या सोशल मिडियावरती एक मध्यम कामसू सुगरण म्हणून झालेली माझी ओळख आमच्या घरात एक ईनोदाचा विषय झाली आहे. म्हणजे सुगरण अशी ओळख हे मी हल्ली असं समजायला लागली आहे कारणअशा पोस्टसला मिळणा-या भरपूर लाईक्स 😍) बरय नव-याला फेसबुकवर डोकवायला वेळ नाही आणि मुलांना मराठी वाचायची आवड नाही. तरी जवळचे इतर चिडवतातच. आणि आपलंही आपल्याला खाणारं मन आहेच ना ? 🙄
मी मुळात चोखंदळ खवय्यी नाही. फार चवीने जेवतही नाही. माझा खाक्या म्हणजे उदरभरण नोहे असाच असतो. आठवड्यातले चार दिवस खिचडी मी आनंदाने खाऊ शकते. तरी पण आमच्या रिसॉर्टसच्या व्यवसायामुळे आणि आत्तापर्यंत उजेडात न आलेल्या अंगभूत गुणांमुळे मला स्वैपाक कलेचा मागोवा घ्यायला खूप आवडायला लागलं आहे हल्ली.
एखादा पदार्थ असाच का केला जातो, ठराविक वेळीच का केला जातो त्याची सामाजिक, धार्मिक, भौगोलिक आणि जातिय कारणं शोधणं फार मनस्वी असतं. तसेच या पदार्थांचा मुळ देश-प्रांत कुठला, मग आपल्याकडे ते पदार्थ कोणी, कसे आणि का आणले याचा मागोवा घेणं. आपल्या भागात स्थिरावताना त्या पदार्थात काय काय बरे-वाईट बदल होत गेले हे अभ्यासणं, त्याविषयी वाचणं, चर्चा करणं फारच समृध्द करणारा अनुभव असतो. सुदैवाने हा माफक व्यासंग वृध्दिंगत होण्यात हिरण्यचा खूप म्हणजे सर्वथाच सहभाग आहे. पण त्यामुळे झालं काय की रोजचाच स्वैपाक करताना थोडीशी जागरुकता वाढली आणि हुरुपही आला.
त्याच वेळी फेसबुकच्या कृपेने या संदर्भातील गोष्टी भराभरा शब्दात मांडून वाचकांपुढे मांडायलाही शिकले. थोडेफार लाईक्स मिळत गेले. माझाही मग लिखाणायोग्य प्रयोगशील रहायचा उत्साह वाढला. थोडक्यात पतंग अच्छी उडने लगी. 🤗
पण खरं सांगू का मला रो..ज..च्या..नियमित स्वैपाकाचा फार कंटाळा आहे. 😣
I would love to treat it as an art. 😍
मला पटतं ते मी आनंदाने करते.
पण पटत नसताना, इच्छा नसतानाही रोज स्वैपाक करावा लागणं मला तर शिक्षाच वाटते. त्यातही कुटुंबातील प्रत्येकाची मर्जी राखत चारीठाव स्वैपाक म्हणजे माझी परिक्षाच आहे. भरीसभर ते पथ्याचं, उपासाचं तेल-तुपाचं, वरी-दाण्याचं सत्र समांतरपणे चालवणं म्हणजे तर कळसच म्हणायचा सहनशक्तीचा.😤
ज्या महिला हे रोजचं कौटुंबिक टाईम टेबल आजीवन लिलया पाळतात त्यांच्या विषयी मला अत्यंत आदर आहे. हे सगळं आनंदानी, हसतमुखाने सतत
करणा-रा, करत रहाणा-या महिलांच्या पासंगालाही मी पुरु शकत नाही.😔
मला ज्यात गोडी आहे त्या गोष्टी मी जमेल तितक्या सखोल पणे जाणून घेते, करायचा प्रयत्न हे मात्र खरं. पण ज्यात गोडी नाही त्या गोष्टी माझ्यासाठी काला अक्षर भैस बराबर असतात. माझी बहिण, भावजय जेव्हा चायनीज, कॉन्टिनेन्टल, थाई फुडच्या चवीचवीने गप्पा मारतात तेव्हा तर मी पार हरवून जाते. मला तर बरेचदा कळतच नाही त्या कशाविषयी बोलत असतात ते. अक्षरशः त्या मला सुपर वुमन वाटाव्यात इतकी मी तिथे त्रयस्थ असते.😱
कीती का फुटकळ वेळापत्रकं असोत, आपापली कामं बाजूला टाकून धावाधाव करत जेवणावळींची तयारी करणं खरोखर फार अवघड काम आहे. त्यामुळे घरी कुणी अवचितपणे नाश्त्याला, जेवायला येणार म्हटलंकीच माझं धाबं दणाणत. काय करु, कसं करु यातच अर्धा दिवस जातो. शेवटी नको ते पाहुणे असं म्हणायची वेळ येते. नव-याने बरं ते सुज्ञपणे हिरण्य करुन ठेवलय. आला पाव्हणा की करा डायव्हर्ट.😀 म्हणजे स्वैपाकाचं तंत्र जाणून घ्यायला आवडतं मला पण सुटका नसणारा रतीबी स्वैपाक म्हटलं की अंगावरच काटा येतो.😵
त्यामुळे फेसबुकवर माझ्या पदार्थांच, माझ्या सो कॉल्ड सुगरणपणाचं कौतुक झालं की मला फार कानकोंड होतं. दृष्टी आडची सृष्टी सारखं आपण लोकांना अंधारात ठेवतोय की काय असही काही वेळा वाटतं.
माझ्या पोस्टी बघून काय काय अंदाज लावत असावेत वाचक ? आता हाही एक अंदाजच.🤔
असो प्रत्येकाला, प्रत्येक गोष्टीतील, प्रत्येक बाजूची आवड असलीच पाहिजे असं थोडीच आहे. काही जण पाच पन्नासांचा स्वैपाक येता जाता आनंदाने करतील, काही जण नियोजन काटेकोर करतील, काहीजणं बाजारहाट चोखंदळपणे करतील, काहीजणं वाढप न थकता करतील, काहीजणं घर आवरतील, मागचा पसारा लवलवून आवरतील, काही जण मिठ्ठास विडा जमवतील तर काही जणं रंगल्या तोंडाने अन्नपुर्णेची पोट फुटेस्तवर तारीफ करतील.😋
हे ब्रह्मज्ञान मला कधीच पटलंय, वाचकांनो तुम्हीही मनापासून पटवून घ्या, म्हणजे मग या पुढे without any complex एखादी चविष्ट पोष्ट टाकायला मी मोकळी.
🤗
No comments:
Post a Comment