Saturday, 24 March 2018

पाय पाळण्यातले.

एक दिवसासाठी काही निमित्ताने माझा वयस्क मामा आणि त्याचे कुटुंब आमच्याकडे मुक्कामी आले आहेत. माझ्याकडची पुस्तकांची कपाटं बघून मला पुस्तकं वाचायला वेळ मिळतो का याचे त्याला कुतूहल वाटले आणि मग गप्पांच्या ओघात त्याने माझ्या बालपणीच्या दोन-तीन हास्यास्पद गोष्टी सांगितल्या.

नांदेडला तिनचार वर्षांची असताना मी शाळेतच जायची नाही. रोज प्रचंड रडारडा, लोळालोळी करत गहजब करायची. बालवाडीत न्यायला आम्हाला एक तिनचाकी सायकल रिक्षा यायची. या रिक्षाचा मागचा बैठकीचा संपूर्ण भाग पोपटी लाकडी फळ्यांनी जाळीदारपणे बंद केलेला असायचा. आतल्या चौकोनात लावलेल्या फळकुटांवर रडवेली बालकं बसायची. हुंदके देत देत त्या जाळीदार फळ्यांमधून टाटा करणा-या आपल्या आयांना दुरवर होताना बघून जास्तच केविलवाणी होत असावीत. आतलं वातावरण कोंदट, घुमसवटून टाकाणारं असावं बहुदा. त्यात ते सामुहिक बालरुदन. अक्षरशः आई आणि अजून एक आईसमान शेजारीण बाई मला हातीपाई पकडून त्या रिक्षात कोंबत आणि रिक्षाचा दरवाजा झटकिनी लावून घेत असत. तर एकदा ही कोंबाकोंबी चालू असताना मी या मामाचा बराच धावा केला होता म्हणे असं आज मामा हसून सांगत होता. शाळेत जायच्या रोजच्याच मारामारीत एकदिवस मी त्वेषाने त्या कोंडवाडी रिक्षाचा दरवाजा लाथेने तोडला होता ही खात्रीशीर ऐकीव माहिती आहे.
दार तोडल्यानंतर दुस-याच दिवशी त्या बुजुर्ग शेजारी बाई तरातरा मला जातीने शाळेत सोडायला आल्या तरीही मी बधेना हे बघून त्यांनी असा एक फटका मला मारला की परत कधी शाळेसाठी मी गोंधळ घातलाच नाही. अजूनही मी स्वतःला तहहयात विद्यार्थीच समजायच श्रेय त्या फटक्यात तर नाही ना ?
आणि तसचं श्वास गुदमरायचा आजच्या फॉबीयाच मुळ त्या जाळीदारपणे फळीबंद अशा बंदिस्त सायकल रिक्षात तर नाही ना ? आज देखील मला जीव गुदमरायच्या कल्पनेचही फार दडपण येतं.

