परम सुखदःखाच्या वेळी आपले नातलग,हितचिंतक त्या क्षणाचे साक्षीदार असावेत असं मनातनं वाटणं साहजिकच आहे. उन्नत मानवी मनाची आणि एव्हर इव्हॉल्व्हिंग सोसायटीचीही ती गरज असावी. पण इस्ततः आणि सर्वदूर पांगलेल्या मानवानी या गोष्टीला इतकं बटबटीत रुप सध्या दिलय की विचारु नका.
साधी एखाद्या बुजुर्गाच्या मरणाची गोष्ट.
वार्धक्याने तसही जरा बाजूला पडलेली जेष्ठ व्यक्ती. इतरांच्या रोजच्या व्यवहारी जगण्यातून आणि मानसिकतेमधून जरासं अलिप्त झालेल्या व्यक्तीच्या सूखासुखी मरण्याने, जाण्याने एक समृध्द आणि परिपूर्ण जीवनच संपुष्टात आलेले असते. सुखासूखी आलेल्या मरणाचा दिलासा जाणा-यांनाही मिळतो आणि रहाणा-यांनाही मिळतो. म्हणजेच एक सुखी जीवन सुखात समाप्त झालेले असते. तरी पण मरण म्हटलं की दुःखाचाच डोंगर या समजूतीनेच मृताच्या घरातली, नातलगांची, बाहेरच्यांची वर्तणूक असते. कारण शतकानुशतके मरण हे फक्त दुःखाशीच जोडलं गेलं आहे.
यथोचित आणि योग्यवेळी आलेलं मरण म्हणजे ग्रेसफुल एग्झीटच. आपल्या समजुतीने मोक्षच म्हटला पाहिजे.
पण आपल्या समाजात मरण म्हणजे दुःखाचा कडेलोट समजून मृताच्या घरी लोकं दुःखी चेह-यांनी गठ्ठ्यांनी भेटायला येतात. बरेचशे लोकं तर पहिल्यांदाच आपल्या घराची पायरी या निमित्ताने चढत असतात.
या असल्या औपचारिक भेटीगाठीतून आपल्याला काय मिळतं बरं ?
मोजके जिवलग सोडले तर इतरांच्या येण्याने तसा काही फरक पडत नसतो.
हां ! सुखदःखात आपल्या पाठीशी कोण कोण ऊभ राहू शकतं याचा आपल्याला अंदाज येतो आणि एका समंजस मैत्रीचा ठाव लागतो एवढचं.
पण या गोष्टींकडे रीतभात म्हणूनच बघणारे आणि असले सोपस्कार पार पाडणारेच जास्त असतात.
बरं अशा वेळी भेटायला येणारेही त्यांच्या सोईने येतात. काय, कधी, कसं झालं विचारतात. मृताच्या चारदोन दुर्गुणांकडे कानाडोळा करत चांगल्याची उजळणी करतात. प्रत्येका समोर तेच ते बोलून, तोच तो अविर्भाव ठेवून बोलत रहाणं, वागत रहाणं घरातल्यांसाठी खरोखर फारच टैक्सिंग होतं.
यात सरसकट सामाजिक विचारसरणीचाच फार दबाव आणि प्रभाव असतो. म्हणजे वैचारिक प्रवचनात डेथ इज अ सेलेब्रेशन हे तत्वतः पटलं तरी आपल्या जीवनात त्याच त्या अवडंबरी दुःखाच्या पाट्या टाकत रहायच्या. काय अर्थ आहे याच्यात ?
सगळ्यात गोची कधी होते तर ज्या घरात अशी घटना घडली आहे ते या गोष्टीकडे समजूतदारपणे काळाची गती म्हणून बघत असतात आणि भेटायला येणारे मात्र दुःखातिरेकाने विकल झालेले असल्याचे दाखवत असतात तेव्हा. का आपण इतके कुठल्यातरी दबावाचे बळी ठरतो ?
जे मनात आहे तेच ओठात आणि कृतीत उतरवावं ना ! पण नाही तसे होणे नाही.
