आमचे एक जूने मित्र आहेत नर्सरीवाले. काल खूप वर्षांनी हिरण्यला आले. वेळ हातात होता, गप्पा मारत चौफेर फेरफटका मारताना त्यांनी हिरण्यच, हिरण्यमधल्या झाडांचं, हिरवेपणाचं पुन्हा पुन्हा कौतुक केलं. त्यांनी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा हिरण्य बंजर होतं आणि आज ब-यापैकी हिरवागार झालाय परिसर. अर्थात आम्ही रेग्युलर येत असल्यामुळे हे बदल आम्हाला इतके प्रकर्षाने जाणवत नाहीत आणि आमचच हिरण्य असल्यामुळे आम्हाला आधी त्रुटीच दिसतात, आम्ही कुठे कमी पडतोय हेच जास्त जाणवत रहातं.
पण त्यांनी काल फार तारीफ करत रखरखीत औरंगाबादच्या जवळ एक इतका सुंदर हिरवा तुकडा तयार केला याची दाद दिली. एक अख्खी इको सिस्टीम आमच्यामुळे तिथे सुखनैव नांदायला लागली याचीही वारंवार जाणीव करुन देत आम्हाला भाग्यवान म्हटलं.
अरेच्या..खरच की !
इथल्या भौगोलिक वातावरणात राहणारे बहुतेक प्राणी,पक्षी, किडे, मकोडे सगळे गुण्यागोविंदाने आमच्याकडे नांदताहेत हे माहिती होतं, पण त्यांचा एकमेकांवरचा इंटर इंडिपेन्डस आणि त्यामुळे त्यांची होणारी भरभराट अशी लख्खपणे पहिल्यांदाच नजरेत आली.
आम्ही आपले झाडं, झुडपं, हिरवळी लावत गेलो आणि आपोआप पोटापाण्याची सोय बघत एक जीवसाखळी इथे बहरत गेली.
डोंगर, पाणी, काही झाडं तर होतेच इथे, पण आम्ही लावलेल्या काही झाडाझुडपांमुळे त-हेत-हेचे
पक्षी-प्राणी, किडे-मकोडे-फुलपाखरं,सरपटणारे प्राणी कायमचे इथलेच रहिवासी आनंदाने झाले.
सुरवातच करायची तर खारुताईपासून केलेली छान नं ?
खारी, बुलबुल, साळुंक्या, सातभाई, कबुतरं, चिमण्या, ब्राह्मणी चिमण्या, सुतार, किंगफिशर, फुलचुखे, धोबी, बगळे, पॉन्ड हेरॉन, ट्रि पाय, स्वालो, स्विफ्ट, घारी, वटवाघळं, कोमोरंटस्, ग्रे हॉर्नबील, हळद्या, सुगरणी,रातवे आणि अजून बरेच पक्षी, तसेच बदकं, ससे, सायाळी, रानससे, कुत्रे, मांजरी, उंदीर, घुशी, चिचुंद्र्या, मासे, बेडकं, घोरपडी,सापांचे अनेक प्रकार (नाग, अजगर, धामण, शेलाट्या..),अनेक प्रकारचे भुंगे, मधचुखे, मधमाश्या, कोळी, आळ्या, नाकतोडे, फुलपाखरं...प्रत्येक सिझनप्रमाणे हजेरी लावणारे अनेक प्राणी जीव..फळाफुलांच खाद्य असणारे काही आणि दुस-या दुबळ्या जीवांना आपलं खाद्य बनवणारेही अनेक. प्रत्येकाला रुचकर अन्न, सुयोग्य निवारा आणि मुबलक पाणी मिळतय म्हणून एक जीव साखळी आमच्या भुमीत बिनघोर नांदती आहे.
एका अभ्यासकाच्या तोंडून हे ऐकताना फारच छान वाटलं.
काश !
या सगळ्या प्राणीजीवांना हे सांगता आलं असतं तर ? जाऊद्या बोलून कशाला सांगायच ?
आपण आपली झाडंझुडपं लावावीत बाकी गोष्टी आपसूकच होतील.
जर या सगळ्या पक्षी-प्राण्यांना बोलता-लिहिता आलं असत तर त्यांनीही आपापसात सांगतीलं असत का अरे..आपल्या या वनभुमीत एक मानवी कुटुंबही आनंदाने रमतय बरं का ?
No comments:
Post a Comment