मामा सांगत होता एकदा मी लहानपणी फाटकासमोरच्या गाईला काठीने हाकलत होते. त्या जिवश्च शेजारीबाई गाईला रोज गोग्रास देत असतं साहजिकच गाई फाटकाशी कायम घुटमळत.
हं..तर मामा मला तेव्हा म्हणाला...गाईला काठी मारु नये, गाय म्हणजे आपली आई असते.
...आई ? गाय कशी आई ? गाय स्वैपाक करते का ? असं उलट प्रश्न मी त्यालाच केला होता म्हणे.
तर या ज्या जिवश्च शेजारीणबाई होत्या (खरंतर त्यांना असं त्रयस्थपणे संबोधीत करणं फार जीवावर येतयं इतक्या त्या बाई आणि त्यांचे यजमान आमच्या जीवनाचे अविभाज्य भाग झाले, होते आणि राहतीलही. पण या पोस्टचा बाज वेगळा आहे म्हणून एवढाच त्रोटक उल्लेख. त्यांच्याही विषयी लिहिणारच आहे दिर्घपणे) त्या अतिशय धार्मिक होत्या. त्यांच्या घराच्या बैठकीच्या खोलीतील चारही भिंती देवदेवतांच्या शोल्डर टु शोल्डर फोटोंनी भरलेल्या होत्या. राम, सिता, लक्ष्मण, शंकर, पार्वती, हनुमान, गणपती, दत्त, बाळकृष्ण अशा अनेक देवतांची मोठाली कॅलैंडर्स फ्रेम करुन लटकवून ठेवली होती. दिवसवारांप्रमाणे तसबिरींना हार चढवले जात. उदबत्त्या फिरवल्या जात. सगळे देव मानवी वेषभुषेत, रुपात पण एकजात स्टिफ पोज मधे. आम्हा बहिणींचा त्या बाईंकडे सततच राबता असायचा. आम्हाला त्या फार प्रेमाने सांभाळायच्या तसेच हक्काने रागावायच्या पण. सकाळचं कराग्रे वसती लक्ष्मी, पुजा,अर्चा, अंगारे, पारायणं, पोथ्या, संध्याकाळचा देवासमोरचा दिवा, परवचा हे सगळे त्यांचे संस्कार. दिवसभरात आम्ही काही वेडवाकडं वागलं की..तसं नाही वागायचं..बघा तो राम वरुन बघतोय...बघा हं त्या शंकराला सगळं वरुन दिसतंय. तो रागवेल तुम्हाला अशी शिकवण असायची. मला फार प्रश्न पडायचा की हे फोटोतले देव दिसतात तर बाई-पुरुषांसारखे, आपल्या पालकांसारखीच आपल्यावर नजरही ठेवून असतात पण मग हे सर्वसामान्यांसारखे न उठता-बसता कायमच असे पोजी का ?
सिता कधीच केस विंचरताना दिसत नाही, पार्वती कधीच भाजी निवडताना, धुणं धुताना दिसत नाही. राम-कृष्ण सुध्दा कधी पेपर वाचताना, दाढी करताना दिसत नाही. मला पडलेले हे मुलभूत प्रश्न मी त्या बाईंना (आम्ही भावंड त्यांना काकाची आई म्हणत असू. आमची आई बाबाची आई आणि या बाई काकाची आई) विचारले की त्या म्हणत या असल्या गोष्टी देव नसतात करत देवात आणि माणसात हाच तर फरक आहे. पुन्हा असं देवांविषयी असं बोलायच नाही हं कधी म्हणून तंबीही द्यायच्या. तर उत्तर आयुष्यात देखील हे असं प्रश्नांकित कुतुहल कायमचं राहिलं पण ते
पुजा-अर्चा-पारायणं करणं कधीच मागे पडलं.
चौथी-पाचवीत मला लिहायचा अतोनात कंटाळा होता. तेव्हाचे शाळेतले परिक्षेचे पेपर्स देखील मी या कंटाळ्यामुळे पुर्णपणे न लिहिताच घरी परतायची. वाचन मात्र घडघड होत असे आवडीने. तर एकदा आईने चिरडीला येऊन चौथीच इतिहासाचं अख्ख पुस्तकच माझ्याकडून रटरट गिरवून घेतलं होतं. तेव्हापासून जी लिहायला लागले ती अजूनही खरखर लिहितेच आहे, चढत्या भाजणीने टाईपतच आहे.
तेही आनंदाने.
Today I just cannot live without a diary.

तर सांगायचा मुद्दा आपल्या युवा-प्रौढ अवस्थेतले काही गुण असे बालपणीच अधोरेखित होतात नाही ? तसेच काही गुण तर इतके विरोधाभासी विकसित होतात की दोनतीन दशकांपूर्वी आपण असाही विचार करायचो याचही आश्चर्य वाटू शकतं नाही ?
तर आपल्या गुण-अवगुणांचा मुळारंभ काही व्यक्तींमधे, काही घटनांमधे शोधणं हा सुध्दा एक रोचक विरंगुळा आहे.

No comments:

Post a Comment