उलट प्रत्येक गोष्टीला एक मतलबी परिमाण देण्याच्या माणसाच्या विकृत स्वभावानुसार अमक्याच्या अंत्येष्टीला कीती गर्दी होती, तमक्याच्या वेळी भेटायला येणा-यांची कशी रीघ होती, त्यांच्याकडे अमका मोठा आला, तिकडे तमकी सुप्रसिद्ध येऊन गेली या असल्या गोष्टींवरुन लोकप्रियतेचे बाजारु ठोकताळे बनवले जातात. समाजात भिनवले जातात.
मग घराघरात, गल्लोगल्ली एक अंतर्गत स्पर्धा सुरु होते अशा क्षणी सर्वश्रेष्ठ ठरण्याची. आणि मग या स्पर्धेत जिंकण्यासाठी अनेकांकडून जिवंतपणीच जीवतोडून धावलं जातं.
मृतात्म्याला मनोमन शांती देत असताना हे सगळं अनुभवणं खरोखर उबग आणणारं असतं.
तसच ते ज्या घरी अवचित मरण झालय त्या घरात आहे तसे उठून आलेल्या नातलगांची चहापाणी, जेवणाची नाही सोय होऊ शकत आणि घरातली गृहिणीच दुःखात असताना हे व्यवधान कसं ठेवू शकेल बरं ?
त्यामुळे अंत्यसंस्कार होईपर्यंत त्या घरात चुल पेटणं शक्य होत नाही म्हणून मग शेजारपाजा-यांनी मिळून चहा, पोळ्यांचे गठ्ठे-भाताचे पातेले आणि सुटसुटीत पिठलं करुन पाठवायची पध्दत पडली. नियम नाही.
देणा-याला भाजी पेक्षा पिठलं करायला कधीही सहज सोप्प आहे. भाता पेक्षा पोळीने लहान-थोरांचा भुकेचा दम निघतो म्हणून पोळी. इतका साधा व्यवहारी दृष्टिकोन त्या मागे असतो. पण हल्ली बरेचदा गल्लीतल्या शेजा-यांशी इतके जिव्हाळ्याचे, हक्काचे संबंध नसतात. आणि बरेचदा मित्रपरिवारालाही अशी मदत करणं सहज शक्य होईलच असही नाही. मग सरळपणे हॉटेलमधूनच जेवण मागवले जाते पण तेही पिठलं पोळीचेच. आता बोला ?
अहो..हॉटेलातूनच मागवताय ना मग मागवा की भाजी पोळी. शास्त्रात कुठे लिहून ठेवलय का की पहिल्या दिवशी पिठलंच खाल्लं पाहिजे म्हणून ?
हां..चोखंदळपणे रसनेचे चोचले नका करु पण be practical.
तसच ते मृतदेहावरचे विधी, दहनाची पध्दत, नेत्रदान, देहदानाच्या ईच्छा, नंतरच्या क्रियाकर्माचे विधी...
म्हटलं तर खूप soulful इश्युज आहेत आपणच आपले आखून, रेखून ठेवण्यासारखे.
पण आपण आपल्या मृत्यू विषयी तटस्थपणे बोलू तेव्हाच हे शक्य आहे.
नसता जाणारा जातो आणि राहिलेले जिवलग आपापल्या विचारांनी काय, कसं करायचं याचा खल करत बसलेत हे हल्ली घरोघरच दृश्य झालय.
पण एकूणच आपल्या रोजच्या वागण्यात आपण फार बिनडोकपणे वागत असतो. सुखदःखातल्या या आणि अशा अनेक गोष्टी खटकणारेही बहुसंख्य आहेत पण ऐनवेळी कुठे सगळ्यांच्या उरफाटं आपणच वागा या खाक्याने कळून सवरूनही त्याच त्या गोष्टी केल्या जातात, गव्हावर गहू टाकले जातात आणि रीतीभातीचं रवाळ, एकरुपी पीठ शतकानुशतके पडत जातं.
या सगळ्या गोंधळावर रामबाण उपाय म्हणजे आपल्या मरणोपरांत करायच्या, न करायच्या गोष्टी डायरीत डिटेल लिहून ठेवणे. त्याची आपल्या मुलाबाळांना ठोस जाणीव करुन देणे. वेळोवेळी आठवण देणे. मग आपलं मरण कसही येऊ द्यात, त्याचं पालन मुलांनी सारासार विचार करत आदरपूर्वक केलंच पाहिजे.
No comments:
Post a Comment