जगणं समृध्द होत जातानाची एक छान वैचारिक आणि मानसिक परिक्वता आपल्यात येत चालली आहे असं वाटत असतानाच एक कायमच अस्वस्थ द्वंद मनात ठाण मांडून बसलंय असही जाणवायला लागतं. आणि मग त्या अस्वस्थतेला आपापल्या परीने स्वस्थता देताना एक काटेरी, टोकेरीपण आपल्यात येतय की काय असही वाटायला लागतं. मग अजूनच एक एकारलेपण मनात अंकुरायला लागतं.
बरेचदा लिखाणातून हे फेसबुकी व्हेंट आऊट नसत तर आपण कीती आपल्यातच धुमसत बसलो असतो असंही वाटत रहातं.
म्हणजे भौतिक आयुष्यातला आपला व्यावहारिक संघर्ष आटोक्यात आला असं जरी वाटलं तरी रोजच्या जगण्यातल्या मानसिक, भावनिक, वैचारिक संघर्षाच्या ठिणग्या जास्तच स्फुल्लिंगीत होताहेत हे प्रकर्षाने जाणवत रहाते. आपापल्या परीने आपण आपल्या जगण्यातल्या खूपसा-या गोष्टी सहज-सुलभ केलेल्या असतात पण रोजच्या जगण्याच्या व्यवहारात इतरही अनेक जवळ-दुरच्या व्यक्ती सततच निकट सहवासात येत असतात. येनकेनप्रकरेण त्यांच्याशी काही भावनिक, वैचारिक, व्यावहारिक आदानप्रदानही होत असते. पण नेहमीच या आदानप्रदानी गोष्टी आपल्या विचारांशी, भुमिकेशी साधर्म्य असणा-या असतातच असं नाही.
मग या अशा अनेक गोष्टी आपल्याला कृतीशिलतेच्या खिंडीत एकटं गाठतात. मागे येणं आपल्या मनाविरुद्ध असतं, पुढे जाणं अनेकांना दुखावणारं असतं.
बरेचदा आपल्या मताशी प्रामाणिक रहात वागणं, निर्णय घेणही फार अवघड होतं. बरेचदा बॅक फूटला आपण येतोही पण मग त्याचाही एक सुन्न त्रास आपल्याला होतोच होतो. अशक्य काहीच नसतं पण शुल्लक गोष्ट म्हणून सोडून देत आपण स्वतःचीच एक समंजस समजूत घालून वागतो.
पण मग अशाच शुल्लक गोष्टींच्या अनेक ठिपक्यांनीच तर एक रेषा बनते ना ? आणि अशा अनेक रेषांच्या बुनीयादीवरच एक असा विचार-आचार बनतो ज्याला आपणच आजपर्यंत जबरी आव्हान देत आलेलो असतो.
म्हटलं तर आपल्या पध्दतीने आपण या चकमकी यशस्वीपणे लढूही शकतो पण अशा किती लढाया तुम्ही सतत लढत बसणार हा प्रश्नही भुतासारखा मानगुटीवर बसतो. कित्येकदा तर परजलेली तलवार सततच हातात ठेवावी की काय अशी परिस्थिती असते. तसेच अनेकदा हे असं कायमच लढाईच्या पवित्र्यात रहाणंही थकवणारं असतं.
म्हणजे एकदा का विचार करुनच जगायच, सतत सारासार बुध्दी वापरायचं बाशिंग बांधलं की एका वैचारिक,भावनिक आणि व्यावहारिक लढाईच प्राक्तनच तुमच्या संपूर्ण जगण्याला व्यापून रहातं.
अशावेळी हातातली विरोधाची एकक तलवार म्यान करावी का उगारलेलीच ठेवावी हे सततच द्वंद तुम्हाला अस्वस्थ आणि उध्वस्तही करु शकतं.
आणि हेच द्वंद तुम्हाला निखळ आणि समंजस आनंदी जगण्यापासूनही वंचित करु शकतं.
अशावेळी हरिवंशराय बच्चन म्हणतात तसं मन का हुवा तो अच्छा, न हुवा तो भी अच्छा असं मानत आनंदी जगायचा प्रयत्न तर करायचाच पण जगणं हाच एक संघर्ष आहे याचीही मनाशी खुणगाठ बांधत जमेल तसं एकला चलो रे म्हणत एल्गार करायचा.
No comments:
Post a Comment