मला कुतुहल आहे...
त्या तमाम महिलांचं, गृहिणींच, बायाबापड्यांच.
..ज्या घर सांभाळून, आवरून कधीच थकत नाहीत.
..ज्या सतत पार्ट्यांना बाहेर जाऊन, घरी मेजवान्या आयोजित करुन कंटाळत नाहीत.
..ज्या कधीच भाजीबाजारात, किराणा दुकानात दिसत नाही. पण यांच्याकडच्या जेवणात मात्र चतुरस्त्र पदार्थांची खैरात असते.
..ज्यांच्या घरात सततच लेटेस्ट गोष्टींच गिफ्ट रॅप चमकत असतं.
..त्यांची कटलरी घ्या, लैम्प शेडस घ्या, फर्निशिंगचे प्रिंटस घ्या का नेलपेंटच्या शेडस घ्या..सारं कसं इन फैशनचच.
..ज्यांच्या कडे फरशी टू फ्रिज आणि टॉयलेट टु टोस्टर व्हाया कपबश्या, ट्रे, चमचे, प्लेटस, टिश्युज, पाणी-ज्युस-सोप डिस्पेन्सर्स, दात कोरण्या, नैपकीन्स्, मुखवासदाण्या..सगळचं बेमालूम आधुनिक असतं.
ज्या चारीठाव स्वैपाक करुन, औरस चौरस घर झकपक करुन लेटेस्ट शेडची साडी नेसून प्रसन्न वदनानी स्वागताला तैयार असतात.
..राब राब राबूनही ज्यांच्या चेह-याचा तजेला तसूभरही कमी होत नाही. नाही कपाळावर आठ्यांच जाळं पसरत नाही.
..ज्यांच्या घराच्या भिंतीनभिंती, फरशी, दारं, दरवाजे, सोफे, पायपुसणी, सिंक्स, जाळ्या स्पॉटलेसली स्वच्छ असतात.
यांच्या घरात पेनं, चिठ्ठ्या, चार्जर्सच्या वायरी, वर्तमानपत्रांचे गठ्ठे, मासिकांच्या चळती, रिळं-दोरे-सुया, चपलाबूटांचे खच, चष्मे-गॉगल्स-हेल्मेटसची अंदाधुंदी, वारेमाप किल्ल्यांचा कोलाहल...कश्शाला म्हणून जागाच नसते का ?
..ज्यांच्या बागेतही पानगळीचा लवलेश नसतो, नाही व्हरांड्यात मातोड्याचा शिंतोडा असतो.
..यांच्या घरात कधी मेले ते डासं ही होत नसावेत की कधी त्या टुकार मुंग्याची रांगही पळत नसावी.
घर-दार, माळा-पोटमाळा, कपाटं-कोनाडे,
बाग-बगीचा, संडास-बाथरुम, अंगण-ओसरी,
तळं-मळं.. सगळं कसं आलबेल असतं, विशेष म्हणजे जिथल्या तिथे हसतमुखाने असतं.
...कसं जमत असेल यांना हे ? कुठुन येते एवढी
इच्छाशक्ती आणि एनर्जी ?
खरंच मला फार कुतूहल आहे.
No comments:
Post a Comment