ही मुलं अशी मतीमंद निघाली. कुठलाही उपचार त्यांच्यावर केला गेला अशी माहिती नाही. सर्वसाधारण बुध्दीमत्तेपेक्षा कमी असलेले हे दोन्ही आडदांड जीव असेच वाढले. तेही मनोमन फ्रस्ट्रेट होत राहिले आणि त्यांचे आईवडीलही उध्वस्त होत गेले.

आजच्या काळात ही मुलं जन्माला आली असती तर त्यांच्यावर नक्कीच उपचार केले गेले असते. काहीतरी फरक पडला असता. मुलांच तरी ठीक आहे की ती कमी समंजस होती. पण सुज्ञ आईवडिलांना किती मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला असेल त्याकाळी ? शाळेत न जाणारी आडदांड मुलं, कुठेही शिस्तित न रहाणारी उलट राक्षसी वागून कानकोंड करणारी अपत्य म्हणजे आईवडिलांना केवढा घोर. म्हणूनच मग कामात मन रिझवण्यात, बुलबुलतरंग वाजवण्यात, दारु पिण्यात मन रमवायला काका शिकले आणि आपल्या मुलांच्या माफक गोष्टींचं आणि
दुस-यांच्या मुलांच वारेमाप कौतुक करायला आणि पत्त्यात मन रमवायला काकुंना जमलं.

हल्ली अशा मतीमंदाविषयीची पालकांची, समाजाची जागरुकता पाहिली की हमखास सदानंद-आनंद आठवतात. चुकीच्या काळात ते दोघं जन्मले याचं भावे काका काकूंसाठी आणि सद्या-आंद्यासाठीही वाईट वाटतं. तसच ते बारकुड्या चिंचा आणि पिवळट-गुलाबी आंबट चिगुरानी लदबदलेलं चिंचेच झाडं पाहिलं की सदानंदच आठवतो. सदानंदची तेवढी एकच ह्रद्य आठवण आता लक्षात आहे.

No comments:

Post a Comment