Wednesday, 16 May 2018

पाणी म्हणजे जीवन.

सारा साल एक तरफ और ये मई महिना एक तरफ म्हटलं तरी चालेल अशी परिस्थिती भारतात-महाराष्ट्रात असते.

ऊन्हाळा ऐन बहरात असतो. शैक्षणिक सुट्ट्या लागलेल्या असतात. लग्नसराई, प्रवास फुल बुम मधे असतात. आंबे डेरेदाखल झालेले असतात. आमच्यासारख्या दुष्काळग्रस्तांचे पाणी प्रश्न नव्याने पेटतात. थोडक्यात कशाचही वेळापत्रक मोडायला मे सारखा महिना नाही.

आमच्या योगा क्लासच्या सकाळी तिन बॅचेस असतात. पहिली सहाला सुरु होते. पहिली आणि तिसरी एडव्हान्स योगा बॅच असते. मधली जरा वयस्क आणि व्याधीग्रस्तांसाठी असते. पण मे महिना म्हणून सध्या तिनाच्या दोन बॅचेस सध्या केल्या आहेत. आमच्या क्लासच्या ग्रुपमधल्या महिला सोईप्रमाणे दोन पैकी एक बॅच सध्या करताहेत. त्यामुळे पुर्वी रोज भेटणाऱ्या सहयोगी सध्या शिवाशिवी खेळल्यासारख्या अधूनमधून भेटताहेत. त्यामुळे एकमेकींशी अगदी जाता येता जुजबी बोलणं होतय.

अरे आज तु दुस-या बॅचला आलीस का ?
हो नं, काय करु ? आज पाण्याचा दिवस होता ना. नाही येता आलं मला सकाळी. मागच्याच आठवड्यात नेमकी पाण्याच्या दिवशी गावाला गेले. पाणीच नाही मिळालं. मग तो टैंकर बोलवा, प्यायच्या पाण्याचे कैन आणा..चार दिवस विकतच्या पाण्यावर निभवायचे म्हणजे फार होतं हो. आणि आमच्याकडे तर कधीही पाणी येतं. भरवसाच नाही. पुर्वी तरी नगरसेवकाचा मेसेज यायचा पाण्याविषयी. हल्ली तर तेही बंद पडलय. मी तर आता पाण्याच्या टाकीजवळ जाऊन पाणी सोडणा-याचाच नंबर घेऊन आले. पाणी कधी सोडणार हे त्यालाच फोन करुन विचारते.
मग काय करणार ? कधीही येणारं पाणी. बाहेर पडणं, गावाला जाणं मुश्कील झालयं. त्यात पाहुणे म्हणजे तर विचारायलाच नको.

पाणी म्हटलं की आमच्या गृहिणी भरभरुन बोलतात. मनमोकळं करतात.
पाय-या उतरताना अजून एक जण सहयोगी भेटली.
अरे तुम्ही दिसला नाहीत दोन दिवस ?आणी आज उशीराच्या बॅचला ?
अगं..परवा एका स्कुटरवाल्याला धडकले. जरा पायाला लागलं. पाय दुखतोय. त्यात आज पाणी. म्हटलं पाणी भरुनच क्लासला जावं. डोक्यात पाण्याचा विषय असला की योगातही लक्ष लागत नाही बघ. म्हणून आज उशीरा. एकदा सायकल बिघडली की सगळ्याचीच बिघडते बघ.

रोजच्या जगण्यात पाणी टंचाई असणं, पाण्याप्रमाणे आपली दिनचर्या बदलणं, पाण्याप्रमाणे प्रवास आखणं, रद्द करणं, समारंभ ठरवणं, पाहुण्यांना बोलावणं..असे एक ना अनेक संसारी कार्यक्रम आम्ही पाण्याच्या टाईम टेबलाप्रमाणे आखतो. विशेषतः ऊन्हाळ्यात, मे महिन्यात.
सहजपणे बोलण्याला हवा-पाण्याच्या गोष्टी असं म्हटलं जातं. बहुतांश जनतेसाठी हवेच्या गप्पा मारणं ही सत्य परिस्थिती आहे पण आम्हा शहरवासीयांसाठी, मराठवाडींसाठी फक्त आणि फक्त पाण्याच्याच ऊन्हाळी गप्पागोष्टी असतात. ऊन तर कुणाच्या बापाला न ऐकणारं असतं. पण पाणी व्यवस्थापन राजकीय, व्यवस्थापकीय अधिका-यांच्या हातात असतानाही वर्षोनुवर्षे प्रथितयश शहरवासीय असे भरडले जाताहेत.
Sometimes it really gets in to your head.
येत्या पावसात बुडवून.. बुडवून जाब विचारला पाहिजे एकेकाला.
Water rules our life miserably.

No comments:

Post a Comment