Monday, 14 May 2018

चांदणे शिंपीत जाशी...

गेले दोनचार वर्ष झाले उन्हाळा निभवायची ताकद खरोखर संपत चालली आहे.
वाढत्या वयामुळे असं होतं, का खरच तापमान वाढलंय, का आपलेच नखरे वाढलेत कळत नाहिये. पण गेल्या पाच-सहा वर्षापर्यंत एसी शिवाय रहाणारे आम्ही-मी आता एसी शिवाय जगण्याची कल्पनाही करु शकत नाही. हा मे महिना ढकलणं म्हणजे महा कर्मकठीण होत चाललय हल्ली.
खूप थकवा येतो आणि शरीरा बरोबर मनाची उभारी देखील संपुष्टात येते. काळ थांबल्यासारखा वाटतो.
तरी नशीब आमचं हिरण्य त्यामानाने खुपच गार आणि सुखद आहे. रात्री तर उन्हाळ्याचा लवलेशही रहात नाही असं म्हटलं तरी चालेल. निमित्ताने आम्ही हिरण्यला बरेचदा रहायलाही जातो. दुपार जरा कठीण असते पण सकाळ आणि सायंकाळ मात्र टोटल ब्लिस.
तर परवा असेच रहायला गेलो.
गेल्या गेल्या हिरवीगार लॉन बघून डोळे निवले. जांभुळक आकाश, हवेतला गारवा, वॉटर फाऊंटनचा तुषारी आवाज आणि हिरवी ओलसर लॉन.
अक्षरशः कुणाचाही मुलाहिजा न ठेवता अंधारी कोपरा बघत मी तर सपशेल त्या लॉनवर लोळण घेतली. तळव्यांना मऊ वाटणारी हिरवळ दंडांना, हातांना टोचतीये, एक ओलसर हिरवा दर्प नाकात घमघमतोय, किड्या मुंग्यांची धास्ती आहेच, पाळीव श्वानांच अंगचटीला येणं पण आहेच..तरी पण तशीच पहुडले.
पाठीशी टोचरी, ओली हिरवळ आणि नजरेसमोर विस्तीर्ण जांभळट आभाळ. वैशाख अमावस्येच्या तोंडावर अजूनच गहिरं झालेलं. त्या स्वच्छ गहिरेपणावर लखलखणारं टिप्पूर चांदणं...मनाला साद घालणारं.

हे चांदणं देखील फार कॅलिडोस्कोपिक असतं बेट. यांच्या नादी लागलं की कुठही फिरवून आणतात या लखलख चांदण्या.

तो पुर्व-दक्षिणे कडचा तारा आहे का चांदणी आहे बरं ?
काय शिकलो बरं आपण शालेय अभ्यासक्रमात ?
लुकलुक खुणावत नाहिये म्हणजे नक्कीच तारा आहे तो.
खरंतरं लखलखीत चांदणं नेहमीच आभाळात असतं पण दिवसा तो सुर्य आणि रात्री तो चंद्र आणि आपला शहरी झगमगाट सगळं तलम चांदण पिऊन गडप करतात.
निशब्द होतं वावरभर चांदणं नजरेनेच पित पहुडले आहे. काळजावर दुराव्याची एक लख्ख रेषा ओढत एखादं विमान हुरहुर लावत वरुनच दुरस्थ होतय.
अचानक लाईट जातात.
जनरेटरही पटकन सुरु होत नाही. आता तर चांदण्यांचा मंडपच लख्खपणे उजळलेला.
लखलख, लुकलुक, टिमटिम करणा-या लहान मोठ्या अगणित चांदण्या. मोजू म्हटलं तरी मोजता येणार नाहीत इतक्या चांदण्या.
कुणासाठी, कुणाकडे बघून या लखलखतात बरं ?
प्रत्येक मृत व्यक्तीची चांदणी होते म्हणे.
केवढी सुरम्य कल्पना आणि मानवी चिरंजीव दुःखावरचं शितल मलम.

आईची चांदणी कोणती असेल बरं ?
ती वरुन सगळं बघत असेल का ?
हे हिरण्यचे डोंगर, तलाव, हिरवळ, झाडी ?
मी, माझं कुटुंब.. सगळं तिला दिसत असेल का ? आईच्या प्रेमाचं, आठवणींच चांदणं मला अजून पुरतय, पदोपदी त्याची शिंपण मला जाणवते, आश्वस्त करते आहे. पण हेच चांदण मी तिच्यासाठी नाही शिंपू शकले.
नाही माझ्या आयुष्यातल्या पसाभर चांदण्या तिच्या ओटीत टाकता आल्या. आईच्या आठवणीने जीव हुरहुरला.

आहेच तिची चांदणी आकाशात तर उतरावी ना ती परत एकदा भुतलावर. निदान एका रात्री पुरती तरी !
हाताला धरुन सगळं फिरवून आणीन तिला. दोघी मिळून झाल्यागेल्याच हितगूज करु.
एकमेकींच्या नेत्रडोहातलं चांदणं बघत पहाटपर्यंत सुखदुखाच्या लडी उकलू...
विचार करता करता डोळे भरुन आले.
नभीचं चांदणं हलकेच डोळ्यात हेलकावलं.
दुरवर एक तारा खळकन् निखळला आणि एक तेजस्वी शलाका काळजात रुतली.

तेवढ्यात लाईट आले आणि चांदणं माझ्यावर रुसलं.

No comments:

Post a Comment